नाटोने युक्रेनला प्रचंड प्रमाणात शस्त्रास्त्रे पुरविल्यानंतर रशियाने नाटोसह पाश्चिमात्य देशांविरोधात युद्धाला सुरुवात केली आहे

- युरोपियन अधिकाऱ्याचा इशारा

युद्धाला सुरुवात

मॉस्को/किव्ह – पाश्चिमात्य देशांनी युक्रेनसाठी जाहीर केलेल्या नव्या शस्त्रपुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर रशियाने नाटो व पाश्चिमात्य देशांविरोधात युद्धाला सुरुवात केली असून युक्रेनमधील संघर्ष आता वेगळ्या उंचीवर जाऊ शकतो, असा इशारा युरोपियन महासंघाचे वरिष्ठ अधिकारी स्टेफानो सॅनिनो यांनी दिला. सॅनिनो हे महासंघाच्या परराष्ट्र विभागात महासचिव म्हणून कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी जर्मनीच्या परराष्ट्रमंत्री ॲनालेना बेअरबॉक यांनी एका बैठकीत, युरोप रशियाविरोधात युद्धात उतरला असल्याचे वक्तव्य केले होते. तर रशियाचे माजी अधिकारी सर्जेई कॅरागनोव्ह यांनी, रणगाडे पाठविणारे नाटो देश उघडपणे युद्धात उतरल्याचे संकेत देत असून ते रशियाचे लक्ष्य ठरतील, असे बजावले आहे. दरम्यान, रशियाने गुरुवारी युक्रेनची राजधानी किव्ह व नजिकच्या परिसरात मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला असून त्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचे सांगण्यात येते.

युद्धाला सुरुवात

रशियाकडून युक्रेनमधील हल्ले अधिक प्रखर होत असून नव्या लष्करी तैनातीसह मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले आहेत. युक्रेन आघाडीवरील बहुतांश भागात रशियाने लष्करी तैनाती वाढविली असून खार्किव्हपासून ओडेसापर्यंतच्या भागात सातत्याने मारा करण्यात येत आहे. रशियाच्या या आक्रमक माऱ्यामुळे युक्रेनची आगेकूच थंडावली असून सध्या ताब्यात असलेले भाग सुरक्षित ठेवण्यावर युक्रेनी लष्कर भर देत आहे. मात्र त्याचवेळी पुढील काही आठवड्यांमध्ये रशियाला प्रत्युत्तर देण्याची योजनाही आखली जात असून त्यासाठी पाश्चिमात्य देशांकडून अधिकाधिक शस्त्रांची मागणी करण्यात आली आहे.

युद्धाला सुरुवात

युक्रेनच्या मागणीला प्रतिसाद देऊन अमेरिका व नाटो सदस्य देशांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रपुरवठ्याची घोषणा करण्यात आली आहे. यात क्षेपणास्त्रे, रणगाडे, तोफा, सशस्त्र वाहने यांचा समावेश आहे. काही देशांकडून युक्रेनला लढाऊ विमाने पुरविण्याच्या हालचाली सुरू असल्याचेही सांगण्यात येते. पाश्चिमात्यांच्या या शस्त्रपुरवठ्याविरोधात रशिया सातत्याने इशारे देत आहे. युक्रेनमधील इतर यंत्रणांप्रमाणेच अमेरिकेच्या रणगाड्यांचीही जळून राख होईल, असे रशियन सरकारचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी नुकतेच बजावले होते. तर रशियन राजदूत ॲनातोली ॲन्टानोव्ह यांनी पाश्चिमात्य रणगाड्यांची तैनाती रशिया-युक्रेन संघर्ष वेगळ्या स्तरावर नेणारी ठरेल, याकडे लक्ष वेधले होते.

युद्धाला सुरुवात

आता युरोपिय देशांमधील नेते व अधिकारीही रशिया-नाटो संघर्षाबाबत उघडपणे वक्तव्ये करू लागल्याचे समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी युक्रेनच्या शस्त्रपुरवठ्याचे समर्थन करताना, युरोपचे रशियाविरोधात युद्ध सुरू आहे असा दावा केला होता. त्यानंतर आता महासंघाच्या परराष्ट्र विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रशियाचे नाटो व पाश्चिमात्य देशांविरोधात युद्ध सुरू झाले असून युक्रेनमधील संघर्ष वेगळ्याच उंचीवर गेल्याचे बजावले आहे. रशियन सरकारचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनीही अमेरिका व युरोप आता उघडपणे युक्रेनमधील युद्धात सहभागी झाल्याचे दिसत आहे, याकडे लक्ष वेधले.

दरम्यान, रशियाने गुरुवारी युक्रेनमध्ये मोठे क्षेपणास्त्र हल्ले चढविले. राजधानी किव्ह व नजिकच्या भागाला यावेळी लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये मोठी जीवितहानी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. रशियाची बहुतांश क्षेपणास्त्रे पाडल्याचा दावा युक्रेनने केला.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info