चीनच्या धरणांमुळे ‘मेकाँग रिव्हर’ क्षेत्रातील देशांना दुष्काळाचा फटका – अभ्यासगटांचा आरोप

चीनच्या धरणांमुळे ‘मेकाँग रिव्हर’ क्षेत्रातील देशांना दुष्काळाचा फटका – अभ्यासगटांचा आरोप

बीजिंग – चीनने बांधलेल्या तब्बल ११ धरणांमुळे ”मेकाँग रिव्हर’ क्षेत्रातील आशियाई देशांना दुष्काळाचा फटका बसल्याचा आरोप काही अभ्यासगटांनी केला. चीनने यापूर्वी शेजारी देशांवर दडपण टाकले असले तरी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर या देशांमधील चीनविरोधी भावना तीव्र होऊ शकतात, आता दावाही अभ्यासगटांनी केला. चीनने आपल्यावर होणारे आरोप नाकारले आहेत.

चीनच्या तिबेटमध्ये उगम होणारी ‘लँकांग’ ही नदी दक्षिण आशियाई देशांमध्ये ‘मेकाँग’ म्हणून ओळखली जाते. तिबेटपासून ते व्हिएतनामपर्यंत सुमारे चार हजार तीनशे किलोमीटरची लांबी असणारी ही नदी चार देशांसाठी जीवनवाहिनी म्हणून काम करते. यात लाओस, कंबोडिया, थायलंड व व्हिएतनाम या देशांचा समावेश आहे.

या चारही दक्षिण आशियाई देशांमधील शेती, मासेमारी व वीजनिर्मिती ‘मेकाँग’ नदीवर अवलंबून आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या देशांना दुष्काळाचा फटका बसण्यास सुरुवात झाली आहे. व्हिएतनामला गेल्या वर्षी जुलै महिन्यात या दुष्काळामुळे आणीबाणी लागू करणे भाग पडले होते.

अमेरिकेतील ‘स्टीमसन सेंटर’ या अभ्यासगटाने या दुष्काळामागे चीनची धरणे असल्याचा आरोप केला. चीनमध्ये बांधण्यात आलेल्या धरणांनी मेकाँग नदीच्या पाण्याचा प्रवाह बंद करून टाकला, असे ‘स्टीमसन सेंटर’चे संचालक ब्रायन आयलर यांनी म्हटले आहे. गेल्या महिन्यात ‘आईज ऑन अर्थ इंक.’ या गटाने प्रसिद्ध केलेल्या अहवालातही, चीनने जास्त पाऊस झाल्यानंतर पाणी अडवून ठेवल्याचे सांगण्यात आले होते. या गटाने उपग्रहांद्वारे काढलेले फोटोग्राफ्सही प्रसिद्ध केले होते.

दक्षिण आशियातील ‘मेकाँग कम्युनिटी इन्स्टिट्यूट’, ‘३एस रिव्हर्स प्रोटेक्शन नेटवर्क’ या स्वयंसेवी संस्थांनीही चीनविरोधात होणाऱ्या आरोपांना दुजोरा दिला आहे. ‘शेतीतून मिळणारे उत्पन्न घटते आहे, नदीतील माशांचे प्रमाण कमी झाले आहे आणि पाळीव व इतर प्राण्यांचे बळी जात आहेत. याचा मोठा फटका ‘मेकाँग’ क्षेत्रातील जनतेला बसला आहे’,अशी माहिती ‘३एस रिव्हर्स प्रोटेक्शन नेटवर्क’च्या लिआंग यांनी दिली.

मलेशियातील ‘इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज’ या अभ्यासगटाने, कोरोना साथीमुळे मेकाँग क्षेत्रातील चीनविरोधी भावना अधिक तीव्र होतील, असा इशारा दिला. साथीमुळे मेकाँग क्षेत्रातील देशांच्या अर्थव्यवस्थांना फटके बसत असून स्थानिक जनता नाराज आहे. या पार्श्वभूमीवर नदीतील पाणी कमी होऊन शेती व मासेमारीला फटका बसल्यास त्याचा राग चीनवर निघू शकतो, असा दावा मलेशियातील विश्लेषकांनी केला.

हिंदी    English

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info