अंकारा – ‘लिबियातील सराज राजवटीविरोधात सुरू असलेल्या संघर्षाला रशिया जबाबदार आहे. रशियाच लिबियामध्ये संघर्ष पेटवित आहे’, असा आरोप तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांनी केला. पाकिस्तानच्या दौर्यावरुन मायदेशी परतत असताना तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी रशियावर हा ठपका ठेवला. रशियाने आपल्यावरील हे आरोप फेटाळले असून लिबियातील संघर्षात रशियाचा सहभाग नसल्याचे म्हटले आहे. तर लिबियाचा ताबा मिळविण्यासाठी तुर्कीच या देशातील राजवटीला दहशतवादी व शस्त्रास्त्रांचा पुरवठा करीत असल्याचा पलटवार लिबियन बंडखोरांनी केला.
तुर्की आणि रशियातील संबंध सुरळीत असल्याचा दावा तुर्की करीत आहे. पण दोन्ही देशांमधला तणाव वाढत चालल्याचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांच्या आरोपातून उघड होत आहे. पाकिस्तानतून तुर्कीसाठी रवाना झाल्यानंतर विमानात पत्रकारांशी बोलताना राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी रशिया लिबियातील संघर्षासाठी सराज राजवटविरोधात बंडखोरांना उघडपणे सहाय्य करीत असल्याचा ठपका ठेवला. तुर्कीतील ‘एनटीव्ही’ या वृत्तवाहिनीने राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी केलेल्या आरोपांची माहिती उघड केली.
‘रशिया कंत्राटी सैनिकांच्या सहाय्याने लिबियात संघर्ष घडवित आहे. वरकरणी मात्र रशिया लिबियातील संघर्षाशी आपले घेणेदेणे नसल्याचे सांगत आहे’, असा आरोप तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी केला. याच्या पुराव्यादाखलचे फोटोग्राफ्स राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी तुर्कीच्या माध्यमांना दाखविले. ‘वॅग्नर’ या रशियन कंत्राटी सैन्यगटाचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांनी रशियन संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू व संरक्षणदलप्रमुख वॅलेरी गेरासिमोव्ह यांची भेट घेतल्याचे दावे तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी केला आहे.
रशियाबरोबरच तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी पाश्चिमात्य देशांवरही टीका केली. काही पाश्चिमात्य देश लिबियातील हफ्तार बंडखोरांना पाठिंबा देत असल्याची तक्रार एर्दोगन यांनी केली. यावेळी तुर्कीच्या रष्ट्राध्यक्षांनी कुठल्याही देशाचे नाव घेण्याचे टाळले. रशियाने तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांचे हे आरोप फेटाळले आहेत. लिबियातील सराज राजवट आणि हफ्तार बंडखोरांमधील संघर्षात रशियाचा कुठल्याही प्रकारे सहभाग नाही. रशियाचे सैनिक लिबियातील संघर्षात उतरलेले नाहीत, असे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी म्हटले आहे.
तर खलिफा हफ्तार यांच्या ‘लिबियन नॅशनल आर्मी’ (एलएनए) या बंडखोर संघटनेने आपल्या देशातील हिंसाचाराला तुर्कीच जबाबदार असल्याचा ठपका ठेवला. तुर्कीमुळे लिबियातील संघर्षबंदी संपुष्टात आली. तुर्कीने सराज राजवटीला पुरविलेला शस्त्रसाठा व दहशतवादी यांच्यामुळे लिबियामध्ये संघर्ष नव्याने भडकल्याचे हफ्तार यांच्या गटाने सांगितले. त्यामुळे सिरियापाठोपाठ लिबियाप्रश्नी देखील रशिया व तुर्कीमध्ये तणाव असल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान, युरोपिय महासंघाने लिबियावर नव्या निर्बंधांची घोषणा केली असून युरोपिय देशांनी आपल्या युद्धनौका तैनात लिबियानजिकच्या सागरी क्षेत्रात करण्याचा निर्णय घेतला आहे. कुठलाही देश किंवा संघटना किंवा कंपनीकडून लिबियन सरकार किंवा बंडखोरांना शस्त्रसहाय्य मिळू नये, यासाठी युरोपिय देशांच्या युद्धनौका इथे तैनात करण्यात आल्या आहेत. लिबियातील संघर्ष रोखण्यासाठी आणि संघर्षात सापडलेल्या या देशातील विस्थापितांच्या सुटकेसाठी हे निर्बंध व युद्धनौकांची तैनाती आवश्यक असल्याचे युरोपिय महासंघाने म्हटले आहे. तर युरोपिय महासंघाच्या या निर्णयामुळे तुर्की कोंडीत सापडल्याचा दावा पाश्चिमात्य माध्यमे करीत आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |