वॉशिंग्टन/पॅरिस/रोम – जगभरातील कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या दोन लाखांच्या पुढे गेली आहे. तर या साथीत दगावलेल्यांची संख्या आठ हजारांवर गेली. या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘कोरोनाव्हायरसबरोबर जगाचे युद्ध सुरू झाले आहे’, अशी घोषणा केली. या अदृश्य शत्रूच्या विरोधातील युद्धात आम्हीच जिंकू, असा विश्वासही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केला. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनीही अशाच शब्दात कोरोनाव्हायरसशी युद्ध सुरू झाल्याची घोषणा केली होती.
कोरोनाव्हायरसच्या साथीचे युरोपातील केंद्र बनलेल्या इटलीमध्ये आत्तापर्यंत याचे २५०० बळी गेले आहेत. इटलीत या साथीची लागण झालेल्यांची संख्या ३१ हजारांच्याही पुढे गेली. चीनच्या बाहेर या साथीची लागण झालेल्या देशांमध्ये इटलीच पहिल्या क्रमांकावर असल्याचे सांगितले जाते. इटलीमध्ये मृतांचे दफन करण्यासाठी वेटिंग लिस्ट करावी लागल्याच्या बातम्या येत असून कित्येकदा मृत रुग्णाचे नातेवाईक नसताना दफन होत असल्याच्याही बातम्या वृत्तसंस्थांनी दिल्या आहेत. अशा भयंकर साथीचा सामना करीत असताना, इटलीने दहा हजार वैद्यकीय विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे ढकलून त्यांचा उपचारांसाठी वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.
युरोपिय महासंघाने ही साथ रोखण्यासाठी देशांच्या सीमा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे ३० दिवसांसाठी या सीमा बंद राहणार असल्याची घोषणा युरोपिय महासंघाने केली. जर्मनीमध्ये दहा हजाराहून अधिकजण या साथीच्या कचाट्यात सापडले असून २७ जणांचा यात बळी गेला आहे. चॅन्सेलर मर्केल यांचे उत्तराधिकारी मानले जाणारे फे्रडरिच मर्झ यांना कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचे उघड झाले आहे. स्पेनमध्ये १३७०० जणांना या साथीची लागण झाली असून यात ५५८ जणांचा बळी गेला आहे. तर फ्रान्समध्ये ७७३० जणांना या साथीची लागण झाली असून १७५ जणांचा यात बळी गेला आहे.
अमेरिकेमध्ये कोरोनाव्हायरसच्या साथीने शंभराहून अधिकजणांचा बळी घेतला आहे. आत्तापर्यंत या साथीची लागण झालेले ६५३९ रुग्ण अमेरिकेत असल्याचे सांगितले जाते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी या साथीबरोबर जगाचे युद्ध सुरू झाल्याचे सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. कोरोनाव्हायरसचा उल्लेख ‘चायनीज व्हायरस’ असाच करून ट्रम्प यांनी यापासून आपण पहिल्यापासूनच सावध होतो, असा दावा केला. म्हणूनच यासंदर्भात आपण योग्य ते निर्णय घेऊन अमेरिकन्सचे प्राण वाचविल्याचे ट्रम्प म्हणाले. याबरोबरच कॅनडाबरोबरील अमेरिकेची उत्तर सीमा बंद करण्यात आल्याची घोषणा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केली. पण दोन्ही देशांचा व्यापार यामुळे बाधित होणार नाही, असे ट्रम्प पुढे म्हणाले.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी चीन आणि इराण या साथीच्या परिणामांची खरीखुरी माहिती उघड करीत नसल्याची टीका केली आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |