रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याकडून ‘सरमात मिसाईल’ व ‘एस-500’च्या तैनातीबाबत घोषणा

मॉस्को/किव्ह – रशिया-युक्रेन युद्ध दीर्घकाळपर्यंत चालेल असे संकेत मिळत असतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी ‘सरमात आंतरखंडीय क्षेपणास्त्र’ व ‘एस-500 डिफेन्स सिस्टिम’च्या तैनातीची घोषणा केली आहे. क्षेपणास्त्र व डिफेन्स सिस्टिम या वर्षाच्या अखेरपर्यंत संरक्षणदलात सक्रिय होतील, असे पुतिन यांनी मंगळवारी जाहीर केले. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपासून सुरू झालेल्या युक्रेनच्या लष्करी मोहिमेत रशियन संरक्षणदलांनी हायपरसोनिक क्षेपणास्त्रे तसेच लेझर वेपन्सचा वापर केल्याचे यापूर्वी समोर आले होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची घोषणा लक्ष वेधून घेणारी ठरते.

गेल्या दीड महिन्यात रशियाने युक्रेनमधील मोहिमेत चांगले यश मिळविल्याचे समोर आले आहे. डोन्बास क्षेत्रातील महत्त्वाच्या जागा व शहरे ताब्यात घेणाऱ्या रशियन फौजांनी युक्रेनी लष्कराची दैना उडविली आहे. यापूर्वी माघार घेणे भाग पडलेल्या अनेक शहरांवर रशियाने नव्या दमाने आक्रमक हल्ले सुरू केले आहेत. युक्रेनच्या ईशान्य भागात असलेल्या खार्किव्हपासून ते दक्षिण टोकाला असलेल्या ओडेसापर्यंतच्या अनेक आघाड्यांवर क्षेपणास्त्रे, रॉकेट्स तसेच तोफांचा भडीमार सुरू आहे. त्यामुळे युक्रेन चांगलाच अडचणीत आला असून रशियाशी युद्ध करणे दिवसेंदिवस अवघड होत चालल्याच्या प्रतिक्रिया युक्रेनी नेतृत्त्वाकडून समोर येत आहेत.

या पार्श्वभूमीवर, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी ‘सरमात’ या अण्वस्त्रवाहू आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रासह ‘एस-500’च्या तैनातीबाबत घोषणा करणे महत्त्वाचे ठरते. सुरुवातीच्या काळात रशियन संरक्षणदले युक्रेनमधील युद्ध जास्त काळ लढू शकणार नाहीत, असे दावे करण्यात येत होते. रशियन संरक्षणदलांचे मोठे नुकसान झाले असल्याचेही सांगण्यात येत होते. मात्र गेल्या काही दिवसात परिस्थिती बदलली असून रशिया किमान वर्षभर युक्रेनचा संघर्ष सुरू ठेऊ शकेल, अशी माहिती समोर आली आहे. संघर्ष लांबल्यास रशिया अधिक प्रगत क्षेपणास्त्रे व संरक्षणयंत्रणांच्या सहाय्याने युक्रेन तसेच त्याला सहाय्य करणाऱ्या मित्रदेशांचे मोठे नुकसान घडवू शकतो, असे संकेत मिळू लागले आहेत.

रशियाचे सरमात अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र 16 हजार मैल प्रतितास इतक्या वेगाने प्रवास करते व 11,200 मैल अंतरावरील लक्ष्य भेदण्याची क्षमता बाळगून आहे. तर ‘एस-500 एअर डिफेन्स सिस्टिम’ ही जगातील सर्वात प्रगत हवाईसुरक्षा यंत्रणा असल्याचे सांगण्यात येते. यातील क्षेपणास्त्रांचा पल्ला 600 किलोमीटर्सचा असून ही यंत्रणा हायपरसोनिक क्षेपणास्त्रांनाही भेदू शकते, असा दावा रशियाकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, रशियाने बुधवारी लिशिचान्स्क, खेरसन तसेच मायकोलेव्ह शहरांमध्ये हल्ले चढविल्याची माहिती संरक्षणदलांच्या प्रवक्त्यांनी दिली. लिशिचान्स्कजवळील महत्त्वाच्या गावावर रशियन लष्कराने नियंत्रण मिळविले असून शहराचा बचाव करणे कठीण बनल्याचा दावा युक्रेनी अधिकाऱ्यांनी केला.

English        हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info