हॉंगकॉंग – कोरोनाव्हायरसची साथ रोखण्यासाठी लागू केलेले निर्बंध शिथिल होत असतानाच हॉंगकॉंगमध्ये पुन्हा चीनविरोधी निदर्शने सुरू झाली आहेत. मंगळवारी हॉंगकॉंगच्या एका मॉलमध्ये निदर्शकांनी एकत्र येऊन स्वतंत्र हॉंगकाँगसाठी घोषणा दिल्या. या निदर्शनांमुळे हॉंगकॉंगमधील जनतेत चीनविरोधात असलेला असंतोष कायम असल्याचे उघड झाले आहे. निदर्शनांमुळे चीनच्या सत्ताधाऱ्यांनी पुन्हा थयथयाट सुरू केला असून, ही निदर्शने म्हणजे ‘राजकीय विषाणू’ असल्याची टीका केली आहे.
गेल्या वर्षी चीनच्या सत्ताधारी राजवटीने हॉंगकॉंगच्या जनतेवर जबरदस्तीने कायदे लादण्याचा प्रयत्न केला होता. त्याविरोधात हॉंगकॉंगमध्ये चीनविरोधात लोकशाहीवादी व्यापक आंदोलन उभे राहिले होते. सहा महिन्यांहून अधिक काळ सुरू राहिलेले हे आंदोलन चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीला मिळालेले सर्वात मोठे आव्हान ठरले होते. आंदोलनाची तीव्रता व आंतरराष्ट्रीय दडपणामुळे चीनला हॉंगकॉंगवर लादलेले कायदे मागे घेणे भाग पडले होते.
मात्र चीनच्या या माघारीनंतरही हॉंगकॉंगमध्ये आंदोलन सुरू राहिले होते. नवे वर्ष चालू झाल्यानंतर चीनमध्ये आलेल्या साथीच्या पार्श्वभूमीवर हॉंगकॉंगमध्येही निर्बंध लादण्यात आले होते. या निर्बंधांमुळे हॉंगकॉंगमधील आंदोलन काही प्रमाणात थंडावले होते. पण गेल्या काही दिवसात साथीची तीव्रता कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले होते.
यानंतर आंदोलकांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन चीनविरोधात असंतोष व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. गेल्याच आठवड्यात आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून हॉंगकॉंगमधील लोकशाहीवादी गट रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी काही प्रमाणात हिंसाचाराच्या घटनाही घडल्या होत्या. या हिंसाचारावर होणारी टीका लक्षात घेऊन हॉंगकाँगमधील गटांनी पुन्हा एकदा शांततापूर्ण मार्गाने निदर्शने सुरू केली आहेत.
मंगळवारी रात्री हॉंगकॉंगच्या आंदोलकांनी एका मॉलमध्ये एकत्र येऊन निदर्शने केली. यावेळी हॉंगकाँगच्या स्वातंत्र्याचे व आंदोलनाचे प्रतीक असणारे ‘ग्लोरी टू हॉंगकॉंग’ हे गीत गाण्यात आले आणि घोषणा देण्यात आल्या. या आंदोलकांवर सुरक्षायंत्रणांनी कारवाई केल्याचेही समोर आले आहे.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर थंडावलेल्या आंदोलनाने पुन्हा जोर पकडण्यास सुरुवात केल्याने चीनकडून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटली. हॉंगकॉंगमधील आंदोलक म्हणजे केवळ हिंसा घडवणारा गट असून ते ‘राजकीय विषाणू’ आहेत अशी गरळ चीनकडून ओकण्यात आली.
गेल्याच महिन्यात हॉंगकाँगमधील चीनधार्जिण्या प्रशासनाने साथीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचे कारण पुढे करून लोकशाहीवादी कार्यकर्त्यांवर कारवाई केली होती. या कारवाईवर आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र प्रतिक्रियाही उमटली होती. कारवाईनंतरही हॉंगकाँगमधील निदर्शक पुन्हा आंदोलनासाठी रस्त्यावर उतरल्याने चीनविरोधातील आंदोलन व्यापक होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. सध्या चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनच्या विरोधात वातावरण तापले आहे. जगभरातील प्रमुख देशांनी यासाठी चीनला धारेवर धरले आहे. १९८९ साली चीनने घडविलेल्या तिआनमेन हत्याकांडाच्या काळात जगभरात चीनच्या विरोधात नव्हता इतका रोष चीनच्या विरोधात दाटून आलेला आहे.
अशा परिस्थितीत चीनपासून संपूर्ण राजकीय स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या हाँगकाँगच्या निदर्शकांना जगभरातून अधिकच समर्थन मिळू शकते याची जाणीव एव्हाना चीनलाही झाली आहे. त्यामुळे या निदर्शनांनी चीन अधिकच अस्वस्थ झाल्याचे संकेत मिळू लागले आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |