रशिया धार्मिक स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी कारवाई करू शकतो – राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा इशारा

रशिया धार्मिक स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी कारवाई करू शकतो – राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा इशारा

मॉस्को – रशिया युक्रेनमधील चर्चच्या अंतर्गत व्यवहारात हस्तक्षेप करणार नाही, मात्र धार्मिक स्वातंत्र्य व मानवाधिकाराच्या संरक्षणासाठी कारवाई करण्याचा हक्क आम्ही राखून ठेवत आहोत, अशा खरमरीत शब्दात रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेन सरकारला इशारा दिला. गेल्याच महिन्यात युक्रेनमधील ‘ऑर्थोडॉक्स चर्च’ने रशियन चर्चपासून वेगळे होऊन स्वतंत्र चर्च स्थापन केल्याची घोषणा केली होती. या चर्चच्या स्थापनेमागे युक्रेनमधील सरकारची फूस असल्याचा आरोप रशियाकडून करण्यात आला आहे.

‘चर्चच्या व्यवहारांमध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप रशियन सरकार खपवून घेणार नाही. रशियन राजवटीने यापूर्वीही चर्चच्या स्वातंत्र्याचा आदर राखला आहे. हीच बाब सार्वभौम देश असणार्‍या युक्रेनलाही लागू पडते. रशिया युक्रेनमधील चर्चच्या व्यवहारांचाही योग्य आदर राखेल. मात्र त्याचवेळी धार्मिक स्वातंत्र्य व श्रद्धा आणि मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी प्रत्युत्तर देण्याचा तसेच कोणत्याही स्वरुपाची कारवाई करण्याचा हक्क रशिया राखून ठेवत आहे’, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी बजावले.

धार्मिक स्वातंत्र्य, कारवाई, व्लादिमिर पुतिन, चर्च, संघर्ष, ww3, युक्रेन, रशिया, अमेरिका

गेल्या महिन्यात युक्रेनच्या चर्चने रशियन ‘ऑर्थोडॉक्स चर्च’पासून वेगळे होण्याचा घेतलेला निर्णय व त्याला ‘कॉन्स्टँटिनोपल चर्च’ने दिलेली मान्यता वादग्रस्त मुद्दा ठरला आहे. युक्रेनच्या राज्यकर्त्यांनी, अखेर युक्रेनमधील नागरिक रशियाच्या प्रभावापासून मुक्त झाले अशी भूमिका घेऊन त्याला रशिया-युक्रेनमधील संघर्षाची पार्श्‍वभूमी दिली आहे. मात्र रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी धार्मिक बाब वेगळी ठेवण्याची आग्रही भूमिका मांडली असून रशियन ‘ऑर्थोडॉक्स चर्च’चे समर्थन केले आहे.

युक्रेनमध्ये नव्या चर्चची झालेली उभारणी धर्माशी निगडित नसून निव्वळ काही राजकीय नेत्यांचे हितसंबंध जपण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप रशियन राष्ट्राध्यक्षांनी केला. अशा गोष्टींमुळे द्वेष व असहिष्णुता वाढीस लागेल, असा दावाही पुतिन यांनी यावेळी केला. ‘गेल्या शतकात नास्तिकांनी प्रार्थनास्थळातून श्रद्धा बाळगणार्‍या नागरिकांना हाकलून बाहेर काढले होते, त्यांच्यावर हल्ले चढविले होते. धर्मगुरुंवर आरोप ठेऊन शिक्षा ठोठावण्यात आल्या होत्या. युक्रेनमध्ये स्वतंत्र चर्च उभारणारे याच मनोवृत्तीचे असून चर्चच्या व्यवहारांमध्ये अनावश्यक हस्तक्षेप करण्यात येत आहे’, अशा शब्दात पुतिन यांनी युक्रेनच्या राजवटीला फटकारले.

युक्रेनमध्ये मार्च महिन्यात राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्राध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को यांनी आक्रमक रशियाविरोधी भूमिका घेतली असून प्रचारमोहिमेतही, मला मत दिले नाही तर ते पुतिन यांना असेल, असा विखारी प्रचार सुरू केला आहे. पूर्व युक्रेनमधील संघर्ष व रशियाच्या आक्रमणाची भीती दाखवून पोरोशेन्को आपले अपयश लपविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप स्थानिक विश्‍लेषक तसेच पोरोशेन्को यांचे विरोधक करीत आहेत.

रशियाने काही महिन्यांपूर्वी युक्रेनच्या बोटी व खलाशांना ताब्यात घेतले असून हा मुद्दादेखील प्रचारात महत्त्वाचा ठरला आहे. अमेरिका व नाटो सदस्य देशांनी रशियाविरोधाच्या मुद्यावर पोरोशेन्को यांना समर्थन दिले असले तरी धार्मिक बाबीत हस्तक्षेप न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे या मुद्यावरून पुतिन यांनी युक्रेनच्या सत्ताधार्‍यांना दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info