मॉस्को/पॅरिस/इस्तंबूल – आर्मेनिया-अझरबैजानमध्ये सुरू असणाऱ्या संघर्षात सिरिया व लिबियातून परदेशी दहशतवादी व मारेकरी धाडल्याची माहिती समोर आली असून, त्यांना ताबडतोब हटविण्याची मागणी रशियन परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे. या मुद्यावर रशिया व फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये चर्चा झाल्याचेही समोर आले असून या देशांनी संयुक्त निवेदनही प्रसिद्ध केले आहे. या निवेदनात, यापूर्वी आर्मेनिया-अझरबैजान संघर्ष रोखण्यासाठी स्थापन केलेल्या ‘मिन्स्क ग्रुप’ने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. मात्र युद्ध थांबविण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून सुरू असलेले प्रयत्न आर्मेनिया व अझरबैजानने धुडकावून लावले आहेत. त्यामुळे नजिकच्या काळात या देशांमध्ये सुरू असलेला संघर्ष अधिकच पेटण्याचे संकेत मिळत आहेत.
सलग पाचव्या दिवशी आर्मेनिया-अझरबैजानमध्ये युद्ध सुरूच असून हल्ल्यांची तीव्रता अधिक वाढत असल्याची माहिती समोर येत आहे. या युद्धात अझरबैजानला तुर्की व पाकिस्तानकडून मदत होत असल्याची माहिती समोर येत आहे. तुर्कीने अझरबैजानमध्ये सिरिया व लिबियातील दहशतवादी पाठविल्याचे दावे माध्यमांकडून करण्यात आले आहेत. तुर्कीच्या या हालचालींवर रशियासह आंतरराष्ट्रीय समुदायाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.
‘सिरिया व लिबियातील दहशतवादी नागोर्नो-कॅराबखमध्ये पाठविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या हालचाली तीव्र चिंताजनक आहेत. अशा कारवायांमुळे युद्धग्रस्त भागातील तणाव अधिक चिघळू शकतो. त्याचवेळी या क्षेत्रातील सर्व देशांच्या सुरक्षेला दीर्घकालीन धोकाही निर्माण होऊ शकतो. ज्या देशांकडून या हालचाली सुरू आहेत त्यांनी त्या ताबडतोब थांबवाव्यात आणि या क्षेत्रातील दहशतवादी व भाडोत्री मारेकऱ्यांना माघारी घ्यावे’, असे रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने बजावले आहे. या निवेदनानंतर काही तासांनी रशिया व फ्रान्समध्ये आर्मेनिया-अझरबैजान मुद्यावर चर्चा झाल्याची माहितीही समोर आली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन व फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात दूरध्वनीवरून बोलणी झाल्याचे दोन्ही देशांकडून सांगण्यात आले.
‘आर्मेनिया-अझरबैजानमधील संघर्षबंदीच्या प्रयत्नांना वेग देण्यावर रशिया व फ्रान्सचे एकमत झाले आहे. युद्ध सुरू असणाऱ्या दोन्ही बाजूंनी हल्ले थांबवावेत व तणाव कमी करण्यासाठी पावले उचलावीत, असे आवाहनही करण्यात येत आहे’, या शब्दात फ्रान्सने पुतिन यांच्याबरोबर झालेल्या चर्चेची माहिती प्रसिद्ध केली. तुर्कीकडून अझरबैजानमध्ये सिरियन दहशतवादी पाठविण्यात येत असल्याचे वृत्त तीव्र चिंताजनक असल्याचेही फ्रान्सने म्हटले आहे. ‘सिरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राईट्स’ या गटाने तुर्की सिक्युरिटी कंपन्यांनी ९०० सिरियन दहशतवादी अझरबैजानमध्ये पाठविण्यात आल्याचा दावा केला आहे.
दरम्यान, गुरुवारी हल्ल्यांची तीव्रता अधिक वाढल्याची माहिती दोन्ही बाजूंकडून देण्यात आली आहे. आर्मेनियाच्या ठिकाणांवर रणगाडे व तोफांच्या सहाय्याने जबरदस्त मारा करण्यात आला असून काही जागा ताब्यात घेण्यात आल्या आहेत, असा दावा अझरबैजानच्या संरक्षण विभागाने केला. अझरबैजानने एक व्हिडिओ प्रसिद्ध करून त्यात आर्मेनियन रणगाडे उडविल्याचे सांगितले. तर आर्मेनियाच्या संरक्षणदलांनी सर्व हल्ले परतविल्याचा दावा आर्मेनियन अधिकाऱ्यांनी केला.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |