तैवान प्रकरणी अमेरिकेला साथ दिल्यास चीन ऑस्ट्रेलियावर क्षेपणास्त्र हल्ले चढवेल – चिनी मुखपत्र ‘ग्लोबल टाईम्स’ची धमकी

बीजिंग/कॅनबेरा – तैवानप्रकरणी ऑस्ट्रेलियाने अमेरिकेच्या लष्कराला सहाय्य केल्यास चीन ऑस्ट्रेलियातील महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ले चढविल, अशी धमकी चीनचे सरकारी मुखपत्र ‘ग्लोबल टाईम्स’ने दिली आहे. चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने यासंदर्भात ठोस योजना बनवून, ‘नॉन ऑफिशिअल चॅनल्स’च्या माध्यमातून ऑस्ट्रेलियाला त्याची जाणीव करून द्यावी, असा सल्लाही ‘ग्लोबल टाईम्स’चे संपादक हु शिजिन यांनी दिला. गेल्याच महिन्यात चीनने ऑस्ट्रेलियाला धमकावताना, व्यापारयुद्ध थांबवायचे असेल, तर तैवान प्रकरणात चीनच्या धोरणाला पाठिंबा द्या, असे बजावले होते. त्यानंतर पुन्हा एकदा धमकावून चीनने ऑस्ट्रेलियावरील दडपण अधिकच वाढविले आहे.

मुखपत्र, धमकी, ग्लोबल टाईम्स, तैवान, क्षेपणास्त्र हल्ले, ऑस्ट्रेलिया, चीन, व्यापारयुद्ध, TWW, Third World War

चीनची कम्युनिस्ट राजवट गेल्या वर्षभरात अधिक आक्रमक झाली असून आपले विस्तारवादी धोरण राबविण्यासाठी वेगाने पावले उचलत आहे. हॉंगकॉंगमध्ये लादण्यात आलेला कायदा व साऊथ चायना सीबाबत घेतलेले निर्णय तसेच वाढती लष्करी तैनाती याला दुजोरा देत आहेत. तैवानवर ताबा मिळविणे यातीलच पुढील टप्पा असून कम्युनिस्ट पार्टीचे नेते तसेच लष्करी अधिकार्‍यांनी तैवानवरील हल्ल्याची योजना तयार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. अमेरिकेतील सत्ताबदलानंतर तैवानच्या हद्दीत वाढलेल्या घुसखोरीच्या घटनाही चीनच्या इराद्यांची जाणीव करून देणार्‍या ठरतात. ‘ग्लोबल टाईम्स’मधून ऑस्ट्रेलियाला देण्यात आलेली धमकीही त्याचाच भाग असल्याची पुष्टी देणारी ठरते.

हु शिजिन यांनी शुक्रवारी लिहिलेल्या एका लेखात, ऑस्ट्रेलियन नेते व अधिकार्‍यांकडून तैवानबाबत घेण्यात येणार्‍या भूमिकेचा उल्लेख केला आह. ‘तैवानच्या क्षेत्रात संघर्ष भडकल्यास ऑस्ट्रेलियाने अमेरिकी लष्कराला सहाय्य करावे, अशी भूमिका ऑस्ट्रेलियातील काही आक्रमक नेते व अधिकारी सातत्याने मांडत आहेत. त्याला ऑस्ट्रेलियातील प्रसारमाध्यमेही उचलून धरत आहेत. जर ऑस्ट्रेलियाने तैवान संघर्षात अमेरिकेला सहकार्य करण्यासाठी पावले उचलली तर चीनकडून ऑस्ट्रेलियाला जबर शिक्षा होईल, अशी कारवाई करावी. ऑस्ट्रेलियातील लष्करी जागा व त्याच्याशी निगडीत महत्त्वाच्या क्षेत्रांवर दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी हल्ले चढवावेत’, अशा शब्दात शिजिन यांनी ऑस्ट्रेलियाला धमकावले आहे.

मुखपत्र, धमकी, ग्लोबल टाईम्स, तैवान, क्षेपणास्त्र हल्ले, ऑस्ट्रेलिया, चीन, व्यापारयुद्ध, TWW, Third World War

अमेरिकेला सहकार्य करून तैवानसाठी लष्करी तैनाती करण्याचे आणि पीपल्स लिबरेशन आर्मीविरोधात युद्ध छेडण्याचे धाडस ऑस्ट्रेलियन नेतृत्त्वाने दाखवलेच, तर त्या देशाला कोणत्या भयानक आपत्तीला सामोरे जावे लागेल, याची जाणीव चीनने क्षेपणास्त्रहल्ले चढवून करून द्यावी, असेही ग्लोबल टाईम्सच्या लेखात बजावण्यात आले आहे. दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्याची क्षमता चीनकडे आहे, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.

युद्धाचे नगारे कानावर येत असल्याचे ऑस्ट्रेलियाच्या अंतर्गत सुरक्षा विभागाचे सचिव माईक पेझुलो यांनी काही दिवसांपूर्वीच बजावले होते. त्यांची ही विधाने अतिरंजित असल्याची टीका ऑस्ट्रेलियातील काहीजणांनी केली होती. मात्र जबाबदार सामरिक विश्‍लेषकांनी पेझुलो यांचा इशार्‍याकडे गंभीरपणे पाहण्याची आवश्यकता असल्याचे बजावले होते. चीनचे सामर्थ्य आणि महत्त्वाकांक्षा यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. त्यापासून ऑस्ट्रेलियाला संभवणारा धोका देखील त्याच प्रमाणात वाढल्याचे या विश्‍लेषकांनी म्हटले होते. ग्लोबल टाईम्स या चिनी राजवटीच्या मुखपत्राद्वारे देण्यात आलेली धमकी पेझुलो यांचा इशारा प्रत्यक्षात उतरू लागल्याचे संकेत देत आहे. केवळ ऑस्ट्रेलियाच नाही तर इतर देशांनाही याकडे दुर्लक्ष करणे शक्य होणार नाही.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info