टोकिओ – जग कोरोनाव्हायरसच्या संकटाचा सामना करण्यात गुंतलेले असताना चीन मात्र याचा पुरेपूर लाभ उतरण्याचा प्रयत्न करून आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी धडपडत आहे. ‘साउथ चायना सी’ व ‘ईस्ट चायना सी’ या दोन्ही क्षेत्रात आपल्या विनाशिका धाडून चीनने या क्षेत्रावरील आपला दावा भक्कम करण्याचा प्रयत्न केला. मात्र अमेरिका आणि जपान या दोन्ही देशांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे चीनचा हा डाव उधळला गेला आहे. ‘साऊथ चायना सी’मध्ये अमेरिकेने आपल्या दोन युद्धनौका धाडल्या असून अमेरिकी नौदलाची तिसरी युद्धनौका लवकरच या क्षेत्रात दाखल होईल. तर जपानने ‘ईस्ट चायना सी’मध्ये आपल्या विनाशिका पाठवून चीनच्या विनाशिकांना इथून माघार घेण्यास भाग पाडले.
गेल्या काही आठवड्यांपासून जपान तसेच व्हिएतनाम, फिलिपाईन्स आणि मलेशिया या देशांच्या सागरी क्षेत्रात आपल्या विनाशिका घुसवून या देशांच्या सार्वभौमत्वला आव्हान दिले आहे. पण ‘ईस्ट चायना सी’ आणि साऊथ चायना सी’च्या क्षेत्रातील चीनच्या आक्रमक हालचालींना या क्षेत्रातील देशांबरोबरच अमेरिकेकडून देखील उत्तर मिळत आहे. अमेरिकेच्या नौदलातील सर्वात प्रगत युद्धनौका ‘युएसएस मोंट्गोमेरी’ तसेच ‘युएसएनएस सेजार चावेझ’ साऊथ चायना सी मध्ये तैनात केल्या आहेत. आग्नेय आशियाई देशांच्या तसेच आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्राच्या सुरक्षेसाठी ही तैनाती असल्याचे अमेरिकेच्या नौदलाने म्हटले आहे. या दोन युद्धनौकांव्यतिरिक्त अमेरिकी नौदलाने आणखी एक युद्धनौका ‘साऊथ चायना सी’साठी रवाना केल्याचा दावा केला जातो.
चीनच्या विनाशिकांनी ‘ईस्ट चायना सी’मध्ये जपानच्या सागरी क्षेत्रात घुसखोरी करुन गस्त घातल्याचा आरोप जपानने केला आहे. चीनच्या या कारवाईनंतर जपानने आपल्या विनाशिका आणि गस्ती जहाजे रवाना करुन चीनच्या विनाशिकांना इथून पिटाळून लावले. तसेच चीनच्या विनाशिकांनी आपल्या सागरी क्षेत्रात घुसखोरी केल्याचा आरोप करुन जपानने चीनच्या दूतावासाला समन्स बजावले आहेत. तर चीनने जपानचे आरोप फेटाळून कोरोनाविरोधी लढ्यावर लक्ष्य केंद्रीत करण्याची सूचना केली आहे. पण प्रत्यक्षात स्वतः चीनच कोरोनाच्या विरोधी लढ्यात आलेले अपयश झाकण्यासाठी हे सारे प्रकार करीत असल्याचा आरोप अमेरिकी विश्लेषक करीत आहेत.
दरम्यान, ईस्ट आणि साऊथ चायना सीमधील चीनच्या या लष्करी कारवायांचा अंदाज घेऊन अमेरिकेने तैवानच्या दिशेने अम्फिबियस विमानवाहू युद्धनौका रवाना केल्याचे बोलले जाते. त्याचबरोबर हिंदी महासागर क्षेत्रातही अमेरिकी युद्धनौकांचा वावर वाढला आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |