अमेरिकेची अणुयुद्धाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे

- उत्तर कोरियाचा गंभीर आरोप

सेऊल – ‘अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या हवाईदलामध्ये सुरू असलेला इतिहासातील सर्वात मोठा युद्धसराव म्हणजे उत्तर कोरियाविरोधातील अमेरिकेच्या अणुयुद्धाची तयारी ठरते. अमेरिका लिखित अणुयुद्धाची पटकथा आता अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे. अतिशय बेपर्वाईने सुरू असलेला हा युद्धसराव उत्तर कोरियाच्या सार्वभौमत्त्वाला आव्हान देत आहे. वेळीच हा सराव रोखला नाही तर अमेरिकेला तितकेच शक्तिशाली उत्तर मिळेल’, अशी धमकी उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली. याद्वारे उत्तर कोरियाने नव्या अणुचाचणीचा संदेश दिल्याचा दावा कोरियन विश्लेषक करीत आहेत.

अणुयुद्धाची तयारी

सोमवारपासून अमेरिका व दक्षिण कोरियाच्या हवाईदलाचा ‘व्हिजिलंट स्टॉर्म’ हा युद्धसराव सुरू झाला. यामध्ये दोन्ही देशांची जवळपास 240 लढाऊ विमाने व हेलिकॉप्टर्स सहभागी झाली आहेत. अमेरिका व दक्षिण कोरियाने अमेरिकेडून खरेदी केलेली एफ-35 स्टेल्थ विमाने देखील पहिल्यांदाच या सरावात पहायला मिळणार आहेत. या सरावात किमान 1,600 उड्डाणे भरण्यात येणार असून सलग 24 तास हवाई हल्ल्यांचा सरावही केला जाणार आहे. अमेरिका व दक्षिण कोरियाबरोबरच ऑस्ट्रेलिया देखील या सरावात अप्रत्यक्ष सहभागी असणार आहे. ऑस्ट्रेलियन हवाईदलातील इंधनवाहू टँकर विमान सलग 24 तासांच्या या सरावादरम्यान अमेरिका व दक्षिण कोरियन विमानांना इंधन पुरवठा करणार आहे.

अणुयुद्धाची तयारी

गेल्या पाच वर्षांमध्ये पहिल्यांदाच अमेरिका व दक्षिण कोरियाच्या हवाईदलात एवढा मोठा युद्धसराव होत आहे. एप्रिल महिन्यापासून अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या संरक्षणदलांमध्ये ठराविक अंतराने युद्धसराव सुरू आहेत. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर असे सलग तीन महिने दोन्ही देशांच्या लष्कर व नौदलात युद्धसराव पार पडला होता. यामध्ये जपानच्या विनाशिकांनी देखील सहभाग घेतला होता. या सरावांविरोधात उत्तर कोरियाने वेळोवेळी इशारे दिले होते. पण शुक्रवारपर्यंत सुरू राहणाऱ्या या युद्धसरावावर उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट धमकी दिल्यामुळे याचे गांभीर्य वाढल्याचा दावा केला जातो.

कोरियन क्षेत्रात सलग युद्धसरावांचे आयोजन करून अमेरिका व अमेरिकेच्या हातचे बाहुले असलेले दक्षिण कोरियातील सरकार या क्षेत्रात तणाव वाढवित असल्याचा आरोप उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला. तसेच आधीच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून अमेरिकेने हा सराव सुरू केल्याची टीका उत्तर कोरियाने केली. अमेरिका व दक्षिण कोरियातील युद्धसरावांमुळे या क्षेत्रातील सुरक्षविषयक परिस्थिती अतिशय गंभीर बनल्याचा ठपका उत्तर कोरियाने ठेवला. या युद्धसरावाद्वारे उत्तर कोरियाविरोधात अणुयुद्ध छेडण्यासंदर्भात अमेरिकेने लिहिलेली कथा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे, असा दावा उत्तर कोरियन परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे.

देशाचे सार्वभौमत्व, जनतेच्या सुरक्षेसाठी उत्तर कोरियन लष्कर नेहमीच तयार असते. त्यामळे अमेरिकेने यापुढेही सदर सराव सुरू ठेवून उत्तर कोरियाला लष्करी चिथावणी देण्याचा प्रयत्न केला तर त्याला तितकेच शक्तिशाली उत्तर मिळेल, अशी धमकी उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info