चीनला रोखण्यासाठी अमेरिका व ऑस्ट्रेलिया सामरिक सहकार्य वाढविणार – हायपरसॉनिक्स, मिसाईल डिफेन्ससह अंतराळ क्षेत्रातील भागीदारीवर भर

चीनला रोखण्यासाठी अमेरिका व ऑस्ट्रेलिया सामरिक सहकार्य वाढविणार – हायपरसॉनिक्स, मिसाईल डिफेन्ससह अंतराळ क्षेत्रातील भागीदारीवर भर

वॉशिंग्टन, दि.२९ – साऊथ चायना सीवरील चीनचे सर्व दावे धुडकावून त्यांची कारस्थाने हाणून पाडण्यासाठी सामरिक सहकार्य भक्कम करण्यावर अमेरिका व ऑस्ट्रेलियामध्ये एकमत झाले आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्राच्या स्थैर्यासाठी दोन्ही देशांची संरक्षणदले एकत्रितरित्या काम करणार असून, त्यासाठी गोपनीय करारावर स्वाक्षऱ्या झाल्याची माहिती संयुक्त निवेदनात देण्यात आली. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा सहभाग असलेल्या ‘फाईव्ह आईज’, ‘क्वाड’ व ‘टीआयपी’ या गटांसह चीनविरोधात नवी आघाडी उघडण्याचे संकेतही देण्यात आले आहेत. सामरिक सहकार्याची व्याप्ती वाढविताना हायपरसॉनिक्स, मिसाईल डिफेन्स, इलेक्ट्रॉनिक व अंडरसी वॉरफेअर, सायबर तसेच अंतराळ क्षेत्रातील भागीदारीवर भर देण्याची ग्वाही अमेरिका व ऑस्ट्रेलियाने दिली आहे.

अमेरिका व ऑस्ट्रेलिया

मंगळवारी झालेल्या ‘ऑसमिन’च्या बैठकीनंतर अमेरिका व ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र तसेच संरक्षणमंत्र्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यात गेली काही वर्षे इंडो-पॅसिफिक क्षेत्र अस्थिर करण्यासाठी कारवाया सुरू असल्याचे सांगून, ही बाब दोन्ही देशांसाठी चिंताजनक असल्याचा उल्लेख करण्यात आला. इंडो-पॅसिफिकची सुरक्षितता तसेच नियमांवर आधारित जागतिक व्यवस्था कायम राखण्यासाठी अमेरिका व ऑस्ट्रेलियाने आपल्या सहकार्याची व्याप्ती अधिक वाढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क एस्पर यांनी, साऊथ चायना सीमध्ये ऑस्ट्रेलियाबरोबर नुकताच झालेला नौदल सराव हा चीनसाठी स्पष्ट संदेश होता, असे बजावले. तर अमेरिकेबरोबर सामरिक सहकार्य करण्याचा निर्णय इंडो-पॅसिफिकमधील विघातक कारवाया रोखण्यासाठीच आहे, असे सांगून ऑस्ट्रेलियाच्या संरक्षणमंत्री लिंडा रेनॉल्ड्स यांनी चीनला इशारा दिला.

अमेरिका व ऑस्ट्रेलिया

अमेरिका व ऑस्ट्रेलियाने प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनाचा संपूर्ण भर इंडो-पॅसिफिक क्षेत्रावरच ठेवण्यात आला आहे. त्यात ‘इंडो पॅसिफिक रिकव्हरी’, ‘इंडो पॅसिफिक सिक्युरिटी’, ‘रिजनल कोऑर्डिनेशन’, ‘इंडो पॅसिफिक प्रोस्परिटी’ व ‘बायलॅटरल डिफेन्स कोऑपरेशन’ या मुद्द्यांचा समावेश आहे. हॉंगकॉंग, तैवान व उघुरवंशीयांवरील अत्याचाराचा उल्लेख करून चीनच्या वर्चस्ववादी धोरणाकडे लक्ष वेधण्यात आले आहे. तर कोरोनाव्हायरसची साथ, सायबरहल्ले, ५जी तंत्रज्ञान, ‘डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन’ यांचा उल्लेख करताना चीनचे थेट नाव न घेता निशाणा साधण्यात आला आहे. त्याचवेळी अण्वस्त्रप्रसारबंदी संदर्भातील नव्या करारात चीननेही सहभागी व्हावे, ही अमेरिकेची भूमिका ऑस्ट्रेलियाने उचलून धरली आहे.

साऊथ चायना सीवरील चीनचे सर्व दावे आपण धुडकावून लावत असल्याचा स्पष्ट उल्लेख अमेरिका व ऑस्ट्रेलियाने संयुक्त निवेदनात केला आहे. त्याचवेळी या मुद्द्यावर २०१६ साली आंतरराष्ट्रीय लवादाने दिलेला निर्णय हाच अंतिम व एकमेव तोडगा असल्याची स्पष्ट भूमिका दोन्ही देशांनी घेतली आहे. साऊथ चायना सीबाबत ‘आसियन’ने जाहीर केलेल्या निवेदनाला ठाम शब्दात समर्थन देऊन व्हिएतनामची प्रशंसा करण्यात आली आहे. अमेरिका व ऑस्ट्रेलियाने कायम ठेवलेला हा कठोर पवित्रा चीनसमोरील आव्हाने अधिक वाढविणारा ठरू शकतो.

अमेरिका व ऑस्ट्रेलिया

इंडो-पॅसिफिकच्या सुरक्षेसाठी सामरिक सहकार्याची व्याप्ती वाढविताना, ‘प्रिन्सिपल्स ऑन अलायन्स डिफेन्स कोऑपरेशन अँड फोर्स पोश्चर प्रायोरीटीज’ नावाच्या गोपनीय करारावर स्वाक्षरी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. या करारानुसार, ‘फोर्स पोश्चर वर्किंग ग्रुप’ची स्थापना करण्यात आली आहे. हा गट दोन्ही देशांच्या इंडो-पॅसिफिकमधील संरक्षण तैनातीची रूपरेषा ठरवेल, असे सांगण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाच्या डार्विनमधील संरक्षणतळ दोन्ही देशांच्या इंडो-पॅसिफिकमधील लष्करी सहकार्याचे केंद्र राहणार असून, या भागात अमेरिकेकडून ‘स्ट्रॅटेजिक मिलिटरी फ्युएल रिझर्व्ह’ उभारण्यात येणार आहे. मात्र साऊथ चायना सीमधील स्वतंत्र तैनाती अथवा मोहिमेबाबत ऑस्ट्रेलियाने ठोस निर्णय घेण्याचे टाळले आहे. इतर मित्रदेशांबरोबर चर्चा करून यासंदर्भातील धोरण निश्चित केले जाईल, असे संकेत ऑस्ट्रेलियाने दिले.

चीनला धारेवर धरीत इंडो-पॅसिफिकमधील सहकार्य वाढविण्याऱ्या अमेरिका व ऑस्ट्रेलियाविरोधात चीनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली. ‘साऊथ चायना सीसह इतर सर्व मुद्द्यांवरून चीनवर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे आहेत. अमेरिका व ऑस्ट्रेलियाने प्रसिद्ध केलेले निवेदन चीनच्या अंतर्गत व्यवहारातील हस्तक्षेप आहे. चीनवर दबाव टाकण्याचे कोणतेही प्रयत्न यशस्वी होणार नाहीत’, अशी टीका चीनकडून करण्यात आली आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info