वॉशिंग्टन – अमेरिकेचे ‘स्नॅपबॅक’ निर्बंध नाकारल्यानंतर युरोपिय देशांनी इराणविरोधात कारवाईसाठी साधे बोटदेखील उचललेले नाही, अशा घणाघाती शब्दात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी युरोपिय देशांना फटकारले. अमेरिकेने शनिवारी इराणविरोधात निर्बंधांची घोषणा केली असून, युरोपिय देशांनी अमेरिकेची ही कारवाई नाकारली आहे. त्याविरोधात अमेरिकेने अधिक आक्रमक पवित्रा घेतला असून निर्बंध न पाळणाऱ्या देशांवरही कारवाई करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे यापुढे इराण मुद्यावरून अमेरिका व युरोपमध्ये नवा तणाव निर्माण होण्याचे संकेत मिळाले आहेत.
२०१८ साली इराणबरोबरील अणुकरारातून बाहेर पडल्यानंतर अमेरिकेने इराणवरील राजकीय, आर्थिक आणि लष्करी दबाव वाढविण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी अमेरिकेने इराणवर ‘स्नॅपबॅक’ निर्बंध लादल्याची घोषणा केली. अमेरिकेने इराणवर सर्वच्या सर्व निर्बंध लादले असून संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्व स्थायी सदस्यांनी या निर्बंधांचे पालन करावे, असे आवाहन अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी केले होते. यामध्ये इराणवरील शस्त्रास्त्रबंदीचाही समावेश आहे. इराणवरील अमेरिकेच्या या निर्बंधांना रशिया आणि चीनने याआधीच विरोध केला असून ब्रिटन, फ्रान्स व जर्मनीनेही आक्षेप घेतला आहे.
मात्र हे आक्षेव धुडकावत अमेरिकेने निर्बंधांबाबत अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांचे संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या सर्व सदस्य देशांनी पालन करणे अपेक्षित आहे. जर सदस्य देश त्यात अपयशी ठरले तर त्यांना अमेरिकेच्या कारवाईला सामोरे जावे लागेल’, असा इशारा अमेरिकेने दिला. या निर्बंधांमध्ये इराणवरील शस्त्रास्त्र विक्री बंदीचाही समावेश आहे. या मुद्यावरून अमेरिकेने युरोपिय देशांना चांगलेच धारेवर धरले आहे.
‘युरोपिय देश खाजगीत इराणला शस्त्रास्त्र विकण्यावर बंदी हवी असे सांगतात. मात्र त्याबाबत कारवाईसाठी एक बोटही उचलत नाहीत. इराणला जी शस्त्रे विकली जातील ती नंतर हिजबुल्लाहसारख्या गटाच्या हाती पडणार आहेत, याची जाणीव ठेवा’, अशा खरमरीत शब्दात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी युरोपिय देशांच्या गुळमुळीत भूमिकेवर घणाघाती प्रहार केला. युरोपिय देशांवर थेट आरोप करून अमेरिकेने इराणसंदर्भातील आपले धोरण अधिक आक्रमक केल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. अमेरिकेच्या या भूमिकेमुळे इराण मुद्यावरून अमेरिका व युरोपमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |