चीनमधील ६० कोटी जनता तुटपुंज्या उत्पन्नावर जगत आहे – पंतप्रधान ली केकियांग यांच्या वक्तव्याने चीनमध्ये खळबळ

चीनमधील ६० कोटी जनता तुटपुंज्या उत्पन्नावर जगत आहे – पंतप्रधान ली केकियांग यांच्या वक्तव्याने चीनमध्ये खळबळ

बीजिंग – चीनमधील ६० कोटी जनता तुटपुंज्या उत्पन्नावर जगत आहे, ते महिना एक हजार युआनहून कमी आहे, या पंतप्रधान ली केकियांग वक्तव्यामुळे चीनमध्ये खळबळ उडाली आहे. मार्च महिन्यात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी देशाला गरीबी हटाव मोहिमेत मोठे यश मिळाल्याचा दावा केला होता. मात्र पंतप्रधान केकियांग यांच्या वक्तव्याने त्याला छेद दिला असून चिनी जनता व विश्लेषक राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. काही परदेशी विश्लेषकांनी ही घटना चीनमधील अंतर्गत राजकीय संघर्षाचा भाग असल्याचे म्हटले आहे.

चीन, ली केकियांग, ६० कोटी जनता

कोरोनाची साथ व अमेरिकेविरोधात व्यापारयुद्ध यासह बहुतांश आघाड्यांवर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे नेतृत्व अपयशी ठरल्याची चर्चा सोशल मीडियावर तसेच परदेशी प्रसारमाध्यमांमध्ये सुरू आहे. चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांनी देशातील सामान्य जनतेच्या स्थितीबाबत केलेले वक्तव्य त्यात अधिकच खतपाणी घालणारे ठरले आहे. पंतप्रधान केकियांग यांनी आपल्या वक्तव्यात चीनमधील ४० टक्‍क्‍यांहून अधिक जनता आपल्या मासिक उत्पन्नातून एखाद्या छोट्या शहरात भाड्यावर घर देखील घेऊ शकत नाही याकडे लक्ष वेधले. त्यांचे हे वक्तव्य सामान्य जनता व विश्लेषकांसाठी कौतुकाचा मुद्दा ठरला असला तरी चीनच्या राजकीय वर्तुळात मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे.

चीनमधील खाजगी अभ्यासगटांनी पंतप्रधान केकियांग यांचे वक्तव्य चीनचे वर्तमान वास्तव दाखविणारे असल्याचे मत व्यक्त केले आहे. ‘थिंक चायना’ नावाच्या वेबसाईटने एका लेखातून, गेल्या काही दशकात आर्थिक विकासाचे भव्य चित्र जगाला दाखविणारा चीन खरंच श्रीमंत आहे का?,असा सवाल चीनच्या कम्युनिस्ट राजवटीला केला आहे. वैबो या चीनमधील सोशल मीडिया ॲपवर, आम्हाला पंतप्रधानांकडून हेच सत्य ऐकायचे होते, स्वरूपाच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

चीन, ली केकियांग, ६० कोटी जनता

जपान मधील एका आघाडीच्या दैनिकाने पंतप्रधान केकियांग यांचे वक्तव्य व त्यानंतर सुरू झालेला वाद चीनमधील अंतर्गत राजकीय संघर्ष दाखविणारा असल्याचा दावा केला. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी गेल्या काही वर्षात सातत्याने देशातील गरिबी कमी होत असल्याचे सांगून आपलीच पाठ थोपटून घेतली होती. केकियांग यांच्या वक्तव्याने त्याला तडा गेला आहे. पंतप्रधानांच्या वक्तव्यानंतर चीनमधील यंत्रणा व प्रसारमाध्यमांनी सारवासारव केली असली तरी सामान्य जनतेतील जिनपिंग यांच्या प्रतिमेला जबरदस्त धक्का बसला आहे. त्याचवेळी चीनमधील सर्वोच्च व लोकप्रिय नेतृत्व म्हणून स्वतःला प्रस्थापित करण्याचे जिनपिंग यांचे इरादे ही सध्या धुळीला मिळाल्याचे दिसत आहे.

चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाची एकाधिकारशाही असून या पक्षावर जिनपिंग यांचे सध्या तरी पूर्ण नियंत्रण असल्याचे सांगण्यात येते. पण चीनची अर्थव्यवस्था धोक्यात आल्याने व जनतेची नाराजी वाढू लागल्याने, राष्ट्राध्यक्ष जिनपिंग काहीसे अडचणीत आल्याचे दिसत आहे. याच काळात त्यांच्यावर कम्युनिस्ट पक्षातील सुधारणावादी टीका करू लागले आहेत, हा योगायोग नक्कीच नाही.सध्या हा विरोध राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची सत्ता उलथण्याइतका तीव्र नसला तरी त्यातून शी जिनपिंग यांच्या एकाधिकारशाहीला धक्के बसू लागल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. ही बाब पाश्‍चिमात्य माध्यमांनी उचलून धरली असून पुढच्या काळात चीनमध्ये जिनपिंग यांना होणारा विरोध अधिकच तीव्र होऊ शकेल, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info