युक्रेन मोहिमेतील आघाडीसाठी बाखमतवरील नियंत्रण महत्त्वाचे

- रशियाच्या संरक्षणमंत्र्यांचा दावा

मॉस्को/किव्ह – ‘डोन्बास क्षेत्रातील युक्रेनच्या फौजांसाठी बाखमत हे मध्यवर्ती केंद्र आहे. त्यामुळे रशियाच्या युक्रेन मोहिमेत युक्रेनी सैन्याविरोधात अधिक आक्रमक हल्ले करण्यासाठी बाखमतवर नियंत्रण असणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. बाखमतवरील ताब्यामुळे रशियन फौजांना युक्रेनमध्ये आगेकूच करणे शक्य होईल’, असा दावा रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू यांनी केला आहे. रशियन फौजा व ‘वॅग्नर ग्रुप’ या रशियन कंपनीच्या तुकड्यांनी बाखमतला वेढा घातल्याचे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसात हे शहर रशियाच्या हाती पडेल, असे मानले जाते. रशियन संरक्षणमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवरच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी बाखमतसाठी अतिरिक्त तैनाती जाहीर केली असून माघार घेतली जाणार नसल्याचे बजावले.

बाखमतवरील

गेल्या काही महिन्यांपासून बाखमतमध्ये संघर्ष करणाऱ्या रशियन लष्कराने नवीन वर्षात त्याला प्राधान्य दिले होते. नव्या लष्करी तुकड्या व मोठ्या प्रमाणात शस्त्रसामुग्री तैनात करण्यात आली होती. बाखमतनजिकचे भाग टप्प्याटप्प्याने काबीज करण्यावर भर देण्यात आला होता. युक्रेनी लष्कराचा प्रतिकार मोडून काढत रशियाने या भागात आगेकूच करण्यात यश मिळविले होते. बाखमतमधील परिस्थिती कठीण झाल्याचे मान्य करणाऱ्या युक्रेनी नेतृत्त्वाने त्या भागातून माघार घेण्यास टाळाटाळ केली होती. मात्र रशियाच्या प्रखर हल्ल्यांपुढे युक्रेनी लष्कराचा प्रतिकार कमी पडल्याचे गेल्या काही दिवसांमधील घटनाक्रमावरून समोर आले आहे.

रशियन लष्कर व वॅग्नर ग्रुपने बाखमतमधील युक्रेनी फौजेभोवतीचा वेढा अधिकच आवळला असून शहरातील मध्यवर्ती क्षेत्र वगळता बहुतांश भागांवर रशियाने नियंत्रण मिळविले आहे. बाखमतमध्ये जवळपास तीन हजार युक्रेनी जवान अजूनही तैनात असल्याचे मानले जाते. गेल्या आठवड्यात युक्रेनच्या संरक्षण विभागाने बाखमतमधील ड्रोन युनिटला बाहेर पडण्याचे निर्देश दिले होते. काही युक्रेनी लष्कराच्या तुकड्या मिळेल त्या मार्गाने शहराबाहेर पडण्याचे प्रयत्न करीत असल्याचा दावा रशियासमर्थक गटांनी केला आहे. युक्रेनमधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माघारीचे संकेतही दिले होते.

याच पार्श्वभूमीवर, रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू यांनी शनिवारी डोनेत्स्क प्रांतातील लष्कराच्या कमांड सेंटरला भेट दिली होती. या भेटीत त्यांनी रशियाच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा करून पूर्व युक्रेनमधील कारवाईसंदर्भात माहिती घेतल्याचे सांगण्यात येते. डोन्बासमधील सामरिकदृष्ट्या निर्णायक शहर म्हणून ओळखण्यात येणाऱ्या बाखमतवर ताबा मिळविल्यानंतर रशियन फौजा डोनेत्स्क, खार्किव्ह तसेच मध्य युक्रेनमध्ये अधिक आक्रमक हल्ले चढवतील, असे सांगण्यात येते. रशियन संरक्षणमंत्र्यांची भेट व वक्तव्यही याला दुजोरा देणारे ठरते.

युक्रेनी फौजा माघार घेण्याचे संकेत मिळत असतानाच राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी अचानक यू टर्न घेतल्याचे दिसत आहे. ‘युक्रेन आपला कोणताही भाग असाच मोकळा सोडून देणार नाही. आपण संरक्षणदलप्रमुखांना बाखमतमधील सैन्याच्या सहाय्यासाठी लष्करी तैनाती पाठविण्याचे आदेश दिले आहेत’, असे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. मात्र झेलेन्स्की यांच्या नव्या आदेशावरून युक्रेनच्या अंतर्गत वर्तुळात मतभेद निर्माण झाल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. लष्करी पातळीवर सर्व अधिकाऱ्यांचे एकमत नसतानाही झेलेन्स्की यांनी बाखमतसाठी अतिरिक्त तैनातीचा निर्णय घेतल्याचे दावे करण्यात येत आहेत.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info