साऊथ चायना सीच्या मुद्द्यावर अमेरिका-चीन तणाव चिघळला

साऊथ चायना सीच्या मुद्द्यावर अमेरिका-चीन तणाव चिघळला

वॉशिंग्टन/बीजिंग – साऊथ चायना सीच्या मुद्द्यावर अमेरिका व चीनमधील तणाव अधिकच चिघळल्याचे दिसत आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने संपूर्ण साऊथ चायना सी चीनच्याच मालकीचा असल्याची दर्पोक्ती करीत युद्धनौका व लढाऊ विमानांची तैनाती वाढविली आहे. त्याचवेळी अमेरिकेने साऊथ चायना सी क्षेत्रात टेहळणी विमानांच्या हालचाली वाढविल्या असून आग्नेय आशियाई देशांच्या सुरक्षेसाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या घडामोडींमुळे साऊथ चायना सीमध्ये अमेरिका व चीनदरम्यान युद्धाची शक्यता बळावल्याचा दावा विश्लेषक करीत आहे.

गेल्या आठवड्यात, चीनने आपल्या सागरी वाहतुकीशी निगडित नियमांमध्ये महत्त्वाचा बदल केला आहे. त्यानुसार चीनच्या हैनान प्रांतापासून साऊथ चायना सीमधील पॅरासेल आयलंडपर्यंतचा भाग यापुढे चीनच्या किनारी क्षेत्राचा भाग (कोस्टल) म्हणून ओळखण्यात येणार आहे. चीनने १९७४ साली पॅरासेल आयलंडवर ताबा मिळविल्यानंतर त्याचा उल्लेख चीनच्या सागरी किनाऱ्यापासून काही अंतरावर असलेला भाग (ऑफशोअर) म्हणून केला होता. ‘ऑफशोअर’ऐवजी ‘कोस्टल’ असा बदल करून चीनने पुन्हा एकदा साऊथ चायना सी क्षेत्रावर आपलाच हक्क असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने ‘साऊथ चायना सी’ क्षेत्रातील सुमारे ८० भौगोलिक ठिकाणांना चिनी नावे देऊन ती आपल्याच मालकीची असल्याचा आव आणला होता.

साऊथ चायना सी क्षेत्राला स्थानिक कायदे लागू करण्यापाठोपाठ चीनने या क्षेत्रातील लष्करी तैनातीही वाढविण्यास सुरुवात केली आहे. फिलिपाईन्सनजिक असलेल्या ‘मिसचिफ रीफ’ या कृत्रिम बेटावर चीनने आपल्या दोन प्रगत विनाशिका तैनात केल्या आहेत. त्याचवेळी ‘स्प्राटले आयलंड’ क्षेत्रातील ‘सुबी रीफ’ नावाने ओळखण्यात येणाऱ्या कृत्रिम बेटांवर ‘सुखोई ३०एमकेके’ या लढाऊ विमानांच्या तैनातीसही सुरुवात झाल्याचा दावा करण्यात आला आहे. याच भागात चीनने आपल्या तटरक्षक दलाची काही जहाजेही धाडल्याचे सांगण्यात येते.

गेल्या दोन दिवसात, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सदर्न, नॉर्दर्न तसेच ईस्टर्न कमांडने लढाऊ विमानांसह बॉम्बर्स, फ्युएल टँकर्स, टेहळणी विमाने व ‘अर्ली वॉर्निंग एअरक्राफ्टस्’चा सराव घेतल्याची माहिती चीनच्या पीपल्स डेली या सरकारी दैनिकाने दिली.

चीनकडून आक्रमक हालचाली सुरू असतानाच अमेरिकेनेही वेगाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. साऊथ चायना सी क्षेत्रात अमेरिकेच्या टेहळणी व लढाऊ विमानांसह ड्रोन्सच्या फेऱ्या वाढल्याचे समोर आले आहे. फक्त जुलै महिन्यात अमेरिकेच्या विमानांनी सुमारे ७० वेळा साऊथ चायना सीमध्ये मोहिमा राबविल्याची माहिती चीनमधील अभ्यासगटाने दिली आहे. तैवानच्या हवाई हद्दीतही अमेरिकेची विमाने दिवसातून किमान दोन ते तीन वेळा घिरट्या घालीत असल्याचा दावा चिनी अभ्यासगटाने केला आहे.

त्याचवेळी अमेरिकेने साऊथ चायना सीचा भाग असलेल्या आग्नेय आशियाई देशांशी चर्चाही सुरू केली आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी सोमवारी सिंगापूर तसेच इंडोनेशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांशी यांची फोनवरून चर्चा केल्याची माहिती परराष्ट्र विभागाने दिली. या चर्चेत, चीनच्या कारवायांवर टीका करतानाच, चीनकडून असलेल्या धोक्यांविरोधात आग्नेय आशियाई देशांच्या सुरक्षेसाठी अमेरिका सर्व ते सहाय्य करील, अशी ग्वाही अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांनी दिली. चीनची राजवट या देशांवर दबाव टाकत असल्याचे दावे समोर येत असताना अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांनी केलेली ही चर्चा महत्त्वाची ठरते.

English      हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info