कॅनबेरा – ‘साऊथ चायना सी’बाबतचा चीनचा हेतू ओळखण्यात जसा विलंब लागला तशी चूक अंटार्टिकाच्या बाबतीत घडू नये. चीनच्या अंटार्टिकामधील हालचाली वेळीच रोखल्या नाही तर, चीन या क्षेत्राचा ताबा घेईल, असा इशारा ‘ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटेजिक पॉलिसी इन्स्टिट्यूट’ या अभ्यासगटाने दिला आहे. ऑस्ट्रेलिया आणि चीनमध्ये तणाव निर्माण झालेला असताना या अभ्यासगटाने चीनबाबत दिलेला हा इशारा जगभरातील सामरिक विश्लेषकांचे लक्ष वेधून घेणारा ठरतो.
अंटार्टिकाच्या क्षेत्रातील चीनची महत्त्वाकांक्षा, येथील लष्करी हालचाली आणि त्यापासून ऑस्ट्रेलियाला असलेला धोका, याविषयी ऑस्ट्रेलियन अभ्यासगटाने ‘आईज् वाईड ओपन’ हा अहवाल तयार केला आहे. या अभ्यासगटाचे सहाय्यक लेखक अँथनी बर्गिन यांनी जपानच्या वर्तमानपत्राशी बोलताना सदर अहवालाची माहिती दिली. साधारण तीन दशकांपूर्वी ऑस्ट्रेलियानेच चीनला अंटार्टिकाच्या क्षेत्रात प्रवेश मिळवून दिला होता. अंटार्टिकातील संशोधनासाठी ऑस्ट्रेलियाने चिनी कंपन्यांचे मोठ्या प्रमाणात सहाय्य घेतले होते. पण आता मात्र या क्षेत्रातील चीनचा प्रवेश ऑस्ट्रेलियासाठी आता धोकादायक ठरू लागल्याचे बर्गिन यांनी म्हटले आहे.
१९८३ साली चीनच्या ‘कम्युनिस्ट पार्टी’ने ‘अंटार्टिका ट्रिटी सिस्टीम’ या करारावर स्वाक्षरी करून सदर क्षेत्रात पाऊल ठेवले होते. तेव्हापासून चीनने हळुहळू या क्षेत्रात आपला विस्तार केला. अंटार्टिकाच्या ४२ टक्के भूभागावर ऑस्ट्रेलियाचा दावा असून या क्षेत्रात ऑस्ट्रेलियाच्या चार प्रयोगशाळा आहेत. तर या क्षेत्रावर कुठलाही दावा नसताना, चीनने देखील तीन दशकांच्या कालावधीत अंटार्टिकामध्ये चार प्रयोगशाळा उभारल्या असून पाचव्या प्रयोगशाळेच्या निर्मितीसाठी चीनचे प्रयत्न सुरू आहेत. याव्यतिरिक्त दोन विशालकाय आईस-ब्रेकर जहाजे आणि मच्छिमार नौका चीनने या क्षेत्रात तैनात केल्या आहेत.
चीनच्या या सार्वजनिक आणि खाजगी कंपन्यांची अंटार्टिकातील वाढती गुंतवणूक इशारा देणारी असल्याचे बर्गिन यांनी बजावले आहे. यासाठी ‘साऊथ चायना सी’मधील चीनच्या हालचालींचा दाखला ऑस्ट्रेलियन अभ्यासकांनी दिला. मासेमारी, इंधन उत्खनन करता-करता चीनने साऊथ चायना सी क्षेत्रात कृत्रिम बेटांची निर्मिती करुन सैन्यतैनातीही सुरू केली. अंटार्टिकाच्या क्षेत्रातही प्रयोगशाळा आणि मासेमारीच्या निमित्ताने चीन आपल्या खाजगी कंपन्यांना या क्षेत्रात घुसवित आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष ‘शी जिनपिंग’ यांनी आखलेल्या नव्या धोरणानुसार, चीनच्या खाजगी आणि सार्वजनिक कंपन्यांची अंटार्टिकातील घुसखोरी हा ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक चिंतेचा विषय ठरू शकतो.
जिनपिंग यांच्या या नव्या धोरणानुसार, चीनचे लष्कर कधीही खाजगी कंपन्यांचा ताबा घेऊ शकते. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी जिनपिंग यांच्या याच धोरणावर बोट ठेवून अमेरिकेच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील चीनच्या वाढत्या गुंतवणुकीवर चिंता व्यक्त केली होती. ‘साऊथ चायना सी’प्रमाणे चीनचा हा लष्करी प्रभाव अंटार्टिकावर पडणार नाही, या भ्रमात ऑस्ट्रेलियाने राहता कामा नये, असे बर्गिन यांनी बजावले.
अंटार्टिकामध्ये मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती असून सामरिकदृष्ट्याही अंटार्टिकाला फार मोठे महत्त्व आहे. त्यामुळे चीनसारख्या अतिमहत्त्वाकांक्षी देशाने अंटार्टिकावरील आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सुरु केलेल्या हालचाली केवळ ऑस्ट्रेलियाच नाही तर इतर देशांसाठी देखील धोकादायक ठर शकतात. अशारितीने चीन जगातील सामरिक व धोरणात्मकदृष्ट्या महत्त्चाच्या ठरणाऱ्या सागरी क्षेत्रावर वर्चस्व गाजविण्याच्या तयारीत असताना, यापासून धोका निर्माण झालेल्या देशांनी चीनच्या विरोधात संघटित होण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. यात अमेरिका व जपानबरोबर ऑस्ट्रेलिया देखील आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलिया आपल्या क्षेत्रातील चीनच्या प्रत्येक हालचालींवर बारकाईने नजर ठेवून असल्याचे ‘आईज् वाईड ओपन’ या अहवालावरुन पुन्हा एकदा समोर आले आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |