साऊथ चायना सीमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका व चीनकडून अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रांच्या चाचण्या

साऊथ चायना सीमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका व चीनकडून अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रांच्या चाचण्या

वॉशिंग्टन/बीजिंग – अमेरिका व चीनमध्ये साऊथ चायना सीच्या मुद्द्यावर युद्ध भडकू शकते, असे इशारे दिले जात असतानाच दोन्ही देशांनी एकापाठोपाठ एक अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेतल्याचे समोर आले आहे. अमेरिकेने सोमवारी ‘मिनटमॅन ३’ या आंतरखंडीय अण्वस्त्रवाहू बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतल्याचे जाहीर केले. त्यापूर्वी चीननेही ‘डाँगफेंग-२६’ व ‘डाँगफेंग-१६’ या अण्वस्त्रवाहू बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेतल्याची घोषणा केली आहे. आम्ही युद्धासाठी ‘हाय अलर्ट स्टेट’मध्ये आहोत, असा इशारा चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने या चाचण्यांनंतर दिला आहे.

क्षेपणास्त्रांच्या चाचण्या

मंगळवारी ४ ऑगस्टला स्थानिक प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री १२ वाजून २१ मिनिटांनी कॅलिफोर्नियातील ‘व्हॅन्डनबर्ग एअरफोर्स बेस’वरून ‘मिनटमॅन ३’ या आंतरखंडीय अण्वस्त्रवाहू बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. या चाचणीत अमेरिकी हवाईदलाच्या ‘ग्लोबल स्ट्राईक कमांड’ने ‘एअरबोर्न लॉंच कंट्रोल सिस्टीम’ व तीन ‘टेस्ट रिएंट्री व्हेईकल्स’चा वापर केल्याची माहिती दिली आहे. चाचणीदरम्यान हे अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र सुमारे ४ हजार २०० मैलांचा प्रवास करून पॅसिफिक महासागरातील मार्शल आयलँड भागात कोसळल्याचे अमेरिकी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. अमेरिकेकडून आण्विक प्रत्युत्तरासाठी वापरण्यात येणारी क्षेपणास्त्र यंत्रणा सुरक्षित, विश्वासार्ह व प्रभावी असल्याचे या चाचणीतून सिद्ध झाले, अशी ग्वाही टेस्ट स्क्वाड्रन कमांडर कर्नल ओमर कोलबर्ट यांनी दिली.

१९७० सालापासून अमेरिकेच्या ‘न्यूक्लिअर ट्रायड’चा भाग असणाऱ्या ‘मिनटमॅन ३’ या आंतरखंडीय अण्वस्त्रवाहू बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा पल्ला सुमारे १० हजार किलोमीटर्सपर्यंत आहे. ध्वनीच्या तब्बल २३ पट अर्थात ‘मॅक २३’चा सर्वाधिक वेग गाठू शकणाऱ्या या क्षेपणास्त्रावर ‘थर्मोन्यूक्लिअर वॉरहेड्स’ तैनात करण्यात येतात. सध्या अमेरिकेच्या ताफ्यात ४०० ‘मिनटमॅन ३’ आंतरखंडीय अण्वस्त्रवाहू बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे असल्याचे सांगण्यात येते. चीनकडून अण्वस्त्रक्षमता वाढविण्याच्या हालचाली सुरू असताना अमेरिकेने घेतलेली ही चाचणी महत्त्वाची ठरते.

क्षेपणास्त्रांच्या चाचण्या

अमेरिकेने घेतलेल्या अण्वस्त्रचाचणीच्या पार्श्वभूमीवर, चीननेही दोन अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रांची चाचणी घेतल्याचे समोर आले आहे. चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या ‘रॉकेट फोर्स’ने ‘डाँगफेंग-२६’ व ‘डाँगफेंग-१६’ या अण्वस्त्रवाहू बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेतल्याचे माहिती दिली आहे. या चाचणीचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध करण्यात आले असले, तरी चाचणी नक्की कधी घेतली याची माहिती देण्यात आलेली नाही. चिनी लष्कराशी संबंधित असलेल्या ‘८१.सीएन’ या वेबसाईटवर त्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.

आम्ही युद्धासाठी ‘हाय अलर्ट स्टेट’मध्ये आहोत आणि अचूक व जलद प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहोत, असा इशाराही रॉकेट फोर्सचे कमांडर लियु यांग यांनी यावेळी दिला. ‘डाँगफेंग-२६’ हे मध्यम पल्ल्याचे अण्वस्त्रवाहू बॅलिस्टिक मिसाईल असून त्याचा पल्ला सुमारे चार हजार किलोमीटर असल्याचे सांगण्यात येते. अमेरिकेची अजस्र विमानवाहू युद्धनौका उडविण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात असल्याचा दावा चीनकडून करण्यात येतो. तर ‘डाँगफेंग-१६’ हे ८०० ते १००० किलोमीटर्सपर्यंत मारा करु शकणारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. ‘डाँगफेंग-२६’ व ‘डाँगफेंग-१६’ ही दोन्ही अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रे असून त्यांच्यात ‘थर्मोन्यूक्लिअर वेपन’ वाहून नेण्याची क्षमता आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info