अमेरिका-चीन आर्थिक युद्ध दुसऱ्या महायुद्धापूर्वीच्या काळाची आठवण करून देणारे – अमेरिकी अर्थतज्ञ व गुंतवणूकदार रे डॅलिओ यांचा इशारा

अमेरिका-चीन आर्थिक युद्ध दुसऱ्या महायुद्धापूर्वीच्या काळाची आठवण करून देणारे – अमेरिकी अर्थतज्ञ व गुंतवणूकदार रे डॅलिओ यांचा इशारा

वॉशिंग्टन – अमेरिका व चीनमध्ये सध्या सुरू असणारे आर्थिक युद्ध हे दुसऱ्या महायुद्धापूर्वी निर्माण झालेल्या काळाची आठवण करून देणारे आहे, असे सांगून या आर्थिक युद्धाचे रुपांतर खऱ्या युद्धात होऊ शकते, असा गंभीर इशारा अमेरिकी गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी दिला. गेल्या काही महिन्यात कोरोनाची साथ, हॉंगकॉंग व इतर अनेक मुद्द्यांवरून अमेरिका व चीन मधील संबंध विकोपाला गेले असून, आपला प्रभाव कायम राखण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग युद्धही छेडू शकतात, असा दावा विश्लेषकांकडून करण्यात आला होता.

‘ब्रिजवॉटर असोसिएट्स’ या वित्तसंस्थेचे संस्थापक रे डॅलिओ अमेरिकेतील अब्जाधीश गुंतवणूकदार व अर्थतज्ञ म्हणून ओळखण्यात येतात. डॅलिओ यांनी ‘लिंक्डइन’ या सोशल नेटवर्किंग साइटवर प्रसिद्ध केलेल्या ‘द चेंजिंग वर्ल्ड ऑर्डर’ या लेखात अमेरिका-चीन युद्धाचा इशारा दिला आहे. या दोन देशांमध्ये सध्या सुरू असलेल्या आर्थिक युद्धाची तुलना त्यांनी दुसऱ्या महायुद्धापूर्वीच्या काळाशी केली आहे. आपण इतिहासकार नाही आणि आर्थिक युद्ध या प्रकाराची आपल्याला फारशी माहिती नाही त्यामुळे त्याबद्दल जाणून घेण्यासाठी आपण दुसऱ्या महायुद्धापूर्वीच्या काळाची माहिती घेतली, असे डॅलिओ यांनी आपल्या लेखात म्हटले आहे. १९२९-३० साली आलेली जागतिक महामंदी व त्यानंतर झालेले दुसरे महायुद्ध आणि सध्याच्या काळात काही प्रमाणात साधर्म्य असल्याचा दावा त्यांनी केला.

अमेरिका व चीनने परस्परांवर लादलेले निर्बंध, कर्जाचे वाढते बोजे व आर्थिक विषमता हे घटक दुसऱ्या महायुद्धापूर्वी घडलेल्या गोष्टींशी समांतर घटनाक्रम दाखविणारे असल्याकडे डॅलिओ यांनी आपल्या लेखात लक्ष वेधले आहे. जागतिक महामंदी व दुसरे महायुद्ध यात साधारण दशकभराचा कालावधी होता, याची आठवण करून देत त्यांनी गेल्या दशकातील मंदी व सध्याच्या स्थितीची जाणीव करून दिली. महायुद्ध व त्यापूर्वीच्या काळात देशातील जनतेकडून आक्रमक निर्णय घेणाऱ्या एकतंत्री नेतृत्वाकडे सत्ता दिली जाते, असा उल्लेख आहे डॅलिओ यांनी आपल्या लेखात केला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, चीनविरोधात सुरू केलेल्या व्यापारयुद्धाच्या पार्श्वभूमीवर, आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध विश्लेषक व तज्ञ या युद्धाचे रूपांतर प्रत्यक्ष युद्धात होईल असे इशारे देत आहेत. प्रसिद्ध गुंतवणूकदार मार्क मोबिअस यांनी, अमेरिका चीन व्यापार युद्धाचे रक्तरंजित परिणाम दिसून येतील असे सांगून युद्धाबाबत बजावले होते. तर व्यापारयुद्धामुळे अमेरिका व चीनमधील संबंध अधिकाधिक बिघडत चालले असून, त्यामुळे चीन ‘साऊथ चायना सी’वर ताबा मिळविण्याच्या योजनेला अधिक गती देईल व त्यातून संघर्ष पेटेल, असा इशारा ‘ब्रुनेल युनिव्हर्सिटी’तील प्राध्यापक फ्रान्सेस्को मॉस्कोन यांनी दिला होता. ब्रिटीश वृत्तसंस्था ‘बीबीसी’मधील चिनी वंशाच्या पत्रकार झाओयिन फेंग यांनीही, साऊथ चायना सीचा मुद्दा चीन व अमेरिकेत युद्ध घडविणारा ठरेल, असा दावा केला आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info