तेल अविव – कट्टर इराणसमर्थक असलेली लेबेनॉनमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लाहने लेबेनॉनची राजधानी बैरुतच्या नागरी भागात क्षेपणास्त्रांचे २८ तळ उभारले आहेत. नागरी भागात तळ उभारून आपल्या क्षेपणास्त्रांच्या सुरक्षेसाठी हिजबुल्लाह मानवी वस्तीचा ढालीसारखा वापर करीत असल्याचा आरोप इस्रायलच्या अभ्यासगटाने केला आहे. यापैकी काही तळ इस्रायलवर हल्ले चढविण्यासाठी सज्ज असल्याचा इशाराही या अभ्यासगटाने दिला आहे. दरम्यान, तीन आठवड्यांपूर्वी हिजबुल्लाहने प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओमध्ये इस्रायलच्या तेल अविव शहरावर क्षेपणास्त्रे रोखल्याचे दाखविले होते.
लेबेनॉनची राजधानी बैरुतमध्ये हिजबुल्लाहचे क्षेपणास्त्र तळ असल्याची माहिती इस्रायलने याआधी उघड केली होती. ही क्षेपणास्त्रे भुयारात साठवून ठेवल्याचे सॅटेलाईट फोटोग्राफ्स इस्रायलने प्रसिद्ध केले होते. मात्र, ‘अल्मा रिसर्च अँड एज्युकेशन सेंटर’ या इस्रायली अभ्यासगटाने प्रसिद्ध केलेल्या माहितीमध्ये नवा दावा करण्यात आला आहे. याआधी कधीही लक्ष गेलेले नाही अशा ठिकाणी हिजबुल्लाहने क्षेपणास्त्र तळ उभारल्याची माहिती इस्रायली अभ्यासगटाने आपल्या अहवालात प्रसिद्ध केली आहे. हिजबुल्लाहचा प्रभाव असलेल्या बैरुत शहराच्या दक्षिणेकडील भागात या क्षेपणास्त्रांची गोदामे तसेच लॉंचपॅड असल्याचे या अभ्यासगटाने इस्रायली वर्तमानपत्राला दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
मध्यम पल्ल्याच्या तसेच गायडेड क्षेपणास्त्रांचा यात समावेश आहे. अशी क्षेपणास्त्रे रहिवासी इमारती, प्रार्थनास्थळ, शिक्षण संस्था, रुग्णालये, फुटबॉल ग्राउंड त्याचबरोबर इराणचे दूतावास आणि लेबेनीज संरक्षण मंत्रालयाच्या समोर तैनात केल्याचे इस्रायली अभ्यासगटाचे प्रमुख ताल बिरी यांनी म्हटले आहे. गर्दीच्या ठिकाणी क्षेपणास्त्र तळ उभारून हिजबुल्लाह आपल्या क्षेपणास्त्रांच्या सुरक्षेसाठी मानवी ढाल वापरीत आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने हिजबुल्लाहच्या या कारवायांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन बिरी यांनी या अहवालात केले आहे. इस्रायलच्या या अभ्यासगटाने हिजबुल्लाहच्या तळांचे सॅटेलाईट फोटोग्राफ्स देखील प्रसिद्ध केले आहेत.
हिजबुल्लाहकडे किमान १,३०,००० क्षेपणास्त्रे व रॉकेट्सचा साठा असून ही क्षेपणास्त्रे व रॉकेट्स हिजबुल्लाहने इराणकडून मिळविल्याचा आरोप इस्रायल करीत आहे. हिजबुल्लाहला गायडेड क्षेपणास्त्रांनी सज्ज करण्यासाठी इराणने लेबेनॉनच्या दक्षिण सीमेजवळ क्षेपणास्त्रांचा कारखाना उभारल्याचे फोटोग्राफ्सही प्रसिद्ध झाले होते. हिजबुल्लाहची सदर क्षेपणास्त्रे आपल्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचा इशारा इस्रायलने दिला होता. हिजबुल्लाहने आपली क्षेपणास्त्रे इस्रायलची प्रमुख शहरे बेचिराख करतील, असे दावे दिली होती.
इस्रायल लेबेनॉन सीमेवर २००६ साली हिजबुल्लाह आणि इस्रायली लष्करामध्ये ३४ दिवसांचा संघर्ष पेटला होता. या संघर्षात हिजबुल्लाहने इस्रायलला दिलेली टक्कर सर्वांना चकीत करणारी ठरली. मात्र, पुढच्या काळात हिजबुल्लाहने इस्रायलच्या विरोधात आगळिक केलीच तर लेबेनॉनमध्ये घुसून या संघटनेचे तळ नष्ट केले जातील, असे इस्रायलने बजावले होते. तेव्हापासूनच हिजबुल्लाहचे दहशतवादी आणि शस्त्रास्त्रे यांचे तळ वस्त्यांमध्ये ठेवण्याची तयारी हिजबुल्लाहने केली होती. इस्रायली गुप्तचर यंत्रणांनी तसे इशारेही दिले होते. आत्ताही हिजबुल्लाह मानवी वस्तीचा ढालीसारखा वापर करुन आपली क्षेपणास्त्रे इस्रायलच्या हल्ल्यांपासून सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे या अभ्यासगटाच्या अहवालावरुन समोर येत आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |