तुर्कीच्या धमकीनंतर युएईची लढाऊ विमाने ग्रीसमध्ये दाखल

तुर्कीच्या धमकीनंतर युएईची लढाऊ विमाने ग्रीसमध्ये दाखल

अथेन्स – भूमध्य समुद्र आणि ब्लॅक सीच्या क्षेत्रातील इंधन साठ्यावरुन तुर्की आणि ग्रीस, या दोन्ही नाटो सदस्य देशांमधील तणाव लष्करी हालचालीपर्यंत पोहोचला आहे. ‘भूमध्य तसेच एजियन समुद्र आणि ब्लॅक सी’च्या क्षेत्रातील आपल्या सार्वभौम अधिकारांच्या सुरक्षेसाठी तुर्की कशाचीही हयगय करणार नाही, अशी धमकी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी दिली. त्याचबरोबर तुर्कीने भूमध्य समुद्रात नौदलाच्या ‘लाईव्ह फायर’ युद्धसरावाची घोषणा केली. थेट उल्लेख केला नसला तरी एर्दोगन यांनी ग्रीसला उद्देशून ही धमकी दिल्याचे उघड आहे. या धमकीच्या पुढील काही तासात भूमध्य समुद्राच्या क्षेत्रात ग्रीस, फ्रान्स, इटली आणि सायप्रस या नाटो सदस्य युरोपीय देशांचा युद्धसराव पार पडला. तर ‘संयुक्त अरब अमिरात’ची (युएई) लढाऊ विमाने नव्या युद्धसरावासाठी ग्रीसच्या क्रेटे बेटावर दाखल झाली आहेत.

क्रेटे बेटावर, तुर्की, ग्रीस

भूमध्य समुद्रातील क्रेटे बेट आणि सायप्रसमधील सागरी पट्ट्यात १२८ अब्ज घनमीटर इंधनवायुचे साठे सापडल्याचा दावा करण्यात आला होता. या इंधनाच्या साठ्यावर आपला अधिकार असल्याचे सांगून तुर्कीने दोन आठवड्यांपूर्वी ‘रिसर्च शिप’ रवाना केली होती. भूमध्य समुद्रातील तुर्कीच्या या आक्रमकतेवर ग्रीस व फ्रान्सने आक्षेप घेतला होता. फ्रान्सने ‘ला फाएत’ विनाशिका आणि रफायल विमाने तैनात करुन तुर्कीला इशारा दिला होता. पण ग्रीस, फ्रान्स तसेच इतर युरोपीय देशांच्या इशार्‍याकडे दुर्लक्ष करुन तुर्कीने भूमध्य तसेच इतर सागरी क्षेत्रातील आपल्या हालचाली सुरू ठेवण्याचे जाहीर केले आहे. ‘‘दुसर्‍या देशाच्या भूभागावर, सार्वभौमत्वावर किंवा हितसंबंधांवर तुर्की अजिबात अधिकार सांगणार नाही. मात्र तुर्की स्वत:च्या सार्वभौम अधिकारापासून किंचितही माघार घेणार नाही. भूमध्य तसेच एजियन समुद्र आणि ब्लॅक सी’च्या सागरी क्षेत्रातील आपल्या या अधिकारांच्या सुरक्षेसाठी तुर्की कुठलीही पर्वा करणार नाही’’, असा इशारा एर्दोगन यांनी दिला.

क्रेटे बेटावर, तुर्की, ग्रीस

यासाठी एर्दोगन यांनी ११ व्या शतकात ‘सेल्जूक तुर्कां’नी बायझेंटाईन साम्राज्यावर मिळविलेल्या विजयाचा दाखला दिला. तसेच तुर्की विरोधकांनी अशी कुठलीही चूक करू नये, ज्यामुळे त्यांचा विनाश होईल, अशी धमकी एर्दोगन यांनी दिली. एर्दोगन यांची ही धमकी ग्रीस तसेच ग्रीसला समर्थन देणार्‍या फ्रान्स, सायप्रस या देशांसाठी होती, असे बोलले जाते. या धमकीपाठोपाठ तुर्कीच्या परराष्ट्रमंत्री तसेच संरक्षणमंत्र्यांनीही आपल्या विरोधकांना धमकावले. त्याचबरोबर आपल्या सागरी हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी तुर्की सज्ज असल्याचे सांगून भूमध्य समुद्रातील ‘लाईव्ह फायर’ युद्धसरावाची घोषणा केली. १-२ सप्टेंबर रोजी हा युद्धसराव आयोजित होणार असल्याची माहिती तुर्कीने दिली. गेल्या महिन्याभरात तुर्कीने या सागरी क्षेत्रात आयोजित केलेला हा तिसरा युद्धसराव ठरत आहे.

क्रेटे बेटावर, तुर्की, ग्रीस

या व्यतिरिक्त, पुढच्या काही तासात तुर्कीने भूमध्य समुद्रात युद्धनौका रवाना करुन युद्धसरावाचे आयोजन केले. तुर्कीचा हा युद्धसराव म्हणजे ग्रीस आणि मित्रदेशांसाठी इशारा असल्याचे बोलले जाते. तर तुर्कीच्या या घोषणेच्या पुढील काही तासात ग्रीस, फ्रान्स, इटली आणि सायप्रस या देशांच्या युद्धनौकांनी भूमध्य समुद्रात तीन दिवसांचा युद्धसराव सुरू केला आहे. या दोन्ही युद्धसरावावेळी अमेरिकेच्या विनाशिकेने तुर्की तसेच ग्रीसबरोबरच्या युद्धसरावात सहभाग घेतला होता. नाटोच्या सदस्य देशांमधील हा परस्परविरोधी युद्धसराव या संघटनेतील फूटीचे संकेत देत असल्याचा दावा युरोपिय विश्लेषक देत आहेत. नाटोच्या सदस्य देशांच्या भूमध्य समुद्रातील या लष्करी हालचाली या क्षेत्राला नव्या अडचणीत ढकलू शकते, असा इशारा अमेरिकी माध्यमे देऊ लागली आहेत.

तुर्कीने ग्रीसला दिलेल्या या धमकीनंतर ‘संयुक्त अरब अमिरात’ची (युएई) एफ-१६ लढाऊ विमानांचा ताफा ग्रीसच्या क्रेटे बेटावर उतरली आहेत. ग्रीसबरोबरच्या युद्धसरावासाठी आपली विमाने क्रेटेवर दाखल झाल्याचे युएईने जाहीर केले. सदर विमाने सौदा हवाई तळावर तैनात राहणार असून दोन्ही देशांच्या लष्करप्रमुखांमध्ये यासंबंधी चर्चा पार पडली आहे. एफ-१६ विमानांच्या तैनातीबरोबर युएईची विनाशिका देखील क्रेटे बेटासाठी रवाना झाल्याचा दावा केला जातो. गेल्या काही महिन्यांमध्ये तुर्की आणि युएईतील तणाव अधिक ठळकपणे समोर आला आहे. लिबिया, सिरियातील संघर्षात हे दोन्ही देश एकमेकांविरोधात ठाकले आहेत. तर काही दिवसांपूर्वीच युएईने इस्रायलबरोबर केलेल्या सहकार्यावर तुर्कीने टीका केली होती. या पार्श्वभूमीवर युएईच्या लढाऊ विमानांची क्रेटे बेटावरील तैनातीकडे पाहिले जात आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info