बेलारुसमध्ये परकीय हस्तक्षेप नको – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा इशारा

बेलारुसमध्ये परकीय हस्तक्षेप नको – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा इशारा

मॉस्को/मिन्स्क – बेलारुसमध्ये कोणत्याही बाह्य शक्तींकडून हस्तक्षेपाचा प्रयत्न झाल्यास त्या देशातील राजकीय संकट अधिकच तीव्र होऊ शकते असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिला आहे. रशियन राष्ट्राध्यक्षांनी बेलारुसच्या मुद्द्यावर जर्मनी, फ्रान्स तसेच युरोपीय महासंघाशी स्वतंत्र चर्चा केली असून या चर्चेत सदर इशारा देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. बेलारुसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्याविरोधात सलग १० दिवस तीव्र निदर्शने सुरू असून देशाच्या विविध भागातून तसेच स्तरातून त्याला मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे. मात्र विरोधाची व्याप्ती वाढत असतानाच राष्ट्राध्यक्ष लुकाशेन्को यांनी परकीय कटाचा आरोप केला असून सुरक्षायंत्रणांना आंदोलन चिरडण्याचे आदेश दिले आहेत.

परकीय हस्तक्षेप, पुतीन

गेल्या आठवड्यात बेलारुसमध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ८० टक्क्यांहून अधिक मते मिळवून आपण विजयी झाल्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष लुकाशेन्को यांनी केली होती. मात्र या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे आरोप स्थानिक राजकीय पक्ष व आंतरराष्ट्रीय समुदायाकडून करण्यात आले होते. या आरोपांच्या पार्श्वभूमीवरच, राष्ट्राध्यक्ष लुकाशेन्को यांच्याविरोधात बेलारुसची जनता रस्त्यावर उतरली होती. गेले काही दिवस राजधानी मिन्स्कसह इतर शहरांमध्ये सुरू झालेल्या निदर्शनात दोन लाखांहून अधिक नागरिक सहभागी झाले आहेत. गेल्या २६ वर्षांच्या कारकिर्दीत राष्ट्राध्यक्ष लुकाशेन्को त्यांच्या राजवटीला मिळालेले हे सर्वात मोठे आव्हान ठरले आहे.

परकीय हस्तक्षेप, पुतीन

आपल्याविरोधातील हे आव्हान मोडून काढण्यासाठी राष्ट्राध्यक्ष लुकाशेन्को यांनी रशियाकडे मदतीची याचना केली होती. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर राष्ट्राध्यक्ष लुकाशेन्को यांनी, रशियाने लष्करी सहाय्याचे आश्वासन दिल्याचा दावा केला होता. त्यानंतर रशियाने आपल्या गुप्तचर यंत्रणेसह इतर यंत्रणांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेले एक पथक गुप्तरित्या बेलारुसला धाडल्याचेही उघड झाले होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याकडून आलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

परकीय हस्तक्षेप, पुतीन

बेलारुसच्या मुद्द्यावर युरोपिय महासंघाची नुकतीच विशेष बैठक झाली. या बैठकीत, महासंघाने बेलारुसमध्ये झालेली निवडणूक व त्याचे निकाल संपूर्णपणे नाकारून त्या देशावर नवे निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. महासंघाच्या बैठकीनंतर रशियन राष्ट्राध्यक्षांची जर्मनी, फ्रान्स व युरोपीय महासंघाबरोबर स्वतंत्ररीत्या चर्चा झाल्याचे समोर आले. यावेळी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी, बेलारूसमध्ये परकीय हस्तक्षेपाचा प्रयत्न झाल्यास या देशातील संकटाचा अधिकच भडका उडेल, असे बजावले आहे. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह तसेच पुतीन यांच्या प्रवक्त्यांनीही याचा पुनरुच्चार केला असून बाह्य शक्तींच्या हालचाली अस्वीकारार्ह असल्याचे म्हटले आहे.

युरोपीय महासंघाने बेलारूसच्या राजवटीवर नवे निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी रशियन राष्ट्राध्यक्षांशी झालेल्या चर्चेत, रशियाने बेलारूसमधील राजकीय वाटाघाटींसाठी सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहे. मात्र बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष लुकाशेन्को यांनी, आक्रमक भूमिका घेत पोलंड तसेच लिथुआनियाच्या सीमेवर अतिरिक्त लष्करी तुकड्या तैनात केल्या आहेत. देशांतर्गत आंदोलन चिरडण्यासाठी पोलिस तसेच इतर सुरक्षादलांना बळाचा वापर करण्याचे आदेश दिल्याचेही समोर आले आहे.

हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info