तैवानच्या चिथावणीखोर कारवायांमुळे चीनसमोर युद्धाशिवाय पर्याय राहणार नाही

चीनच्या मुखपत्राची धमकी

बीजिंग/तैपेई – तैवानच्या सत्ताधार्‍यांनी चिथावणीखोर कारवाया कायम ठेवल्या तर चीनसमोर युद्धाशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही, अशी उघड धमकी चिनी माध्यमांनी दिली आहे. रविवारी तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या भाषणाविरोधात गरळ ओकताना ही धमकी देण्यात आली. शनिवारी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी, तैवानचे शांततापूर्ण मार्गाने विलिनीकरण करण्यास वचनबद्ध असल्याचे बजावले होते. त्याला प्रत्युत्तर देताना तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांनी, तैवान कोणासमोरही झुकणार नाही असा इशारा दिला होता.

चिथावणीखोर

या महिन्याच्या पहिल्या चार दिवसात, चीनच्या सुमारे दीडशे विमानांनी तैवानच्या ‘एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन’मध्ये (एडीआयझेड) घुसखोरी केली. ही आतापर्यंतची सर्वात मोठी घुसखोरी ठरली आहे. लढाऊ विमानांच्या घुसखोरीव्यतिरिक्त चीनने तैवानवरील आक्रमणासाठी विविध भागांमध्ये सराव सुरू केल्याचे तसेच तैनाती वाढविल्याची माहितीही समोर येत आहे. यामुळे चीन व तैवानमधील तणाव टोकाला पोहोचला असून अनेक विश्‍लेषक व तज्ज्ञांनी संघर्षाचे भाकितही वर्तविले आहे. याच पार्श्‍वभूमीवर चीनचे सरकारी मुखपत्र असणार्‍या ‘ग्लोबल टाईम्स’ची धमकी लक्ष वेधून घेत आहे.

रविवारी तैवानच्या ७२व्या स्वातंत्र्यदिनी राष्ट्राध्यक्ष इंग-वेन यांनी केलेले भाषण म्हणजे ‘राजकीय फार्स’ असल्याची टीका ‘ग्लोबल टाईम्स’ने केली. ‘तैवानच्या राष्ट्राध्यक्षांचे वक्तव्य चीनविरोधी द्वेषाने भरलेले आहे. चीनला शत्रूदेश म्हणणे हे तैवानी राजवटीच्या विघटनवादी धोरणाचे निदर्शक असून ही राजवट द्विराष्ट्र सिद्धांताच पुरस्कार करीत आहे. लोकशाहीवादी व मुक्त जगाचे प्रतिनिधित्व करणारा तैवान एकाधिकारशाहीविरोधातील आघाडीचा भाग आहे, असे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ही बाब म्हणजे फार मोठी चिथावणी ठरते’, असा आरोप ‘ग्लोबल टाईम्स’ने केला आहे. जर तैवानच्या राजवटीने अशा प्रकारे चिथावणी देणे सुरू ठेवले तर चीनसमोर युद्ध छेडण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही, अशी धमकीही या मुखपत्राने दिली.

चिथावणीखोर

गेल्या काही दिवसात, चिनी मुखपत्राने तैवानला दिलेली ही दुसरी धमकी ठरली आहे. गेल्या आठवड्यात चिनी विमानांच्या तैवान हद्दीतील हालचालींवरूनही ग्लोबल टाईम्सने धमकावले होते. चीनच्या ‘पीएलए’कडून पाठविण्यात येणारी विमानांची वाढती संख्या म्हणजे आक्रमणाची तयारी असल्याचे सरकारी मुखपत्र ‘ग्लोबल टाईम्स’ने धमकावले होते. सातत्याने पाठविण्यात येणार्‍या विमानांमुळे चिनी वैमानिकांना तैवानच्या परिसराची चांगली ओळख झाली असून, हल्ल्याचे आदेश दिल्यास ते अनुभवी वैमानिकाप्रमाणे कारवाई करतील, असा दावा ‘ग्लोबल टाईम्स’च्या लेखात करण्यात आला होता.

दरम्यान, तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांनी रविवारी देशाला संबोधित करताना चीन व तैवानमधील ‘स्टेटस को’ अर्थात यथास्थिती बदलणार नाही, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची स्पष्ट ग्वाही दिली. ‘चीन व तैवानमधील संबंध सुरळीत होतील, अशी अपेक्षा असून कोणीही उतावीळपणा करणार नाही. पण त्याचवेळी तैवानची जनता कोणत्याही दडपणासमोर झुकेल, अशा भ्रमातही कुणी राहू नये’, असा इशारा राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांनी दिला. यावेळी तैवान आपली संरक्षणक्षमता वाढवून सुरक्षेसाठी सज्ज राहिल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. चीनने दाखविलेल्या मार्गावर चालावे यासाठी तैवानवर कोणीही बळजबरी करु शकत नाही, असेही राष्ट्राध्यक्षांनी खडसावले.

राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांनी दिलेल्या या इशार्‍यापूर्वी चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी पुन्हा एकदा तैवानच्या विलिनीकरणाचा मुद्दा उपस्थित केल्याचे समोर आले. तैवानचे स्वातंत्र्य व विघटनवाद हा चीनला नवचैतन्य मिळवून देण्यातील सर्वात मोठा अडथळा असल्याचा दावा जिनपिंग यांनी केला. चीनचे एकत्रीकरण वास्तवात उतरणार असून ते शांततापूर्ण मार्गाने घडविणे तैवानी जनतेच्या हिताचे असेल, असा इशारा चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला आहे. चीन आपले सार्वभौमत्त्व व एकजुटीचे रक्षण करेल, असेही त्यांनी बजावले होते.

English     हिंदी

Click below to express your thoughts and views on this news:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info