Breaking News

अफगाणिस्तानातील हवाई हल्ल्यांमध्ये ४० हून अधिक ठार

काबूल – अफगाणिस्तानच्या हवाईदलाने ईशान्य भागात तालिबानच्या ठिकाणावर केलेल्या कारवाईत किमान ४३ जण ठार झाले. यामध्ये ३० तालिबानी दहशतवाद्यांचा समावेश असून १३ नागरिकांचाही यात बळी गेल्याची माहिती समोर येत आहे. अफगाण सरकार आणि तालिबान यांच्यात कतारमध्ये शांतीचर्चा सुरू असताना, अफगाणी हवाईदलाने तालिबानच्या ठिकाणावर ही कारवाई करून तालिबानला इशारा दिल्याचा दावा केला जातो. काही दिवसांपूर्वी तालिबानी दहशतवाद्यांनीच अफगाणी लष्करावरील हल्ले थांबणार असल्याचा इशारा दिला होता.

हवाई हल्ले

अफगाणिस्तानच्या हवाईदलाने शनिवारी कुंदूझ प्रांतातील खानआबाद जिल्ह्यातील तालिबानी दहशतवाद्यांच्या छुप्या तळावर जोरदार हल्ले चढविले. दोन टप्प्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली. यापैकी पहिल्या टप्प्यात अफगाणी लढाऊ विमानांनी तालिबानी दहशतवादी राहत असलेले घर तसेच या घराबाहेरील चौकी उद्ध्वस्त केली. या हल्ल्यात किमान ४० दहशतवादी ठार झाल्याचा दावा केला जातो. यामध्ये दोन कमांडर्सचाही समावेश आहे. पण कुंदूझ प्रांताच्या प्रमुखांनी आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत, अफगाणी हवाईदलाच्या कारवाईत ३० दहशतवादी ठार झाले. तर या कारवाईत ठार झालेल्या दहशतवाद्यांना पाहण्यासाठी जमा झालेल्या गर्दीवर अफगाणी हवाईदलाने चढविलेल्या पुढच्या हल्ल्यात १३ जणांचा बळी गेला असून यात मुलांचा समावेश असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

हवाई हल्ले

कतारची राजधानी दोहा येथे अमेरिकेच्या मध्यस्थीने अफगाणिस्तानातील गनी सरकार आणि तालिबानमध्ये शांतीचर्चा सुरू आहे. ही शांतीचर्चा हळुहळू अफगाणिस्तानच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने प्रवास करीत असल्याचा दावा अमेरिकेने नियुक्त केलेले विशेषदूत झल्मे खलिलझाद यांनी केला आहे. त्याचबरोबर संयुक्त राष्ट्रसंघाची सुरक्षा परिषद अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाशी वचनबद्ध असल्याचेही खलिलझाद यांनी जाहीर केले. तर या शांतीचर्चेच्या पाश्वभूमीवर, अफगाणी राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी तालिबानला संघर्षबंदीचे आवाहन केले होते. पण शांतीचर्चा सुरू असली तरी अफगाणी सुरक्षा यंत्रणांवरील आपले हल्ले थांबणार नसल्याचा इशारा तालिबानने दिला होता. त्यानंतर पुढच्या काही तासातच तालिबानच्या दहशतवाद्यांनी अफगाणी लष्करावर हल्ले चढविले होते. अफगाण सरकारने देखील तालिबानच्या ठिकाणांवर हवाई हल्ले चढवून तालिबानला प्रत्युत्तर दिल्याचे दिसत आहे.

दरम्यान, दोहा येथील शांतीचर्चेत तालिबानने अफगाणिस्तानात इस्लामी राजवट प्रस्थापित करण्याची मागणी ठेवली आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तानातील महिलांना दिलेले अधिकार मागे घेण्याची तयारी तालिबानने केल्याचे दिसत आहे. त्यामुळे तालिबान पुन्हा अफगाणिस्तानात सत्तेवर आली तर आपला देश पुन्हा दोन दशके मागे जाईल, अशी भीती अफगाणी जनतेला सतावित आहे. त्यातच गुलबुद्दीन हिकमतयार याचा हिज्ब-ए-इस्लामी हा गट देखील तालिबानशी जुळवून घेण्यासाठी तयार झाल्याच्या बातम्या येत आहेत. तुर्की आणि पाकिस्तानच्या माध्यमांनी ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info