वॉशिंग्टन, दि. ४ (वृत्तसंस्था) – अमेरिकेने रशिया, चीन, इराण व उत्तर कोरियावर निर्बंध लादले असून हे देश पारंपारिक संघर्षात अमेरिकेला प्रत्युत्तर देण्यास सक्षम नाहीत. त्यामुळे ते अमेरिकेला रोखण्यासाठी अपारंपरिक युद्धतंत्राचा वापर करतील. त्यातूनच पहिल्या जागतिक सायबरयुद्धाचा भडका उडेल, असा इशारा अर्थतज्ज्ञ नुरिअल रुबिनी यांनी दिला. अमेरिकेत यावर्षी होणारी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक या सायबरयुद्धातील महत्त्वाचा टप्पा असेल, असेही रुबिनी यांनी बजावले. गेल्या वर्षीच अमेरिकेच्या ‘सायबर कमांड’ने, येत्या काळात रशिया, चीन, इराण व उत्तर कोरियाकडून सायबरहल्ल्यांची वाढती शक्यता असल्याचे संकेत दिले होते.
रुबिनी हे न्यूयॉर्क विद्यापीठात वरिष्ठ प्राध्यापक म्हणून सक्रिय असून आर्थिक सल्लागार कंपनीचे संस्थापक आहेत. बिल क्लिंटन व बराक ओबामा यांच्या काळात त्यांनी अमेरिकी प्रशासनात अर्थतज्ज्ञ तसेच सल्लागार म्हणून भूमिका निभावली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सल्लागार समितीचे सदस्य असणारे नुरिअल रुबिनी देशातील आघाडीच्या अर्थतज्ज्ञांपैकी एक म्हणून ओळखण्यात येतात. अमेरिकेत २००८-०९ साली आलेल्या मंदीबद्दल रुबिनी यांनी दोन वर्षे आधी वर्तविलेले भाकित खळबळ उडविणारे ठरले होते.
या पार्श्वभूमीवर एका अर्थविषयक संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत रुबिनी यांनी जागतिक सायबरयुद्धाबाबत दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो. रुबिनी यांनी आपल्या वक्तव्यात, जागतिक सायबरयुद्ध अमेरिका विरुद्ध रशिया,चीन, इराण, उत्तर कोरिया या देशांमध्ये होणार असल्याचे म्हंटले आहे. या देशांवर लादलेले आर्थिक व इतर क्षेत्रातील निर्बंध हे त्याचे मुख्य कारण ठरेल, असा दावाही त्यांनी केला आहे.
‘अमेरिकेने रशिया, चीन, उत्तर कोरिया व इराणवर निर्बंध लादले आहेत. हे देश अमेरिकेला पारंपारिकरित्या प्रत्युत्तर देऊ शकत नाही. पारंपारिक संघर्षाचा विचार करता आजही अमेरिका या देशांच्या तुलनेत सामर्थ्यवान आहे. त्यामुळे अमेरिकेविरोधात कमकुवत असणारे हे देश अमेरिकेला रोखण्यासाठी असमान युद्धतंत्राचा आधार घेतील. असमान युद्धतंत्राच्या माध्यमातून शत्रूला अंतर्गतरित्या कमजोर केले जाते. सायबरयुद्धाच्या माध्यमातून हेच केले जाते. त्यामुळे येत्या वर्षभरात आपल्याला पहिल्या जागतिक सायबरयुद्धाचा भडका उडाल्याचे पहायला मिळेल’, असा इशारा रुबिनी यांनी दिला.
‘चीन, रशिया, इराण व उत्तर कोरियाचा उद्देश अमेरिकेत मतभेद निर्माण करणे आणि महासत्ता म्हणून जागतिक स्तरावर असलेली क्षमता खच्ची करणे हा आहे. अमेरिकेला या चार देशांमध्ये सत्ताबदल हवा आहे किंवा या देशांना कमकुवत करायचे आहे, असा समज या देशांमध्ये दृढ झालेला आहे. त्यामुळे ते प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करणार व हे प्रत्युत्तर सायबरक्षेत्रातून असेल’, अशा शब्दात रुबिनी यांनी आपल्या इशार्यामागील भूमिका स्पष्ट केली.
गेल्या काही वर्षात अमेरिकेवर होणारे सायबरहल्ले आणि ‘सायबर कमांड’ तसेच ‘सायबर वेपन्स’सह अमेरिकेने केलेली तयारी या पार्श्वभूमीवर अर्थतज्ज्ञ रुबिनी यांचा हा इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो. काही महिन्यांपूर्वीच अमेरिकेतील एका दैनिकाने, रशियावर सायबरहल्ले चढविण्याची योजना अमेरिकेच्या ‘सायबरकमांड’ने आखली असल्याचे वृत्तही दिले होते. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणा, संरक्षण विभाग तसेच सायबर कमांडने रशिया, चीन, इराण व उत्तर कोरियाकडून होणार्या सायबरहल्ल्यांवर सातत्याने चिंता व्यक्त केली असून नजिकच्या काळात त्यांची तीव्रता अधिक वाढू शकते, असे बजावले होते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |