अमेरिका तैवानला ६६ प्रगत ‘एफ-१६व्ही’ लढाऊ विमाने पुरविणार – शुक्रवारी कराराची घोषणा

अमेरिका तैवानला ६६ प्रगत ‘एफ-१६व्ही’ लढाऊ विमाने पुरविणार – शुक्रवारी कराराची घोषणा

वॉशिंग्टन/तैपेई – चीनच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने तैवानला ६६ प्रगत ‘एफ-१६व्ही’ लढाऊ विमाने पुरवण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षी तैवानला आधुनिक लढाऊ विमाने पुरविण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली होती. अमेरिकी आरोग्यमंत्र्यांच्या तैवान दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या कराराची घोषणा करून अमेरिकेने चीनला अजून एक जबरदस्त धक्का दिल्याचे दिसत आहे. अमेरिकेच्या घोषणेवर चिनी प्रसारमाध्यमे व विश्लेषकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून हा करार म्हणजे चिथावणीचा अजून एक प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर चीनची सत्ताधारी कम्युनिस्ट राजवट साऊथ चायना सी क्षेत्रातील भागांवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करेल, असा इशारा अमेरिकेच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी दिला होता. त्यापूर्वी तसेच नंतरच्या काळात चीनकडून तैवानविरोधातील हालचाली जास्तच वाढल्याचे दिसून येत आहे. मे महिन्याच्या अखेरीस चीनमध्ये झालेल्या एका बैठकीत कम्युनिस्ट पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी तसेच लष्करी अधिकाऱ्यांनी तैवानवर हल्ला चढवण्यासाठी हीच वेळ योग्य असल्याची आग्रही भूमिका मांडली होती. चीनच्या तैवानविरोधातील कारवाया अधिक आक्रमक होण्यास सुरुवात झाल्याचेही गेल्या काही आठवड्यात समोर आले आहे.

दोन दिवसांपूर्वी चीनच्या संरक्षणदलांनी तैवानच्या आखातात मोठ्या लष्करी सरावाचे आयोजन केले होते. सार्वभौमत्वाची सुरक्षा व सातत्याने देण्यात येणार्‍या चिथावण्यांविरोधातील सज्जता या उद्देशाने सराव आयोजित करण्यात आला होता, अशी माहिती चीनच्या प्रवक्त्यांनी दिली होती. गेल्या महिन्याभरात चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’कडून तैवानच्या हद्दीनजीक आयोजित करण्यात आलेला हा चौथा मोठा सराव मानला जातो. हे सराव म्हणजे तैवानवर आक्रमण करण्याची रंगीत तालीम असल्याचे दावेही चीनच्या प्रसारमाध्यमांनी केले आहेत. तैवानकडूनही याला दुजोरा देण्यात आला असून चीन आपल्यावर हल्ल्याची तयारी करीत असल्याची चिंता तैवानी मंत्री व अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

चीनकडून तैवानविरोधात सुरू झालेल्या आक्रमक हालचालींना प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेनेही जोरदार तयारी सुरू केली असून ‘एफ-१६व्ही’चा करार त्याला स्पष्ट दुजोरा देणारा ठरतो. यापूर्वी १९९२ साली अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांनी तैवानला तब्बल १५० ‘एफ-१६’ लढाऊ विमाने देण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर झालेला हा सर्वात मोठा करार असून कराराचे मूल्य आठ ते दहा अब्ज डॉलर्स असल्याचे सांगण्यात येते. येत्या पाच ते सहा वर्षांत तैवानला ही प्रगत लढाऊ विमाने मिळतील, असे सांगण्यात येते. तैवानने सध्या आपल्या हवाईदलात सक्रिय असणाऱ्या अमेरिकी लढाऊ विमानांच्या आधुनिकीकरणालाही मान्यता दिली आहे.

गेल्या काही महिन्यात, अमेरिकेने तैवानला मोठ्या प्रमाणात संरक्षणसाहित्य पुरविण्यास सुरुवात केली आहे. त्यात लढाऊ विमानांसह ‘हार्पून’ क्षेपणास्त्रे, ‘पॅट्रिऑट मिसाईल सिस्टीम’ तसेच टोर्पेडोचा समावेश आहे. त्याचवेळी अमेरिकेने आपल्या विमानवाहू युद्धनौकांसह विनाशिका, बॉम्बर्स, ड्रोन्स व टेहळणी विमानांची तैनाती आणि वावरही वाढविला आहे. तैवानवरील संभाव्य हल्ल्याविरोधात अमेरिकेला लष्करी कारवाईची परवानगी देणारा ‘तैवान इन्व्हेजन प्रिव्हेंशन ॲक्ट’ अमेरिकेच्या संसदेत दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे आरोग्यमंत्री अलेक्स अझार तैवान दौऱ्यावर दाखल झाले होते. १९७९ साली तैवानशी राजनैतिक संबंध तोडल्यानंतर अमेरिकेकडून या देशाला भेट देणारे अझार हे सर्वोच्च राजनैतिक अधिकारी व नेते ठरले होते.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info