वॉशिंग्टन – अमेरिकेची बौद्धिक संपदा आणि खाजगी माहिती यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चीनला ह्युस्टनमधील वाणिज्य दूतावास तीन दिवसात बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या मॉर्गन ऑर्तागस यांनी दिली. दूतावास बंद करण्यासंदर्भातील हा आदेश म्हणजे अमेरिकेच्या प्रशासनाने चीनला दिलेला नवा धक्का ठरतो. अमेरिकेने दिलेल्या या धक्क्यावर चीनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, दूतावास बंद करण्याबाबत घेतलेला निर्णय राजकीय चिथावणीचा प्रयत्न असून त्याला खरमरीत प्रत्युत्तर मिळेल, असा इशारा दिला आहे.अमेरिकेने दिलेल्या आदेशानंतर, ह्युस्टनमधील चीनच्या दूतावासात आग लागल्याच्या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून याभोवतीचे गूढ अधिकच वाढले आहे.
कोरोनाव्हायरसच्या साथीसह साऊथ चायना सी, हॉंगकॉंग, व्यापारयुद्ध, सायबरहल्ले यासारख्या मुद्द्यांवरून अमेरिका व चीनमधील संबंध सध्या विकोपाला केले आहेत. चीनमधील वरिष्ठ नेत्यांनी अमेरिकेने शीतयुद्ध छेडल्याचे आरोप केले आहेत. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही महिन्यात चीनविरोधी निर्णयांचा धडाका लावला आहे. आवश्यकता भासल्यास चीनबरोबरील संबंध पूर्णपणे तोडून टाकण्याचा पर्याय कायम असल्याची धमकीही ट्रम्प यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर, अचानक दूतावास बंद करण्याचे आदेश देणे लक्ष वेधून घेणारे ठरते.
ह्युस्टनमधील दूतावास बंद करण्यासंदर्भातील पहिले वृत्त चीनकडून देण्यात आले. चीनच्या परराष्ट्र विभागाच्या सोशल मीडिया अकाउंटवर, अमेरिकेच्या आदेशाची माहिती देणारे तसेच त्याचा निषेध करणारे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. ‘अमेरिकेने ह्युस्टनमधील वाणिज्य दूतावास बंद करण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिकेने घेतलेला हा एकतर्फी निर्णय राजकीय चिथावणी देण्याचा प्रयत्न आहे. या निर्णयातून आंतरराष्ट्रीय कायदा, द्विपक्षीय संबंध तसेच चीन व अमेरिकेमध्ये झालेल्या राजनैतिक करारांचे उल्लंघन करण्यात आले आहे’, असे चीनच्या परराष्ट्र विभागाने म्हटले आहे. अमेरिकेने आपले आदेश मागे घ्यावेत असे आवाहनही या निवेदनात करण्यात आले आहे.
चीनकडून आलेल्या या निवेदनानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने दूतावास बंद करण्याच्या आदेशाला दुजोरा दिला. चीनच्या राजवटीकडून अमेरिकेच्या सार्वभौमत्वाचे होणारे उल्लंघन व अमेरिकी जनतेला देण्यात येणार्या धमक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. परराष्ट्र विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका स्वतंत्र निवेदनात, चीनकडून अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर हेरगिरीच्या कारवाया सुरू असल्याचा आरोपही ठेवण्यात आला आहे. मात्र ह्युस्टनमधील चिनी दूतावासाच्या बंदीमागे नक्की काय कारण आहे याचा खुलासा करण्यात आलेला नाही.
दूतावासावर बंदीचे वृत्त समोर येत असतानाच, मंगळवारी संध्याकाळी दूतावास असलेल्या इमारतीत आग लागण्याची घटना उघड झाली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडिया तसेच स्थानिक वृत्तवाहिन्यांवर प्रसिद्ध झाला आहे. ह्युस्टनमधील अग्निशमन दलानेही या वृत्ताला दुजोरा दिला. दूतावासातील कर्मचारी व सुरक्षारक्षकांनी इमारतीत जाण्यापासून रोखल्याचा आरोपही अग्निशमन दलाकडून करण्यात आला आहे. चीनचे दूतावासातील अधिकारी महत्त्वाची व गोपनीय कागदपत्रे जाळत असल्याच्या अफवाही यावेळी पसरल्या होत्या. दूतावासात लागलेली आग व अग्निशमन दलाला नाकारलेली परवानगी, यामुळे त्यावर टाकण्यात आलेल्या बंदीमागचे गूढ अधिकच वाढले आहे.
दरम्यान, अमेरिकेचा चीनविरोधातील हा राजनैतिक संघर्ष अधिक तीव्र होत जाण्याचे संकेत मिळत आहेत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ सध्या युरोप दौऱ्यावर आहेत. चीनला धडा शिकवण्यासाठी अमेरिकेने आपल्या मित्रदेशांची आघाडी सक्रिय करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. यात युरोपीय देशांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी, ब्रिटन व डेन्मार्कच्या नेत्यांची घेतलेली भेट आणि चीनच्या कारवायांविरोधात घेतलेली आक्रमक भूमिका याला दुजोरा देणारी ठरते. यावेळी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी कोरोना साथीसह ‘५जी’ तंत्रज्ञान, हॉंगकॉंग, उघुरवंशीयांवरील अत्याचार यासारख्या मुद्द्यांवरून चीनला धारेवर धरले. ब्रिटन दौऱ्यात, पॉम्पिओ यांनी हॉंगकॉंगच्या लोकशाहीवादी आंदोलनाचे नेते नॅथन लॉ यांची घेतलेली भेट लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. ही भेट म्हणजे, अमेरिकेने हॉंगकॉंग कायद्याच्या मुद्द्यावरून चीनला दिलेला संदेश असल्याचे मानले जाते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |