तेहरान – इराणच्या अहवाज शहरात शनिवारी झालेल्या स्फोटात प्रचंड मोठी आग लागली. या स्फोटाचे निश्चित कारण उघड होऊ शकलेले नाही. पुढच्या काही तासात अहवाजपासून काही अंतरावर असलेल्या मशहर शहरातील पेट्रोकेमिकल सेंटरमध्ये झालेल्या गॅसगळतीने ७० जण बाधित झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून इराणच्या अणुप्रकल्प, क्षेपणास्त्र तळांवर झालेल्या स्फोटांप्रमाणे या दोन्ही घटनांकडेही संशयाने पाहिले जाते. इराणने या घटनांसाठी इस्रायल जबाबदार असल्याचे आरोप सुरू केले असून इस्रायलला गंभीर परिणामांचा इशाराही दिला आहे. शत्रूदेशातील इस्रायलच्या कारवायांची वाच्यता केली जात नाहीत, अशा मोजक्या शब्दात इस्रायलचे नवे परराष्ट्रमंत्री गाबी अश्केनाझी यांनी आपल्या देशाची भूमिका मांडली.
पर्शियन आखात आणि इराकच्या सीमेजवळ असलेल्या खुजेस्तान प्रांतातील अहवाज शहरातील जरगान वीज प्रकल्पात शनिवारी सकाळी प्रचंड मोठे स्फोट झाले. प्रकल्पातील ट्रान्सफॉर्मर्समध्ये झालेल्या स्फोटामुळे मोठी आग लागली होती. इराणच्या अग्निशमनदलाने शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली. वीजप्रकल्पात झालेल्या या स्फोटात जीवितहानी झालेली नाही. पण या घटनेमुळे अहवाज शहरासह इतर भागात काही काळासाठी वीज पुरवठा खंडित झाला होता. वीजप्रकल्प झालेल्या संशयास्पद स्फोटाच्या चौकशीचे आदेश दिल्याची माहिती इराणी यंत्रणांनी प्रसिद्ध केली.
वीजप्रकल्पात झालेल्या या स्फोटाच्या बातमीतून इराण सावरत असताना याच प्रांतातील कारून पेट्रोकेमिकल सेंटरमध्ये क्लोरीन गॅसगळती झाल्याची माहिती प्रसिद्ध झाली. मशहर शहरातील पेट्रोकेमिकल कंपनीमध्ये झालेल्या गॅसगळतीची सदर कंपनीतील ७० कर्मचाऱ्यांना बाधा झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. खुजेस्तान प्रांतात अवघ्या काही तासांच्या फरकाने झालेल्या या दोन्ही घटनांकडे संशयाने पाहिले जाते. इस्रायलने सायबर हल्ले चढवून हा घातपात घडविल्याचा आरोप इराणमधून आता होऊ लागला आहे.
वीज प्रकल्पातील स्फोट आणि पेट्रोकेमिकल कंपनीतील गॅसगळती, या दोन्ही घटनांच्या आधी इराणचा नातांझ अणुप्रकल्प तसेच पारचीन येथील लष्करी तळावर संशयास्पद स्फोट झाले होते. इस्रायलने यापैकी नातांझ अणुप्रकल्पावर सायबर हल्ले तर पारचीन येथील तळावर हवाई हल्ले चढविल्याचा आरोप आखातातील एका वर्तमानपत्राने केला होता. या दोन्ही घटनांची चौकशी सुरू असल्याचे सांगणाऱ्या इराणने सदर वर्तमानपत्राच्या आरोपांना उचलून धरले होते. तसेच इराणवरील घातपातामागे इस्रायल असल्याचे उघड झाल्यास या देशाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी धमकीही इराणने दिली होती.
नातांझ अणुप्रकल्पातील स्फोटामुळे इराणचा अणुकार्यक्रम दोन महिन्यांसाठी पिछाडीवर गेल्याचा दावा केला जातो. तर पारचीन येथील लष्करी तळावर झालेल्या स्फोटामुळे इराणच्या क्षेपणास्त्रांचा मोठा साठा नष्ट झाल्याचेही बोलले जाते. या दोन्ही घटना इराणसाठी जबर हादरा देणारा असल्याचे म्हटले जाते. इस्रायल सायबर हल्ले चढवून इराणमध्ये स्फोटांची मालिका घडवित असल्याच्या आरोपांची तीव्रता आता वाढू लागली आहे. दोन महिन्यांपूर्वी इराणने इस्रायलमध्ये चढवलेल्या सायबर हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इजराइल ही कारवाई करत असल्याचेही बोलले जाते. त्यामुळे हा एक सायबर युद्धाचा भाग असल्याचे काही विश्लेषकांचे म्हणणे आहे. तर नातांझ अणुप्रकल्प आणि पारचीन येथील हल्ल्यांमुळे इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये थेट युद्ध पेटू घेईल, अशी शक्यताही वर्तविली जात आहे. असे झाल्यास, आखातात युद्धाचा मोठा भडका उडेल, अशी चिंता व्यक्त केली जाते .
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |