आर्मेनिया-अझरबैजान युद्धात १००हून अधिकजणांचा बळी – तुर्कीने लढाऊ विमान पाडल्याचा आर्मेनियाचा आरोप

आर्मेनिया-अझरबैजान युद्धात १००हून अधिकजणांचा बळी – तुर्कीने लढाऊ विमान पाडल्याचा आर्मेनियाचा आरोप

येरेवान/बाकु – रविवारपासून भडकलेल्या आर्मेनिया-अझरबैजान युद्धात १०० हून अधिक जणांचा बळी गेला असून, जखमी जवान व नागरिकांची संख्या ३०० वर गेली आहे. दोन्ही देशांनी परस्परांच्या भागातील मोक्याची ठिकाणे ताब्यात घेतल्याचे दावे केले असून, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढाई सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. त्याचवेळी आर्मेनियाने तुर्कीने आपले लढाऊ विमान पाडल्याचा आरोप केला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आर्मेनियाच्या पंतप्रधानांशी चर्चा केल्याचेही समोर आले आहे. तुर्कीकडून अझरबैजानला देण्यात येणाऱ्या सहाय्यावर रशियाने नाराजी व्यक्त केली असून, तुर्की राष्ट्राध्यक्षांनी शांततापूर्ण तोडग्यासाठी प्रयत्न करावेत असे बजावले आहे.

जुलै महिन्यात आर्मेनिया व अझरबैजानमध्ये भडकलेल्या संघर्षात १६ जवानांचा बळी गेला होता. मात्र रविवारी पहाटे सुरू झालेल्या संघर्षाचे रूपांतर युद्धात झाले असून, आतापर्यंत १००हून अधिकजणांचा बळी गेला आहे. यात आर्मेनियाच्या नियंत्रणाखाली असलेल्या ‘नागोर्नो -कॅराबख’मधील ८० हून जास्त जवानांचा समावेश आहे. अझरबैजानने आपली जीवितहानी झाल्याचे मान्य केले असले तरी मृत जवानांची आकडेवारी जाहीर केलेली नाही. दोन्ही बाजूला जखमी झालेल्या जवान व नागरिकांची संख्या ३००हून अधिक झाली आहे.

आर्मेनिया-अझरबैजान युद्धातील तुर्कीचा वाढता सहभाग लक्ष वेधून घेणारा ठरत आहे. गेल्या काही वर्षात सिरिया व लिबियातील युद्धात तुर्कीने केलेल्या हस्तक्षेपामुळे आंतरराष्ट्रीय समुदायात नाराजी आहे. ही पार्श्वभूमी असतानाही तुर्कीने अझरबैजानच्या रुपात तिसरी आघाडी उघडून आपल्या विस्तारवादी महत्त्वाकांक्षा दाखवून दिल्या आहेत. एकेकाळी सोव्हिएत युनियनचा भाग असणाऱ्या देशांमधील संघर्षात तुर्कीने घेतलेल्या या उडीवर रशियाकडून नाराजीची प्रतिक्रिया उमटली आहे. त्यामुळे आर्मेनिया-अझरबैजानच्या मुद्यावरून रशिया व तुर्कीमधील तणाव अधिक चिघळेल, असे दावे करण्यात येत आहेत.

दरम्यान, आर्मेनियाच्या लष्कराने आपले लढाऊ विमान तुर्कीकडून पाडण्यात आल्याचा आरोप केला आहे. अझरबैजानच्या हवाईहद्दीतुन आलेल्या तुर्कीच्या ‘एफ-१६’ विमानाने आपले ‘एसयु-२५’ हे लढाऊ विमान पाडल्याचे आर्मेनियाच्या संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले. ही घटना आर्मेनियाच्या हद्दीत घडल्याचा दावाही करण्यात आला आहे. तुर्कीने हा दावा फेटाळून लावला आहे.

१९९१ साली सोव्हिएत युनियनमधून स्वतंत्र झालेल्या आर्मेनिया व अझरबैजानमध्ये, १९८०च्या दशकापासून सातत्याने ‘नागोर्नो -कॅराबख’वरील ताब्यावरून संघर्षाचे खटके उडत आहेत. रशियाने या मुद्द्यावर आर्मेनियाला समर्थन दिले असून त्या देशाशी संरक्षण करारही केला आहे. आर्मेनिया हा ख्रिस्तधर्मिय देश म्हणून ओळखला जात असून त्याची लोकसंख्या ३० लाखांच्या आसपास आहे.

‘नागोर्नो -कॅराबख’मध्ये ख्रिस्तधर्मीय आर्मेनियन्सची संख्या जास्त असली तरी जागतिक पातळीवर हा भाग अझरबैजानचा भाग मानला जातो. या प्रांतातील स्वायत्त सरकारने अझरबैजानचे नियंत्रण मानण्यास नकार दिला असून आर्मेनियाने त्यांना पूर्ण पाठिंबा दिला आहे. अझरबैजान हा इस्लामधर्मीय देश असून त्यात तुर्कीवंशियांची संख्या मोठी आहे. सुमारे एक कोटींहून अधिक लोकसंख्या असलेला हा देश इंधनसंपन्न देश म्हणून ओळखला जातो. रशियातून युरोप तसेच तुर्कीत जाणाऱ्या काही इंधनवाहिन्या अझरबैजानमधून जात असल्याने हा भाग सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info