सलग दुसऱ्या दिवशी रशियाचे युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ले

- राजधानी किव्हसह चेर्कासी व डिनिप्रो प्रांतात मारा

मॉस्को/किव्ह – रशियन फौजांनी सलग दुसऱ्या दिवशी युक्रेनमध्ये क्षेपणास्त्रांचा मारा केला. युक्रेनची राजधानी किव्हसह चेर्कासी व डिनिप्रो प्रांतात हल्ले झाले असून किमान २० जणांचा बळी गेल्याचे सांगण्यात येते. गुरुवारी रात्री तसेच शुक्रवारी पहाटे हे हल्ले झाल्याचे समोर आले आहे. त्यापूर्वी रशियाने दक्षिण युक्रेनमधील मायकोलेव्ह, झॅपोरिझिआ व खेर्सन प्रांतात क्षेपणास्त्रहल्ले चढविले होते.

सलग दुसऱ्या दिवशी

गुरुवारी रात्री व शुक्रवारी रशियाच्या संरक्षणदलांनी युक्रेनची राजधानी किव्ह, त्याच्या दक्षिणकडे असणारा चेकार्सी प्रांत व मध्य युक्रेनमधील डिनिप्रो प्रांताला लक्ष्य केले. कॅस्पिअन सी क्षेत्रात तैनात असलेल्या लढाऊ विमानांमधून या भागांमध्ये क्षेपणास्त्रे डागण्यात आली. रशियाने हल्ल्यासाठी २३ क्षेपणास्त्रे व दोन आत्मघातकी ड्रोन्सचा वापर केल्याची माहिती युक्रेनी यंत्रणांनी दिली आहे. युक्रेनी लष्कराच्या ‘रिझर्व्ह फोर्स युनिटस्‌‍’वर मारा केल्याचे रशियाच्या संरक्षणदलांकडून सांगण्यात आले.

सलग दुसऱ्या दिवशी

रशियाने केलेल्या हल्ल्यांमधील काही क्षेपणास्त्रांना ‘एअर डिफेन्स सिस्टिम्स’ने प्रत्युत्तर दिल्याचे युक्रेनने म्हटले आहे. राजधानी किव्हसह इतर दोन्ही प्रांतांमध्ये नागरी वस्तीत हल्ले झाल्याचा दावा युक्रेनी यंत्रणांनी केला. हल्ल्यांमध्ये किमान २० जणांचा बळी गेला आहे. बळींमध्ये महिलांसह सामान्य नागरिकांचा समावेश असल्याचे युक्रेनने म्हटले आहे. या हल्ल्यांवर युक्रेनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली असून रशियाचे हल्ले म्हणजे शांतीप्रस्तावांना दिलेला प्रतिसाद असल्याचा टोला युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा यांनी लगावला.

दरम्यान, रशियाच्या या क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर रशियाविरोधातील प्रतिहल्ल्यांच्या मोहिमेची तयारी जवळपास पूर्ण झाल्याचा दावा युक्रेनचे संरक्षणमंत्री ओलेक्सी रेझ्निकोव्ह यांनी दिला. युक्रेनला जर्मनी तसेच ब्रिटनकडून मिळालेले रणगाडे या प्रतिहल्ल्यांच्या मोहिमेचा भाग असतील, असेही युक्रेनच्या संरक्षणमंत्र्यांनी सांगितले. तर नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी, नाटोचे सदस्य व भागीदार देशांनी युक्रेनमधील जवळपास ३० हजार जवानांना प्रशिक्षण दिल्याची माहिती दिली आहे.

सलग दुसऱ्या दिवशी

पाश्चिमात्य देश युक्रेनला मोठे सहाय्य दिल्याचे दावे करीत असले तरी त्याचवेळी काही देशांकडून युक्रेनच्या प्रतिहल्ल्यांच्या मोहिमेबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिकेतील लष्करी तसेच राजनैतिक वर्तुळातील सूत्रांनी युक्रेनला मिळणारे यश मर्यादित राहिल, असे संकेत देण्यास सुरुवात केली आहेत. त्याचवेळी युक्रेनची मोहीम पूर्ण अपयशी ठरल्यास नाटो सदस्य देशांच्या माध्यमातून युक्रेनमध्ये लष्करी तुकड्या उतरविण्याच्या हालचालीही सुरू असल्याचे दावे करण्यात येत आहेत.

दुसऱ्या बाजूला रशियाकडून होणारे वाढते हल्ले पाश्चिमात्य देशांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात रशियाने तैनात केलेल्या लष्करापेक्षा जास्त तैनाती रशियन भागांमध्ये दिसून येत असल्याचे पाश्चिमात्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. रशिया-युक्रेन युद्धाला तोंड फुटल्यानंतर वर्षभरात रशियन संरक्षणदलांची मोठी हानी झाल्याचे व रशियाकडील शस्त्रसाठा प्रचंड प्रमाणात घटल्याचे दावे युक्रेनसह पाश्चिमात्य माध्यमे तसेच यंत्रणांनी केले होते. मात्र रशियन फौजांचे वाढते हल्ले चित्र वेगळे असल्याचे दाखवून देत आहेत.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info