महासंघाने योग्य संकेत दिले नाही तर चार महिन्यात वाटाघाटी बंद – ब्रिटनच्या पंतप्रधानांचा इशारा

महासंघाने योग्य संकेत दिले नाही तर चार महिन्यात वाटाघाटी बंद – ब्रिटनच्या पंतप्रधानांचा इशारा

लंडन/ब्रुसेल्स – येत्या जून महिन्यापर्यंत युरोपिय महासंघाने कॅनडाच्या धर्तीवर करार व त्याबाबतच्या मुद्यांवर योग्य संकेत दिले नाहीत तर ब्रिटन वाटाघाटींमधून बाहेर पडेल, असा खरमरीत इशारा पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिला. ब्रिटनने युरोपिय महासंघाशी चर्चा करताना कोणत्या मुद्यांना प्राधान्य दिले जाईल, यासंदर्भातील विस्तृत प्रस्ताव संसदेत सादर केला. त्याबाबत बोलताना पंतप्रधान जॉन्सन यांनी महासंघाला इशारा दिला असून त्यांच्या निकटवर्तियांनी ब्रिटन ‘नो डील ब्रेक्झिट’साठी तयार असल्याचेही स्पष्ट केले आहे. महासंघानेही जॉन्सन यांचा इशारा गांभीर्याने घेतला असून ब्रिटनच्या हालचालींवर लक्ष असल्याची प्रतिक्रिया युरोपियन कमिशनच्या प्रवक्त्यांनी दिली.

        
गेल्या महिन्याच्या अखेरीस ३१ जानेवारी, २०२० रोजी ब्रिटन युरोपिय महासंघातून बाहेर पडला होता. त्यानंतर ब्रिटन व युरोपिय महासंघात भविष्यातील संबंध कसे राहतील याची चर्चा दोन्ही बाजूंमध्ये सुरू झाली आहे. दोन्हीकडून सातत्याने आक्रमक वक्तव्ये सुरू असून वाटाघाटींदरम्यान तीव्र संघर्ष उडण्याचे संकेत मिळाले आहेत. भविष्यातील परस्पर संबंधांच्या मुद्यावर होणारा संघर्ष भीषण व असह्य ठरेल व यात दोन्ही बाजू एकमेकांच्या चिंधड्या उडवतील, असे फ्रान्सने यापूर्वीच बजावले आहे.

ब्रिटनने महासंघाबरोबरील संबंधांच्या मुद्यावर अधिकृत भूमिका असलेला धोरणात्मक मसुदा जाहीर केला आहे. ३० पानांच्या ‘डॉक्युमेंट’मध्ये ब्रिटनची चार प्रमुख उद्दिष्टे जाहीर करण्यात आली आहेत. सरकारकडून देण्यात येणारे अर्थसहाय्य व अनुदान, कामगारांचे हक्क, पर्यावरणाचे निकष व मासेमारीचा हक्क यावर पूर्ण अधिकार ब्रिटनचा असेल, असे ‘डॉक्युमेंट’मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. न्यायव्यवस्था व कायद्यांवर ब्रिटनचे नियंत्रण राहील, असे ब्रिटीश सरकारने आपल्या उद्दिष्टांमध्ये म्हंटले आहे.

महासंघातून बाहेर पडल्यानंतर ‘ट्रान्झिशन’चा कालावधीत कोणत्याही परिस्थितीत ३१ डिसेंबर, २०२०च्या पलीकडे वाढविला जाणार नसल्याचे ब्रिटनने नमूद केले. त्याचवेळी महासंघाबरोबरील व्यापारी करार कॅनडाच्या धर्तीवर हवा आणि जून महिन्यापर्यंत त्याबाबत ठोस प्रस्ताव समोर यायला हवा, अशी मागणी ब्रिटनने केली असून त्यावर माघार घेणार नसल्याचे बजावले आहे. पंतप्रधान जॉन्सन यांनीही यावर आग्रही भूमिका मांडताना, येत्या चार महिन्यात व्यापारी कराराबाबत योग्य संकेत मिळाले नाही, तर बाहेर पडण्याचा इशारा दिला.

आपली भूमिका अधिक स्पष्ट करताना ब्रिटन कोणत्याही शर्यतीत सहभागी झालेला नाही; मात्र दोन्ही बाजूंनी परस्परांच्या निकषाचा मान राखून त्याप्रमाणे वागणूक द्यावी इतकीच अपेक्षा आहे, असे स्पष्ट केले. ब्रिटनच्या पंतप्रधानांनी घेतलेल्या या भूमिकेवर महासंघाकडून सावध प्रतिक्रिया उमटली आहे. युरोपिय कमिशनच्या प्रवक्त्या डॅना स्पिनांट यांनी, भविष्यातील सहकार्य व व्यापारी कराराबाबत ब्रिटीश पंतप्रधानांनी दिलेला कालावधी अपुरा पडेल, असे वाटत नसल्याचे स्पष्ट केले.

ब्रिटनच्या हालचालींवर महासंघाचे योग्य लक्ष असून ‘नो डील’साठी सज्ज राहण्याच्या दृष्टीनेही तयारी सुरू आहे, असे कमिशनच्या प्रवक्त्यांनी नमूद केले.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info