कोरोनाच्या नव्या ‘व्हेरिअंट’च्या भीतीने कच्च्या तेलाचे दर कोसळले – २०२१ मधील सर्वात मोठी घसरण

कच्च्या तेलाचे दर

न्यूयॉर्क/लंडन – आफ्रिका खंडातून समोर आलेल्या कोरोनाच्या नव्या ‘व्हेरिअंट’चे तीव्र पडसाद आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेत उमटले आहेत. कच्च्या तेलाचे दर ११ ते १३ टक्क्यांनी कोसळले असून ही वर्षातील सर्वात मोठी घसरण ठरली आहे. अमेरिका व युरोपच्या शेअरबाजारांसह डॉलरचे मूल्य तसेच अमेरिकी कर्जरोख्यांनाही फटका बसला आहे. दरम्यान, ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने (डब्ल्यूएचओ) शुक्रवारी घेतलेल्या बैठकीत नवा प्रकार हा ‘व्हेरिअंट ऑफ कन्सर्न’ असल्याचे जाहीर केले.

काही दिवसांपूर्वी आफ्रिकेतील दोन देशांमध्ये आढळलेला कोरोनाचा नवा व्हेरिअंट आतापर्यंतचा सर्वाधिक घातक व धोकादायक प्रकार असल्याचे इशारे देण्यात आले आहेत. या इशार्‍यांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अर्थव्यवस्थेत त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. काल आशियाई शेअरबाजारांमध्ये मोठी घसरण झाली होती.

कच्च्या तेलाचे दर

त्यानंतर इंधन बाजारपेठेत तीव्र प्रतिक्रिया उमटली. अमेरिकेतील कच्च्या तेलाच्या दरांमध्ये १३ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. ‘डब्ल्यूटीआय क्रूड’चे दर प्रति बॅरलमागे १०.२४ डॉलर्सनी कोसळले. एप्रिल २०२०नंतर झालेली एका दिवसातील ही सर्वात मोठी घसरण ठरली आहे. जानेवारी महिन्यासाठी झालेल्या व्यवहारांसाठीचे दर प्रतिबॅरल ६८.१५ डॉलर्स असे नोंदविण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही कच्च्या तेलाच्या दरांमध्ये ११.५५ टक्क्यांची घसरण झाली. कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरलमागे ७२.७२ डॉलर्सपर्यंत खाली आले आहेत.

‘आफ्रिकेतील कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटने जागतिक स्तरावर सर्वच बाजापेठांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण केले आहे. जर्मनीसारख्या देशाने प्रवासावर निर्बंध लादण्यास सुरुवात केलीच आहे. हवाई प्रवास पूर्वपदावर आला असताना त्याला निर्माण होणारा नवा धोका ही बाब इंधन उत्पादक देशांसाठी डोकेदुखी ठरु शकते’, असा दावा विश्‍लेषक जॉन किल्डफ यांनी केला. अमेरिका व युरोपिय शेअरबाजारांनाही मोठा फटका बसल्याचे समोर आले आहे.

कच्च्या तेलाचे दर

अमेरिकेतील ‘डो जोन्स’, ‘नॅस्डॅक कम्पोझिट’ व ‘एसऍण्डपी५००’ या तिन्ही प्रमुख शेअरनिर्देशांकांमध्ये विक्रमी घसरण झाली.तिन्ही निर्देशांक दोन टक्क्यांहून अधिक खाली आले आहेत. युरोपातील स्पेनचा निर्देशांक तब्बल पाच टक्क्यांनी कोसळला असून फ्रान्स व जर्मनीच्या शेअरबाजारांमध्ये चार टक्क्यांहून अधिक घसरण झाली. ब्रिटनमधील शेअरबाजार ३.६ टक्क्यांनी खाली आला आहे. युरोपमधील आघाडीच्या ‘स्टॉक्स ६०० इंडेक्स’ला साडेतीन टक्क्यांहून अधिक घसरणीचा फटका बसला. अमेरिकेचे चलन असलेल्या डॉलरचा इंडेक्स ०.७५७ टक्क्यांनी खाली आला असून कर्जरोख्यांवरील व्याजदरातही मोठी घसरण झाली आहे.

दरम्यान, शुक्रवारी पार पडलेल्या ‘डब्ल्यूएचओ’च्या बैठकीत आफ्रिकेतून समोर आलेल्या नव्या ‘व्हेरिअंट’ला ‘ओमिक्रॉन’ असे नाव निश्‍चित करण्यात आले. त्याचवेळी हा प्रकार ‘व्हेरिअंट ऑफ कन्सर्न’ असल्याचा अलर्टही देण्यात आला आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info