त्रिपोली – लिबियात भडकत चाललेला संघर्ष आणि येथील परदेशी जवानांची वाढती तैनाती चिंताजनक आहे. या परदेशी जवानांच्या वाढत्या सहभागामुळे लिबियातील संघर्ष अधिकच प्रदिर्घ होईल, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी दिला. थेट उल्लेख केला नसला तरी तुर्की, इजिप्त आणि रशियाला उद्देशून ओब्रायन यांनी हा इशारा दिल्याचा दावा केला जातो. दरम्यान, लिबियात शस्त्रास्त्रांची तस्करी होऊ नये, यासाठी जर्मनीने भूमध्य समुद्रातील तैनातीसाठी २५० जवानांचा सहभाग असलेली विनाशिका रवाना केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून लिबियात भडकलेले गृहयुद्ध आणि या देशातील परदेशी जवानांच्या वाढत्या तैनातीला ओब्रायन यांनी लक्ष्य केले. काही परदेशी शक्ती लिबियातील गृहयुद्धाचा फायदा घेण्याच्या तयारीत असून यामुळे क्षेत्रीय स्थैर्य आणि जागतिक व्यापार संकटात येईल, अशी चिंता अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी व्यक्त केली. लिबियातील संघर्षात परदेशी जवानांबरोबर मर्सिनरीज् अर्थात कंत्राटी जवान आणि दहशतवाद्यांचा वाढता सहभाग या देशातील संघर्ष अधिकच तीव्र करीत आहे. आपल्या सार्वभौमत्त्वाच्या सुरक्षेसाठी आणि देशाच्या उभारणीसाठी लिबियन जनता एकजूट झाली तरच लिबियाचा विजय होईल. इतर कुठलाही गट या संघर्षात यशस्वी होणार नसल्याचे सांगून ओब्रायन यांनी लिबियन जनतेला एकत्र येण्याचे आवाहन केले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही दिवसांमध्ये लिबियाप्रकरणी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रोन, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतेह अल सिसी आणि संयुक्त अरब अमिरातचे (युएई) क्राऊन प्रिन्स मोहम्म्द बिन झईद यांच्याशी चर्चा केली आहे. ट्रम्प यांनी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांच्याशी चर्चा केली नसल्याचे आंतरराष्ट्रीय माध्यमे लक्षात आणून देत आहेत. लिबियातील संघर्षात तुर्की सराज सरकारचे तर फ्रान्स, इजिप्त, युएई यांच्यासह सौदी अरेबिया हफ्तार बंडखोरांचे समर्थन करीत आहे. अमेरिकेने या संघर्षात उघडपणे कुठल्याही गटाची बाजू घेतलेली नाही. पण गेल्या काही दिवसांपासून रशिया तसेच तुर्कीकडून लिबियात सुरू असलेल्या लष्करी हालचालींवर अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे.
गेल्या दोन आठवड्यात तुर्की तसेच इजिप्तने लिबियात आपले लष्कर उतरविण्याची घोषणा केली आहे. तर तुर्की, रशिया लिबियात मर्सिनरीज् तैनात करीत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. या व्यतिरिक्त तुर्की लिबियातील राजवट आणि तुर्की संलग्न बंडखोरांना शस्त्रसज्ज करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा रवाना करीत असल्याचेही समोर आले होते. लिबियातील ही अवैध शस्त्रतस्करी रोखण्यासाठी जर्मनीने भूमध्य समुद्रातील तैनातीसाठी अडीचशे जवानांनी सज्ज असलेली विनाशिका रवाना केली आहे. युरोपिय महासंघाने भूमध्य समुद्रात पाच महिन्यांसाठी विशेष नौदल मोहीम घोषित केली असून जर्मन विनाशिकेची तैनाती त्याचाच एक भाग ठरते.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी लिबियातील ’मिस्राता’ आंतरराष्ट्रीय विमानतळावर संशयास्पदरित्या आग भडकली. या आगीचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. पण सदर विमानतळाचा निम्मा भाग तुर्कीच्या लष्कराच्या ताब्यात असल्याचे लिबियन माध्यमे लक्षात आणून देत आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |