इराण सामुदायिक संहार घडविणारी शस्त्रे अद्ययावत करीत आहे – जर्मन गुप्तचर संघटनेचा आरोप

इराण सामुदायिक संहार घडविणारी शस्त्रे अद्ययावत करीत आहे – जर्मन गुप्तचर संघटनेचा आरोप

बर्लिन – आपला अणुकार्यक्रम हा नागरी वापरासाठी असल्याचा दावा इराण करीत आहे. पण जर्मनीच्या गुप्तचर यंत्रणेने इराणच्या या दाव्याचे स्पष्ट शब्दात खंडन केले आहे. व्हिएन्ना येथील बैठकीत पाश्‍चिमात्य देशांबरोबर वाटाघाटी करणारा इराण आजही सर्वसंहारक शस्त्रांचे अद्ययावतीकरण व त्यांच्या विस्तारासाठी प्रयत्न करीत असल्याचे जर्मन गुप्तचर यंत्रणेने म्हटले आहे. यासाठी इराणच्या एजंट्सनी गेल्या वर्षी जर्मनीसह युरोपमधील संबंधित कंपन्यांशी संपर्क साधल्याचे जर्मन गुप्तचर यंत्रणेने आपल्या अहवालात म्हटले आहे.

गेल्या आठवड्यात ‘बव्हेरियन ऑफिस फॉर दी प्रोटेक्शन ऑफ दी कॉन्स्टिट्युशन’ (बीएफव्ही) या जर्मनीच्या अंतर्गत गुप्तचर यंत्रणेने सुरक्षेसंदर्भातील अहवाल प्रसिद्ध केला. बीएफव्हीच्या जर्मन भाषेतील अहवालात, २०२० सालात देशातील सुरक्षाविषयक घडामोडींची माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेतील आघाडीच्या वर्तमानपत्राने या अहवालातील इराणबाबतच्या मुद्यांचे भाषांतर प्रसिद्ध केले. इराण आपल्या सर्वसंहारक शस्त्रांच्या निर्मितीत व अद्ययावतीकरणात वाढ करीत असल्याचे बीएफव्हीने आपल्या अहवालात म्हटले आहे.

गेल्या आठवड्यात इराणने आपल्या अणुप्रकल्पातील युरेनियमचे संवर्धन ६० टक्क्यांपर्यंत नेले होते. याबाबत बोलताना इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी, हे संवर्धन ९० टक्क्यांपर्यंत नेण्याची क्षमताही इराणकडे असल्याचे सांगितले होते. पण इराणला अणुबॉम्बची निर्मिती करण्यात स्वारस्य नसल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष रोहानी यांनी केला होता. इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या या दाव्याचे जर्मन यंत्रणेने खंडन केले. इराणचे एजंट्स गेल्या वर्षी या क्षेत्रातील उच्चप्रतीच्या तंत्रज्ञानात काम करणार्‍या जर्मनीतील कंपन्यांबरोबर संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत होते, असे सांगून बीएफव्हीने इराण धूळफेक करीत असल्याचा दावा केला. हे साहित्य मिळविण्यासाठी इराण अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय निर्बंधाना बगल देत असल्याचा आरोपही बीएफव्हीने केला. त्याचबरोबर गेल्या काही वर्षांमध्ये इराणच्या हेरांची जर्मनीतील संख्या वाढल्याचे बीएफव्हीने लक्षात आणून दिले. इराणच्या राजवटीसाठी धोकादायक असलेल्या गटांच्या विरोधातही इराणचे एजंट्स काम करीत असल्याचे जर्मन गुप्तचर यंत्रणेने म्हटले आहे.

गेल्या दोन आठवड्यांहून अधिक काळापासून व्हिएन्ना येथे इराण व पाश्‍चिमात्य देशांमध्ये २०१५ सालच्या अणुकरारावर चर्चा सुरू आहे. यादरम्यान, जर्मन गुप्तचर यंत्रणेचा हा अत्यंत महत्त्वाचा अहवाल प्रसिद्ध झाल्याचे अमेरिकी वर्तमानपत्राचे म्हणणे आहे. पण अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने ‘बीएफव्ही’च्या या अहवालावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे, याकडेही अमेरिकी वर्तमानपत्र लक्ष वेधत आहे. तर जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल देखील आपल्याच देशाच्या गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या या अहवालानंतर इराणविरोधात भूमिका घेणार नसल्याचे अमेरिकी अभ्यासगटाचे विश्‍लेषक बेंजामिन वेंथॅल यांनी म्हटले आहे.

‘गेली काही वर्ष जर्मन गुप्तचर यंत्रणा सातत्याने इराण अणुकराराचे करीत असलेले उल्लंघन, अण्वस्त्रनिर्मितीसाठी इराणचे प्रयत्न सुरू असल्याचे इशारे देणारे अहवाल प्रसिद्ध करीत आहे. त्याचबरोबर इराण बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या क्षमतेत वाढ करीत असल्याचा दावा केला होता. पण जर्मनीच्या चॅन्सेलर मर्केल यांनी गुप्तचर यंत्रणेच्या अहवालांकडे दुर्लक्ष करून इराणबरोबरच्या व्यापारी संबंधाना अधिक महत्त्व दिले’, अशी टीका वेंथॅल यांनी केली आहे.

दरम्यान, जर्मन गुप्तचर यंत्रणा इराणबाबत हा इशारा देत असताना, जर्मनीचे सरकार मात्र इराणच्या अणुकरारावर व्हिएन्ना येथे सुरू असलेल्या चर्चेला यश मिळावे, यासाठी प्रयत्न करीत आहे. इराणने २०१५ सालच्या अणुकरारात सामील व्हावे आणि अमेरिकेने इराणवरील निर्बंध शिथिल करावे, हे या चर्चेचे उद्दिष्ट असल्याची घोषणा जर्मनीचे परराष्ट्रमंत्री हैको मास यांनी केली आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info