वॉशिंग्टन – चीनकडून अमेरिकेत सुरू असलेल्या हेरगिरी प्रकरणात पाचजणांना अटक करण्यात आले असून त्यातील चारजण चीनच्या लष्कराशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. पाचवी व्यक्ती सिंगापूरची नागरिक असून त्याने आपण चीनच्या गुप्तचर यंत्रणेसाठी काम करीत असल्याची कबुली दिली आहे. याच पार्श्वभूमीवर, अमेरिकेच्या आदेशानंतर चीनने आपला ह्युस्टनमधील दूतावास बंद केला असून तपासयंत्रणा ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ अर्थात ‘एफबीआय’ने त्याचा ताबा घेतल्याचे सांगण्यात येते. एकामागोमाग घडलेल्या या घडामोडीनंतर अमेरिका व चीनमध्ये शीतयुद्ध भडकल्याचे दावे प्रसारमाध्यमांमधून होऊ लागले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या चार वर्षांपासून चीनविरोधात जोरदार मोहीम उघडली होती. अमेरिका-चीन व्यापारयुद्ध हे त्याचे ठळक उदाहरण असून त्याव्यतिरिक्त सायबरहल्ले, चिनी गुंतवणूक, हेरगिरी यासारख्या अनेक मुद्द्यांवर ट्रम्प यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. कोरोनाच्या साथीनंतर ट्रम्प यांनी चीनविरोधातील भूमिकेची धार अधिक तीव्र केली असून थेट राजनैतिक संघर्ष छेडला आहे. गेल्या काही महिन्यात ट्रम्प प्रशासनाने हुवेई, हॉंगकॉंग, साऊथ चायना सी व तैवान यासारख्या मुद्द्यांवरून चीनला एकापाठोपाठ एक धक्के दिले आहेत. दूतावासावर बंदी व चिनी हेरांना करण्यात आलेली अटक त्याचा पुढचा टप्पा मानला जातो.
गेल्या महिन्याभरात ट्रम्प प्रशासनातील सर्वोच्च अधिकाऱ्यांनी चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीविरोधात एकामागोमाग आरोपांच्या फैरी झाडून, यापुढे दोन देशांमधील संबंध सामान्य राहणार नाहीत असे स्पष्ट संकेत दिले होते. चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीकडून अमेरिकेत चाललेल्या कारवायांचा पर्दाफाश करत त्या विरोधात कठोर कारवाईची पावले उचलली जातील, असा इशाराही या अधिकाऱ्यांनी दिला होता. तीन दिवसात ह्युस्टनमधील दूतावास बंद करण्याबाबत दिलेला आदेश आणि त्याचवेळी पाच चिनी हेरांना झालेली अटक ही लक्ष वेधून घेणारी कारवाई ठरते.
अमेरिकेचा न्याय विभाग व तपास यंत्रणा एफबीआयने या सर्व हेरांवर आरोपपत्र दाखल केले असून चारजण अमेरिकी विद्यापीठांमध्ये संशोधनासाठी दाखल झाल्याचे उघड झाले आहे. त्यात कॅलिफोर्निया, स्टॅनफोर्ड व इंडियाना युनिव्हर्सिटीचा समावेश आहे. शिन वँग, चेन सोंग, काईकाई झाओ व जुआन तांग अशी या चिनी हेरांची नावे असून चौघेही चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’चा भाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील जुआन तांग या संशोधिकेला झालेली अटक महत्त्वाची ठरली आहे. जुआन तांग चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीची सदस्य असून चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’त काम केले आहे. मात्र अमेरिकेचा व्हिसा मिळविताना तिने ही माहिती दडविल्याची बाब उघड झाली होती.
गेल्या महिन्यात एफबीआयने यासंदर्भात तांगची चौकशीही केली होती. मात्र त्यानंतर आपली अटक टाळण्यासाठी जुआन तांगने सॅनफ्रान्सिस्कोमधील चीनच्या दूतावासात आश्रय घेतल्याचे मानले जात होते. दूतावास यासंदर्भातील खरी माहिती देण्याचे टाळत असल्याचा आरोप एफबीआयने केला होता. या पार्श्वभूमीवर तिला झालेली अटक महत्त्वाची ठरते. तांगला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येईल, अशी माहिती अमेरिकी अधिकाऱ्यांनी दिले आहे. याच पार्श्वभूमीवर, एफबीआयने अमेरिकेतील तब्बल २५ शहरांमध्ये वास्तव्य करणाऱ्या चिनी विद्यार्थी व संशोधकांच्य चौकशीची मोहीम हाती घेतल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.
चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’शी संबंधित प्रकरणाव्यतिरिक्त सिंगापूरच्या एका नागरिकालाही चीनसाठी हेरगिरी करत असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ‘जुन वेई येओ’ असे हेराचे नाव असून अमेरिकेत सुरू केलेल्या राजकीय सल्लागार संस्थेच्या माध्यमातून चीनच्या गुप्तचर यंत्रणेसाठी काम करीत असल्याची कबुली येओ यांनी दिली. २०१५ ते २०१९ या कालावधीत अमेरिकेच्या संरक्षणक्षेत्रासह सरकारी विभागातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांकडून गोपनीय माहिती मिळविण्यासाठी सल्लागार संस्थेचा वापर केल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी चीनने ह्युस्टन शहरातील आपला दूतावास बंद केल्याचे समोर आले आहे. चीनच्या कर्मचाऱ्यांनी ध्वज काढून दूतावास बंद केल्यानंतर काही वेळातच अमेरिकी तपासयंत्रणा एफबीआयच्या पथकाने इमारतीचा ताबा घेतल्याचे सांगण्यात येते. गुरुवारी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी, चीनच्या सत्ताधारी राजवटीवर घणाघाती प्रहार करताना ह्युस्टनमधील दूतावासाचा वापर हेरगिरीचे केंद्र म्हणून करण्यात येत होता असा ठपका ठेवला होता. दूतावास व हेरगिरी प्रकरणाच्या माध्यमातून अमेरिका आणि चीनमध्ये सुरू झालेला संघर्ष हे दोन देशांमध्ये शीतयुद्ध पेटल्याचे संकेत आहेत, असा दावा अमेरिकी प्रसारमाध्यमे व विश्लेषकांनी केला आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |