रशियाकडून युक्रेनची राजधानी किव्हवर नवा ड्रोन हल्ला

- वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिका युक्रेनला ‘पॅट्रियॉट’ क्षेपणास्त्रे पुरविणार

मॉस्को/किव्ह – बुधवारी पहाटे रशियाने युक्रेनची राजधानी किव्हवर ड्रोन हल्ला केला. इराणच्या ‘शाहेद’ ड्रोन्सच्या सहाय्याने केलेल्या या हल्ल्यात १३ ड्रोन्सचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात येते. युक्रेनने सर्व ड्रोन्स पाडल्याचा दावा केला असून हल्ल्याचे नियोजित लक्ष्य पूर्ण झाल्याचे रशियाच्या संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले. रशियाच्या या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने युक्रेनला ‘पॅट्रियॉट’ क्षेपणास्त्रे देण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त ‘सीएनएन’ या वृत्तवाहिनीने दिले आहे. दरम्यान, रशियाने युक्रेनमधून सर्व सैन्य माघारी घेण्याबाबत युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी दिलेला प्रस्ताव अस्वीकारार्ह असल्याची प्रतिक्रिया रशियाने दिली.

राजधानी किव्हवर

रशिया व युक्रेन या दोन्ही देशांमध्ये कडक हिवाळा सुरू असतानाही संघर्षाची तीव्रता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी युक्रेनने रशियातील लष्करी तळांवर हल्ले चढवून त्याचे मोठे नुकसान केले होते. या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना रशियाने राजधानी किव्हला लक्ष्य केले. बुधवारी पहाटे ‘अझॉव्ह सी’मधील युद्धनौकेवरून किव्हवर ड्रोन हल्ला करण्यात आला. यासाठी १३ इराणी ड्रोन्सचा वापर करण्यात आला.

राजधानी किव्हवर

किव्हमधील पायाभूत सुविधा व संवेदनशील भागांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली. युक्रेनच्या लष्कराने रशियाचे सर्व ड्रोन्स पाडल्याचा दावा केला असला तरी त्यामुळे नुकसान झाल्याचीही कबुली दिली. रशियाने आतापर्यंत युक्रेनवर हल्ला करण्यासाठी जवळपास ४००हून अधिक ड्रोन्स वापरल्याचा दावाही युक्रेनकडून करण्यात आला. रशियाने इराणकडून मोठ्या प्रमाणात ड्रोन्स खरेदी केली असून पुढील काळात इराणी क्षेपणास्त्रांचाही वापर होऊ शकतो, असा दावा काही पाश्चिमात्य माध्यमांनी केला आहे. राजधानी किव्हवरील ड्रोन हल्ल्यानंतर रशियाने खेर्सन शहरावरही हल्ले केल्याचे समोर आले आहे. यात खेर्सनमधील प्रशासकीय इमारतींसह इतर इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.

राजधानी किव्हवर

दरम्यान, रशियाच्या या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने युक्रेनला ‘पॅट्रियॉट’ क्षेपणास्त्रे पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेतील आघाडीची वृत्तवाहिनी ‘सीएनएन’ने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले. यासंदर्भातील प्रस्ताव तयार असून संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन व राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या संमतीनंतर युक्रेनला सदर क्षेपणास्त्र यंत्रणा पुरविण्यात येईल, असे वृत्तात म्हटले आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला ‘पॅट्रियॉट’ युक्रेनच्या लष्करात सामील होण्याची शक्यता आहे, असा दावाही करण्यात येतो. पॅट्रियॉटचा पल्ला दीडशे किलोमीटर्सहून अधिक असून क्षेपणास्त्रे व लढाऊ विमानांना भेदण्याची क्षमता असल्याचे सांगण्यात येते. यापूर्वी अमेरिकेने युक्रेनला ‘नॅसॅम्स’ ही हवाईसुरक्षायंत्रणा पुरविली असली तरी युक्रेनकडून सातत्याने पॅट्रियॉटची जमjागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, युरोपिय महासंघाच्या बैठकीत युक्रेनला १८ अब्ज युरोचे अर्थसहाय्य पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला. हे अर्थसहाय्य पुढील वर्षासाठी असून वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये पुरविण्यात येईल, असा दावा महासंघाने केला. याव्यतिरिक्त फ्रान्समध्ये पार पडलेल्या ‘युक्रेन डोनर कॉन्फरन्स’मध्ये युक्रेनमधील ऊर्जा व इतर पायाभूत सुविधांसाठी सुमारे एक अब्ज डॉलर्सच्या सहाय्याची घोषणा करण्यात आली आहे.

हिंदी    English

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info