कोरोनाच्या ‘म्युटेशन्स’मधून एबोलासारखा प्राणघातक व्हेरिअंट समोेर येईल

‘वर्ल्ड मेडिकल असोसिएशन’चा इशारा

प्राणघातक

बर्लिन/तेल अविव – ‘‘कोरोनाव्हायरसमध्ये होणारे ‘म्युटेशन्स’ पुढे कायम राहिले तर त्यातून एबोलाप्रमाणे प्राणघातक ठरणारा व्हेरिअंट समोर येऊ शकतो’’, असा इशारा ‘वर्ल्ड मेडिकल असोसिएशन’ने दिला. ‘वर्ल्ड मेडिकल असोसिएशन’चे प्रमुख फ्रँक उलरिच मॉंटगोमेरी यांनी हा इशारा देतानाच कोणत्याही परिस्थितीत कोरोनाव्हायरसच्या रचनेत होणारे बदल थांबवायलाच हवेत, असे बजावले. काही दिवसांपूर्वीच कोरोनाचा ‘ओमिक्रॉन’ नावाचा व्हेरिअंट समोर आला असून तो आतापर्यंत आलेल्या साथींपेक्षा सर्वात घातक व्हेरिअंट असल्याचे सांगण्यात येते.

जर्मन दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत मॉंटगोमेरी यांनी भविष्यात समोर येणार्‍या घातक व्हेरिअंटच्या शक्यतेकडे लक्ष वेधले. ‘कोरोनाव्हायरसच्या रचनेत सातत्याने होणार्‍या बदलांमुळे पुढील काळात एबोलाप्रमाणे घातक ठरणारा व्हेरिअंट विकसित होऊ शकतो. हा व्हेरिअंट यापूर्वी आलेल्या डेल्टा व्हेरिअंटप्रमाणे अत्यंत वेगाने फैलावरणारा असेल. हे टाळण्यासाठी कोरोनाव्हायरसमध्ये बदल होऊ न देणे हाच एकमेव उपाय असू शकतो. ही गोष्ट साध्य करायची असेल तर पुढील काही वर्षे जगभरात लसीकरण मोहीम चालू ठेवावी लागेल’, असे ‘वर्ल्ड मेडिकल असोसिएशन’च्या प्रमुखांनी बजावले.

प्राणघातक

१९७०-८०च्या दशकात आफ्रिका खंडात पहिल्यांदा एबोलाचा विषाणू आढळला होता. त्यानंतर सातत्याने याच्या साथी येत असून २०१४ ते २०१६ यादरम्यान पश्‍चिम आफ्रिकेत सर्वात मोठी साथ आली होती. यास साथीने ११ हजारांहून अधिक जणांचा बळी घेतला होता. एबोला विषाणूची लागण झालेल्यांच्या मृत्यूचे प्रमाण ५० टक्के इतके आहे. या विषाणूचे काही व्हेरिअंट अतिशय घातक ठरले असून मृत्यूचे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत आढळले आहे. ही पार्श्‍वभूमी लक्षात घेता मॉंटगोमेरी यांनी दिलेला इशारा चिंता वाढविणारा ठरतो.

प्राणघातक

दरम्यान, गेल्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या ‘ओमिक्रॉन’ व्हेरिअंटने आंतरराष्ट्रीय समुदायात भीतीचे वातावरण तयार केले आहे. गेल्या आठवड्यात अवघ्या चार देशांमध्ये आढळलेल्या या व्हेरिअंटचा आता १०हून अधिक देशांमध्ये प्रसार झाला आहे. त्यात दक्षिण आफ्रिका व बोटस्वानासह इस्रायल, हॉंगकॉंग, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, ब्रिटन, नेदरलॅण्डस्, इटली, डेन्मार्क, झेक रिपब्लिक व जर्मनीचा समावेश आहे. फ्रान्स व ऑस्ट्रियामध्येही या व्हेरिअंटचे संशयास्पद रुग्ण आढळल्याचे सांगण्यात आले.

याचे रुग्ण आढळलेल्या देशांसह जगातील बहुसंख्य देशांनी आंतरराष्ट्रीय प्रवासावर नवे निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. इस्रायलने सर्व परदेशी प्रवाशांच्या आगमनावर दोन आठवड्यांची बंदी जाहीर केली आहे. युरोपातील बहुसंख्य देशांसह अमेरिका तसेच आशियातील देशांनी आफ्रिकी देशांमधून येणार्‍या प्रवाशांसाठी बंदीसह नवे नियम लागू केले आहेत. दक्षिण आफ्रिकेने या निर्बंधांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अमेरिकेत ओमिक्रॉनचा रुग्ण आढळला नसला तरी हा संसर्ग अमेरिकेत आधीच पसरलेला असू शकतो, असे संकेत वैद्यकतज्ज्ञांनी दिले आहेत.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info