युक्रेनी लष्कराने हजार किलोमीटरचा भूभाग रशियाच्या तावडीतून सोडविला

- युक्रेनी लष्कराचा दावा

किव्ह/मॉस्को – रशियन सैन्यावर युक्रेनी लष्कराने चढविलेल्या प्रतिहल्ल्याची धार वाढत चालली असून शनिवारी युक्रेनी लष्कराने आपल्या पूर्व युक्रेनमधील कुपियान्स्क शहरात प्रवेश केल्याचे जाहीर केले. कुपियान्स्क बऱ्याच महिन्यांपासून रशियन सैन्याच्या टाचेखाली होते. पण आता हे शहर रशियापासून मुक्त केल्याचा दावा युक्रेनी लष्कर करीत आहे. तसेच गेल्या काही दिवसांमध्ये युक्रेनच्या लष्कराने आपल्या देशाचा सुमारे हजार किलोमीटरचा इलाका रशियाच्या तावडीतून सोडविल्याची घोषणा केली. तर रशियाने युक्रेनच्या खारकिव्हसाठी अतिरिक्त तैनातीची घोषणा केली आहे. रशियाची ही घोषणा युक्रेनच्या युद्धात रशियाची जबरदस्त हानी झाल्याचे संकेत देणारी असल्याचे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी म्हटले आहे.

हजार किलोमीटरचा

युक्रेनचे युद्ध सुरू झाल्यानंतर रशियाच्या आक्रमणासमोर युक्रेनी लष्कराचा निभाव लागत नसल्याचे अवघ्या काही दिवसातच स्पष्ट झाले होते. रशियन सैन्याने युक्रेनच्या भूभागात मुसंडी मारून आपल्या सामर्थ्याचे जबरदस्त प्रदर्शन केले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून युक्रेनच्या युद्धाचे पारडे फिरू लागल्याचे संकेत मिळत आहेत. आधीच्या काळात रशियन सैन्याने आघाडी घेतलेल्या भागावर आता युक्रेनी लष्कराने प्रतिहल्ले चढविले असून इथून रशियन सैन्याला माघार घेण्यास आपण भाग पाडल्याचे दावे युक्रेनचे लष्कर करीत आहे. मागच्या काही दिवसात आपल्या लष्कराने हजार किलोमीटर इतका भूभाग रशियापासून मुक्त केल्याचा दावा युक्रेनी लष्कराच्या प्रवक्त्याने केला आहे.

पाश्चिमात्य लष्कराच्या सहाय्यामुळे युक्रेनी लष्कराचा आत्मविश्वास दुणावला असून या युद्धात त्याचे आश्चर्यकारक परिणाम समोर येत आहेत, असे युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. त्याचबरोबर युक्रेनी लष्कराच्या या आघाडीमुळे रशियन सैन्याची फळी मोडून पडत असल्याचा दावाही या प्रवक्त्याने केला आहे.

पूर्व युक्रेनमधील कुपियान्स्क शहरात युक्रेनी लष्कराने प्रवेश केला आहेच. पण पूर्वेकडील आघाडीबरोबरच उत्तर व दक्षिणेकडील आघाडीवरही युक्रेनी लष्कराने आगेकूच सुरू केली असल्याचे दावे करण्यात येत आहेत. सुरूवातीला युक्रेनी लष्कराकडून केले जाणारे हे दावे रशियाने नाकारले होते. पण आता रशियाने युक्रेनच्या खारकिव्हमध्ये अतिरिक्त सैन्यतैनातीची घोषणा केली.

हजार किलोमीटरचा

रशियन सैन्य खारकिव्हच्या दिशेने निघत असतानाचे व्हिडिओज्‌‍ रशियाने प्रसिद्ध केले आहेत. मात्र रशियाच्या खारकिव्हमधील या तैनातीची दखल अमेरिकेने घेतली असून अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी त्यावर लक्षवेधी दावे केले आहेत. ‘खारकिव्हमधील रशियाची अतिरिक्त तैनाती, या युद्धात रशियाची जबरदस्त हानी झ्ााल्याचे दाखवून देत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी रशियन जनतेला महाभयंकर अशा युद्धात ढकलेले आहे. याची फार मोठी किंमत रशिया चुकती करीत आहे’, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी म्हटले आहे.

दरम्यान, युक्रेनी लष्कराला पाश्चिमात्यांचे फार मोठे सहाय्य मिळू लागल्याने युक्रेनच्या प्रतिहल्ल्याची धार वाढली की रशियन सैन्याची माघारी रशियाच्या डावपेचाचा भाग आहे, हे लवकरच स्पष्ट होईल. पण या युद्धात युक्रेनी लष्कराची ही आगेकूच अशीच कायम ठेवणे रशियाला सामरिकदृष्ट्या परवडणारी बाब नाही. पुढच्या काळात रशिया युक्रेनच्या लष्करावर अधिक संहारक हल्ले चढविण्याची तयारी करीत असल्याचे खारकिव्हमधील रशियन सैन्याच्या अतिरिक्त तैनातीमुळे स्पष्ट होत आहे. त्यामुळे युक्रेनच्या युद्धाची तीव्रता अधिकच वाढणार असून पुढच्या काळात हे युद्ध अधिक अक्राळविक्राळ स्वरूप धारण करणार असल्याचे दिसू लागले आहे.

हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info