तुर्कीच्या विरोधात ग्रीस व सायप्रसच्या मागे युरोप ठामपणे उभा राहील – युरोपिय महासंघाचा तुर्कीला इशारा

तुर्कीच्या विरोधात ग्रीस व सायप्रसच्या मागे युरोप ठामपणे उभा राहील – युरोपिय महासंघाचा तुर्कीला इशारा

स्ट्रासबर्ग/अंकारा – ग्रीस व सायप्रसच्या कायदेशीर सार्वभौम अधिकारांसाठी युरोप ठामपणे उभा राहील, असा खणखणीत इशारा युरोपीय महासंघाच्या प्रमुख उर्सुला व्हॉन डेर लेयन यांनी दिला आहे. बुधवारी युरोपिय संसदेत ‘स्टेट ऑफ इयु स्पीच’मध्ये हा इशारा देतानाच तुर्कीला त्याच्या शेजारी देशांवर दडपण आणण्याचा कोणताही अधिकार नसल्याचेही बजावले. त्याचवेळी महासंघाचे परराष्ट्र प्रमुख जोसेप बॉरेल यांनी, भूमध्य सागरातील तणावाच्या मुद्यावरून युरोप व तुर्कीचे संबंध निर्णायक वळणावर येऊन पोहोचल्याचा दावा केला आहे. युरोपसह आंतरराष्ट्रीय स्तरावरून येणाऱ्या दबावाच्या पार्श्वभूमीवर तुर्कीने आपले ‘रिसर्च शिप’ भूमध्य सागरी क्षेत्रातून माघारी घेतल्याचे समोर आले आहे.

गेल्या महिन्यात तुर्कीने आपले ‘ओरुक रेईस’ हे ‘रिसर्च शिप’ दोन जहाजांसह भूमध्य सागरी क्षेत्रात, ग्रीसच्या कॅस्टेलोरीझो बेटानजिक संशोधनासाठी दाखल होत असल्याची एकतर्फी घोषणा केली होती. तुर्कीच्या या घोषणेवर ग्रीससह युरोपीय देश व नाटोकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. ग्रीसने आपला संरक्षणदलांना हाय अलर्ट जारी करत तुर्कीच्या कारवायांची टेहळणी सुरू केली होती. त्यापाठोपाठ ग्रीसने फ्रान्सबरोबर भूमध्य सागरी क्षेत्रात संयुक्त नौदल सरावही केला होता. त्याचवेळी आपल्या मोहिमेचे समर्थन करण्यासाठी तुर्कीने या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संरक्षणतैनाती सुरू करून एकापाठोपाठ एक युद्धसराव आयोजित केले होते. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी इतिहासाचे दाखले देत युरोपीय देशांना धमकावण्यासही सुरुवात केली होती.

तुर्कीच्या या कारवायांविरोधात यूरोपिय देशांनीही आक्रमक भूमिका घेतली असून ग्रीसच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. फ्रान्सने ग्रीसला संरक्षणसहाय्यही देण्यास सुरुवात केली असून आपल्या विनाशिका व लढाऊ विमाने ग्रीसच्या सुरक्षेसाठी तैनातही केली होती. आता युरोपिय महासंघही ठामपणे तुर्कीविरोधात ग्रीसबरोबर असल्याचे व्हॉन डेर लेयन व बॉरेल यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे.

‘तुर्की भौगोलिकदृष्ट्या युरोपच्या जवळ असला तरी आमच्यातील संबंध आता दुरावू लागले आहेत. तुर्की युरोपसाठी अस्वस्थ व असंतुष्ट शेजारी देश आहे. निर्वासितांसह इतर मुद्यांवर सहकार्य असले तरी त्याचा अर्थ तुर्कीला शेजारी देशांवर दडपण टाकण्याचा अधिकार आहे, असा होत नाही. अशा गोष्टींचे समर्थन कधीही होऊ शकत नाही. ग्रीस व सायप्रसच्या सार्वभौम अधिकारांसाठी युरोप त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, याची त्यांनी खात्री बाळगावी’, असा इशारा महासंघाच्या प्रमुख व्हॉन डेर लेयन यांनी दिला. लेयन यांच्या इशाऱ्यापूर्वी महासंघाचे परराष्ट्र प्रमुख जोसेप बॉरेल यांनीही तुर्कीला बजावले आहे. सध्याच्या स्थितीत दोन्ही बाजूंमधील संबंध निर्णायक वळणावर असून, पुढील काही दिवसात काय घटना घडतात, त्यावर त्याचे भवितव्य अवलंबून आहे, याची जाणीव बॉरेल यांनी करून दिली.

इजिप्तचे परराष्ट्रमंत्री समेह शुक्री ग्रीसच्या दौऱ्यावर असून त्यांनी तुर्कीच्या कारवायां विरोधात ग्रीसला पाठिंबा जाहीर केला आहे. ग्रीस व इजिप्तमध्ये यापूर्वी भूमध्य सागरी क्षेत्रासंबंधी करार झाला असून तुर्कीने त्यावर टीका केली होती. दरम्यान, ग्रीस व तुर्कीमधील तणावाचे कारण ठरलेले ‘ओरूक रेईस’ हे जहाज भूमध्य सागरातून तुर्की बंदरावर परतल्याचे समोर आले आहे. तुर्कीकडून मोहीम वाढविण्याच्या धमक्या दिल्या जात असताना हे जहाज परतणे तुर्कीने घेतलेली माघार असल्याचे मानले जाते.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info