जेरूसलम – आपल्या नागरी प्रकल्पांवर इराणने चढविलेल्या सायबर हल्ल्यांवर इस्रायलने संताप व्यक्त केला आहे. हे हल्ले चढवून इराणने मर्यादा ओलांडली असून आता याला उत्तर देताना इस्रायल देखील नियमांची पर्वा करणार नाही, असा इशारा इस्रायली नेत्याने दिला. यापार्श्वभूमीवर एका नेत्याची प्रतिक्रिया इस्रायली वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केली असून या नेत्याने हा इशारा दिल्याचे वृत्तवाहिनीने म्हटले आहे.
गेल्या महिन्यात इस्रायलच्या जल आणि सांडपाणी प्रकल्पावर सायबर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. सलग दोन दिवस इस्रायलच्या पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेच्या ‘कमांड व कंट्रोल सिस्टिम्स’वर सायबरहल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. इराणी हॅकर्सनी यासाठी अमेरिकी सर्व्हर्सचा वापर केल्याचे उघड झाले होते. इस्रायली यंत्रणांनी याची गंभीर दखल घेऊन हे सायबर हल्ले उधळून लावले होते. पण इस्रायलच्या सरकारने यावर मोठी प्रतिक्रिया दिली नव्हती.
मात्र, इस्रायली वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या या सायबर हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर इस्रायली नेत्यांची उच्चस्तरीय बैठक पार पडली. यामध्ये सहभागी झालेल्या इस्रायली अधिकाऱ्यांकडून गोपनीयतेची शपथ व फॉर्म भरुन घेण्यात आला. त्यामुळे या बैठकीतील तपशील समोर येऊ शकलेले नाहीत. पण या बैठकीत सहभागी झालेल्या एका नेत्याने इस्रायली वृत्तवाहिनीशी बोलताना, इराणने सायबर हल्ले चढवून ‘रेड लाईन’ ओलांडल्याचे म्हटले आहे.
‘सार्वजनिक प्रकल्पांवर सायबर हल्ले चढविण्यापर्यंत इराणची मजल जाईल, असे वाटले नव्हते. पण हे हल्ले चढवून इराणने युद्धाचे संकेत धुडकावले आहेत. इराणच्या या हल्ल्यांना नक्की प्रत्युत्तर मिळेल’, अशी प्रतिक्रिया इस्रायली नेत्याने दिल्याचे या वृत्तवाहिनीने सांगितले. हे उत्तर देताना इस्रायल कुठल्याही नियमाला बांधील नसेल, असा दावा या नेत्याने केला आहे.
दरम्यान, काही वर्षांपूर्वी इस्रायलने ‘स्टक्सनेट’ या मालवेअरच्या सहाय्याने इराणच्या अणुकार्यक्रमालाच लक्ष्य केले होते. स्टक्सनेटचा वापर करुन इराणच्या अणुप्रकल्पातील काहि हजार सेंट्रिफ्युजेस निकामी करुन टाकले होते. या सायबरहल्ल्यामुळे इराणचा अणुकार्यक्रम अनेक वर्षांनी मागे पडला होता. या पार्श्वभूमीवर इस्रायली नेत्यांने इराणच्या सायबर हल्ल्याला उत्तर देण्याचा दिलेला हा इशारा इराणसाठी भयंकर परिणामांचे संकेत देणारा ठरतो.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |