वॉशिंग्टन/मनिला – साऊथ चायना सी म्हणजे आपल्या सागरी साम्राज्याचा भाग आहे, या भ्रमात चीनच्या राजवटीने राहू नये, अशा खरमरीत शब्दात अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीनला फटकारले. आग्नेय आशियाई देशांनी साऊथ चायना सीच्या मुद्द्यावर चीनविरोधात ठाम भूमिका घेतली असून तसा स्पष्ट उल्लेख आपल्या संयुक्त निवेदनात केला आहे. अमेरिकेने या निवेदनाचे स्वागत केले असून आपण आग्नेय आशियाई देशांच्या पाठीशी उभे असल्याचा संदेश चीनला दिला आहे. याच पार्श्वभूमीवर, फिलिपाईन्सने साऊथ चायना सीमधील चीनच्या कारवायांना यापुढे प्रत्युत्तर मिळेल, असे संकेत दिले आहेत.
चीनच्या साऊथ चायना सीमधील अरेरावी विरोधात ‘आसियन’ने दाखविलेल्या एकजुटीचे अमेरिकेने स्वागत केले आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ‘साऊथ चायना सी मधील वाद आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या आधारेच सोडविण्यात येतील ही आसियन नेत्यांनी स्वीकारलेली भूमिका स्वागतार्ह आहे. साऊथ चायना सी म्हणजे काही चीनच्या सागरी साम्राज्याचा भाग नाही आणि या क्षेत्रात त्यांची मनमानी चालणार नाही याची जाणीव चीनच्या राजवटीला व्हायलाच हवी’, अशा शब्दात अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांनी आशियाई देशांच्या एकजुटीचे स्वागत करतानाच चीनला धारेवर धरले. लवकरच या मुद्द्यावर अमेरिका आपली भूमिका अधिक विस्ताराने मांडेल, असेही परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी यावेळी सांगितले.
‘कोहेसिव्ह अँड रिस्पोंसिव्ह आसियन’ या शीर्षकाखाली आयोजित केलेली आग्नेय आशियाई देशांची ३६वी बैठक शुक्रवारी व्हिएतनाममध्ये पार पडली. त्या बैठकीनंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात, आग्नेय आशियाई देशांनी साऊथ चायना सीमधील चीनच्या कारवायांना ठाम विरोध दर्शविला. साऊथ चायना सी संदर्भातील निर्णय आंतरराष्ट्रीय कायदे व नियमांच्या आधारेच होईल, अशी स्पष्ट भूमिका ‘आसियन’ने घेतली आहे. या सागरी क्षेत्रात चिथावणीखोर कारवाया करणाऱ्या तसेच लष्करीकरणाचा प्रयत्न करणार्या चीनवरही टीकास्त्र सोडण्यात आले.
गेल्या काही महिन्यांपासून चीनच्या साउथ चायना सीमधील हालचाली अधिक आक्रमक झाल्या आहेत. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर या सागरी क्षेत्राचा भाग असलेल्या छोट्या आशियाई देशांवर चीनकडून अरेरावी सुरू असून सातत्याने दडपण टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. साऊथ चायना सीमधील चीनच्या कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिका पुढे सरसावली असून साऊथ चायना सीसह इंडो-पॅसिफिक क्षेत्रात व्यापक संरक्षण तैनातीसाठी पावले उचलली आहेत. अमेरिकेच्या व्यापक हालचालींनंतर आता साऊथ चायना सीमधील छोट्या आशियाई देशांनीही चीनविरोधात आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे.
फिलिपाईन्सने साऊथ चायना सीच्या मुद्दावर चीनला आव्हान देणाऱ्या हालचाली सुरू केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी फिलिपाईन्सने साऊथ चायना सीमधील ‘पॅगासा’ बेटावर नवीन बांधकाम सुरू केले असून अमेरिकेबरोबरील लष्करी करारही सध्या कायम ठेवण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर आता फिलिपाईन्सच्या ऊर्जा तसेच परराष्ट्र विभागाने ‘रीड बँक’ सागरी क्षेत्रात इंधन उत्खनन सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भातील एक प्रस्ताव त्यांनी राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुअर्ते यांच्याकडे पाठविल्याचे सांगण्यात येते. राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांनी यापूर्वी चीनबरोबर संयुक्त इंधन उत्खनन करारासाठी हालचाली केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर फिलिपाईन्सच्या सरकारी विभागांनी एकतर्फी इंधन उत्खननासंदर्भात प्रस्ताव पाठवणे महत्त्वाचे ठरते.
व्हिएतनाममध्ये झालेल्या ‘आसियन’च्या बैठकीत राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांनी चीनविरोधात घेतलेली भूमिकाही लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. फिलिपिनी राष्ट्राध्यक्षांनी ‘साऊथ चायना सी’च्या मुद्द्यावर बोलताना, सर्व देशांनी आंतरराष्ट्रीय नियम व कायद्याचे पालन करायला हवे, अशी भूमिका मांडली. त्याचवेळी, आग्नेय आशिया कोरोना साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी धडपडत असतानाच साऊथ चायना सीमध्ये धोक्याचा इशारा देणाऱ्या घटना घडल्याचे सांगून दुअर्ते यांनी चीनवर निशाणा साधला. चीनशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याची भाषा करणाऱ्या फिलिपिनी राष्ट्राध्यक्षांची ही वक्तव्ये चीनला उघड आव्हान देणारी दिसतात.
‘आसियन’चा ठराव, अमेरिकेने त्याला दिलेले समर्थन आणि फिलिपाईन्सकडून चीनला देण्यात आलेले आव्हान या घटनांमुळे, पुढील काळात साऊथ चायना सीच्या मुद्द्यावर चीनला आग्नेय आशियाई देशांवर आपली मनमानी चालविता येणार नाही, असे संकेत मिळत आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |