चीनला तैवानवर हल्ला करावाच लागेल – कम्युनिस्ट राजवटीच्या वरिष्ठ नेत्याची धमकी

चीनला तैवानवर हल्ला करावाच लागेल – कम्युनिस्ट राजवटीच्या वरिष्ठ नेत्याची धमकी

बीजिंग – ‘शांततेच्या मार्गाने तैवानचा ताबा घेण्याचे चीनचे प्रयत्न सुरू होते व हे प्रयत्न यापुढेही सुरू राहतील. मात्र, तैवानमधील फुटीरांची चळवळ रोखायची असेल, तर चीनला तैवानवर हल्ला करावाच लागेल’, चीनच्या कम्युनिस्ट राजवटीच्या प्रभावी अधिकाऱ्याने बजावले आहे. त्याचबरोबर चीनचे लष्कर तैवानच्या स्वातंत्र्याची चळवळ चिरडण्यासाठी सज्ज असल्याची धमकी चीनच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. चीनकडून अशा धमक्या दिल्या जात असताना, तैवानच्या सरकारने मात्र आपली जनता कधीही हुकुमशाही स्वीकारणार नाही आणि हिंसेसमोर मान तुकवणार नाही’, असा खणखणीत इशारा दिला आहे.

२००५ साली चीनने लागू केलेल्या तथाकथित विघटनवादविरोधी कायद्याला पंधरा वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्‍वभूमीवर चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने शुक्रवारी एका विशेष बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत कम्युनिस्ट पार्टीचे तिसऱ्या क्रमांकाचे नेते असलेल्या ली झान्शू यांनी थेट तैवानवर हल्ला चढविण्याचा प्रस्ताव मांडला. तर, १५ वर्षांपूर्वी लागू करण्यात आलेल्या विघटनवादविरोधी कायद्यानुसार लष्करी कारवाई करुन तैवानवर हल्ला चढविता येऊ शकतो, असे यावेळी चीनचे संरक्षणदलप्रमुख ‘ली जाऊचेंग’ यांनीही या बैठकीत सुचविले. ‘तैवानच्या स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या शक्ती व त्यांच्या मागे उभे राहणाऱ्या परदेशी लष्करापासून चीनला फार मोठा धोका संभवतो. म्हणूनच तैवानमधील स्वातंत्र्याची चळवळ चिरडण्यासाठी चीनचे लष्कर सर्व तयारीनिशी सज्ज आहे’, असेही संरक्षणदलप्रमुख जाऊचेंग यावेळी म्हणाले.

दरम्यान, संपूर्ण जग कोरोनाव्हायरसच्या साथीचा मुकाबला करण्यात गुंतलेले असताना तैवानवर आक्रमण करण्याची नामी संधी आपल्याकडे असल्याचा दावा चीनच्या माजी लष्करी अधिकाऱ्यांनी केला होता. तैवानच्या संरक्षणासाठी वचनबद्ध असलेल्या अमेरिकेच्या या क्षेत्रातील युद्धनौकांवरील सैनिकांना कोरोनाची लागण झाल्याचे चीनच्या या माजी अधिकाऱ्यांनी निदर्शानस आणून दिले होते. याचाच फायदा उचलून चीनने तैवानचा ताबा घ्यावा, असे सल्ला या अधिकाऱ्यांनी दिला होता. तर चीनमधील लष्करी विश्लेषकांनी २००५ साली कम्युनिस्ट राजवटीने तयार केलेल्या कायद्याचा संदर्भ देऊन तैवानवर हल्ला चढविणे योग्यच असल्याचे म्हटले होते. तर दोन दिवसांपूर्वी चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी आपल्या लष्कराला युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरच्या बैठकीत चिनी नेते व लष्करी अधिकाऱ्यांनी तैवान ताब्यात घेण्यासाठी लष्करी कारवाईची भाषा सुरु केली असून याद्वारे तैवानवर दडपण वाढविण्याचा प्रयत्न चीनकडून केला जात आहे.

चीनकडून दिल्या जाणाऱ्या आक्रमणाच्या धमक्यांना तैवानच्या सरकारने सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे. काहीही झाले तरी, तैवानची जनता हुकूमशाही स्वीकारणार नाही आणि हिंसेसमोर मान तुकवणार नाही, असेच तैवानच्या सरकारने बजावले आहे. चीनच्या आक्रमणाची शक्यता लक्षात घेऊन तैवानने फार आधीपासूनच लष्करी सिद्धता केलेली आहे. मागच्या काही दिवसात अमेरिकेनेही तैवानला अत्याधुनिक शस्त्रास्त्रे व संरक्षण साहित्य पूरविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तैवानच्या मागे अमेरिकेचे लष्करी सामर्थ्य उभे आहे. याची पुरेपूर जाणीव चीनला झालेली आहे त्यामुळे चीन सध्यातरी तैवानवर लष्करी कारवाई करण्याचा विचार करू शकत नाही.

तरीही तैवानला वारंवार लष्करी कारवाईच्या धमक्या देऊन चीन तैवानच्या स्वातंत्र्यासाठी सुरू असलेले प्रयत्न रोखू पाहत आहे. पण कोरोनाव्हायरसच्या संकटाला जबाबदार असलेल्या चीनच्या विरोधात जगभरात वातावरण तापले असून तैवान याचा लाभ घेऊन आपल्या स्वातंत्र्याची मागणी अधिक आक्रमकपणे पुढे रेटत आहे. अमेरिका व इतर पाश्चिमात्य देश या आघाडीवर तैवानला सक्रीय सहाय्य करू लागले आहेत. ही चीनसाठी सर्वात मोठी चिंतेची बाब ठरते आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info