‘कोरोनाव्हायरस’ची साथ रोखण्यासाठी इटलीतील १६ प्रांतांमधील दीड कोटींहून अधिक जण ‘लॉकडाऊन’मध्ये – जगातील १०३ देशांमध्ये साथीचा फैलाव

‘कोरोनाव्हायरस’ची साथ रोखण्यासाठी इटलीतील १६ प्रांतांमधील दीड कोटींहून अधिक जण ‘लॉकडाऊन’मध्ये – जगातील १०३ देशांमध्ये साथीचा फैलाव

रोम – इटलीत गेल्या २४ तासांमध्ये ‘कोरोनाव्हायरस’चे १२००हून अधिक रुग्ण आढळले असून ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीतील साथीचा हा वाढता वेग रोखण्यासाठी पंतप्रधान गिसेप कॉन्टे यांनी रविवारी वटहुकूम जारी करीत १६ प्रांतांमध्ये ‘लॉकडाऊन’ची घोषणा केली. इटलीतील दीड कोटींहून अधिक नागरिकांच्या प्रवासावर बंदी घालण्यात आली असून ३ एप्रिलपर्यंत ‘लॉकडाऊन’ कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यादरम्यान, जगातील १०३ देशांमध्ये ‘कोरोनाव्हायरस’ची साथ पसरल्याचे स्पष्ट झाले असून लॅटिन अमेरिकेत पहिला बळी गेल्याचे समोर आले आहे.

डिसेंबर महिन्यात चीनमध्ये सुरू झालेल्या ‘कोरोनाव्हायरस’ विषाणूचे जागतिक साथीत रुपांतर झाले असून १००हून अधिक देशांमध्ये एक लाखांहून जास्त नागरिकांना साथीची लागण झाली आहे. साथीत बळी पडणार्‍यांची आकडेवारी ३,६५७ झाली असून त्यात चीनमधील ३,०९८ जणांचा समावेश आहे. चीनबाहेर सर्वाधिक प्रसार होणार्‍या देशांमध्ये दक्षिण कोरिया, इराण व इटलीचा समावेश आहे. दक्षिण कोरियात रुग्णांची संख्या सात हजार ३००वर गेली असून इराणमध्ये साडेसहा हजार जणांना ‘कोरोनाव्हायरस’ची लागण झाल्याची माहिती देण्यात आली.

युरोपमधील आघाडीचा देश असणार्‍या इटलीत साथीची व्याप्ती वेगाने वाढत असल्याचे समोर आले आहे. गेल्या २४ तासांमध्ये इटलीत ‘कोरोनाव्हायरस’चे १,२४७ नवे रुग्ण आढळले असून एकूण रुग्णांची संख्या सहा हजारांनजिक जाऊन पोहोचली आहे. त्याचवेळी शनिवारी ३६ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले असून बळींची संख्या २३३वर गेली आहे. अवघ्या २४ तासांमध्ये इटलीत घडलेल्या या घटनाक्रमामुळे इटलीसह युरोपात खळबळ उडाली असून युरोपिय महासंघाने आपत्कालिन बैठक बोलावण्याचे संकेत दिले आहेत.

इटली सरकारनेही युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या असून उत्तर इटलीतील १६ प्रांतांमध्ये थेट ‘लॉकडाऊन’ची घोषणा केली. रविवारी पंतप्रधान कॉन्टे यांनी केलेल्या या घोषणेनुसार ‘लोम्बार्डी’, ‘मॉडेना’, ‘व्हेनिस’, ‘अलेझांड्रिआ’ व ‘व्हर्सिली’सह १६ प्रांतांमधील दीड कोटींहून अधिक नागरिकांच्या हालचालींवर निर्बंध लादण्यात आले आहेत. या प्रांतांमधील नागरिकांना ३ एप्रिलपर्यंत शहर अथवा प्रांत सोडून बाहेर पडता येणार नाही. त्याचवेळी ‘लॉकडाऊन’ नसलेल्या भागातील नागरिकांनाही ‘लॉकडाऊन’ असलेल्या भागांमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

चीननंतर अशा रितीने देशातील जनतेला ‘लॉकडाऊन’ करावे लागण्याची ही दुसरीच वेळ आहे. अमेरिका, युरोपसह इतर देशांनी बाहेरून येणार्‍या प्रवाशांवर तसेच बाहेर जाणार्‍या नागरिकांवर निर्बंध लादले असले तरी दीर्घकालिन ‘लॉकडाऊन’चा निर्णय घेतलेला नाही. दरम्यान, अमेरिकेत ‘कोरोनाव्हायरस’च्या साथीत बळी जाणार्‍यांची संख्या १९ झाली असून ‘न्यूयॉर्क’मध्ये ‘इमर्जन्सी’ घोषित करण्यात आली आहे. अमेरिकेतील ३० प्रांतांमध्ये साथीचे सुमारे ४५० रुग्ण आढळल्याची माहिती स्थानिक यंत्रणांकडून देण्यात आली आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info