क्युबात परकीय हस्तक्षेप खपवून घेणार नाही – रशियाचा अमेरिकेला इशारा

परकीय हस्तक्षेपमॉस्को/हवाना/वॉशिंग्टन – क्युबा व नजिकच्या क्षेत्रातील घटनांवर रशियाचे बारीक लक्ष आहे. एका सार्वभौम देशाच्या अंतर्गत कारभारात कोणत्याही परकीय शक्तींचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा रशियाने दिला आहे. रविवारी क्युबात सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीच्या कारभाराविरोधात व्यापक निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांना अमेरिकेने पाठिंबा दिला असून रशिया व लॅटिन अमेरिकेतील काही देशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. क्युबाचे राष्ट्राध्यक्ष मिगेल डिआज-कॅनल यांनी, आपल्या देशातील निदर्शनांमागे अमेरिकेचा कट असल्याचा आरोप केला आहे.

रविवारी क्युबातील हजारो नागरिक सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीविरोधात रस्त्यावर उतरल्याचे चित्र पहायला मिळाले. क्युबात सत्ताधारी राजवटीविरोधात अशा रितीने व्यापक निदर्शने होण्याची ही पहिलीच वेळ मानली जाते. निदर्शने करणार्‍या नागरिकांनी कम्युनिस्ट राजवट देशातील जनतेला आवश्यक सोयीसुविधा पुरविण्यात अपयशी ठरत असल्याचा दावा केला. कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना पुरेसे अन्नधान्य, औषधे व इतर जीवनावश्यक गोष्टी उपलब्ध होत नसल्याची तक्रार निदर्शकांनी केली. त्याचवेळी सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने नागरिकांचे स्वातंत्र्य हिरावून घेतल्याचा आरोपही आंदोलकांनी केला.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/cuba-will-not-tolerate-foreign-intervention/