येरेवान/बाकु – रशियाच्या पुढाकाराने मान्य झालेली संघर्षबंदी लागू होण्यापूर्वीच आर्मेनिया व अझरबैजानमध्ये पुन्हा युद्धाचा भडका उडाला आहे. दोन्ही देशांनी परस्परांवर, संघर्षबंदीचे उल्लंघन करून हल्ले चढविल्याचे आरोप केले आहेत. अझरबैजानने ‘नागोर्नो-कॅराबख’ची राजधानी स्टेपनकेर्टमध्ये हल्ले केल्याचा आरोप आर्मेनियाने केला आहे. तर आर्मेनियाने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात नऊजणांचा बळी गेला असून ३०हून अधिक जखमी झाल्याचा दावा अझरबैजान सरकारने केला आहे. त्यामुळे गेले दोन आठवडे सुरू असलेले आर्मेनिया-अझरबैजान युद्ध अधिकच पेट घेण्याचे संकेत मिळत आहेत.
शुक्रवारी रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये आर्मेनिया व अझरबैजानमधील प्राथमिक स्तरावर चर्चा झाली होती. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या पुढाकाराने सुरू झालेली ही चर्चा, आर्मेनिया-अझरबैजान युद्धात तोडगा काढण्याचा पहिला प्रयत्न मानला जातो. मॉस्कोतील बैठकीत रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांच्यासह दोन्ही देशांचे परराष्ट्रमंत्री सहभागी झाले होते. तब्बल १० तासांच्या चर्चेनंतर दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी, युद्धकैदी व मृतदेहांची देवाणघेवाण करण्यापुरती संघर्षबंदीला मान्यता दिली होती. मात्र शनिवारी सकाळी ही संघर्षबंदी लागू होण्यापूर्वीच दोन्ही देशांमध्ये बंदीचे उल्लंघन केल्याच्या आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली. त्यामुळे तात्पुरत्या संघर्षबंदीसाठीही दोन्ही देश तयार नसून ती अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले. रशियाने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.
अझरबैजानच्या लष्कराने ‘नागोर्नो-कॅराबख’ची राजधानी स्टेपनकेर्टमध्ये नागरी वस्त्यांवर हल्ले चढविल्याचा आरोप आर्मेनियाने केला आहे. शनिवारी पहाटे झालेल्या या हल्ल्यात मोठी हानी झाल्याची माहिती आर्मेनियन सूत्रांनी दिली. तर आर्मेनियाने गांजा शहरात क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा दावा अझरबैजानकडून करण्यात आला आहे. या हल्ल्यात नऊ जणांचा बळी गेला असून ३३ जण जखमी झाल्याचे अझरबैजान सरकारने सांगितले. गांजा हे अझरबैजानमधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर असून याच भागात, तुर्कीने ‘एफ-१६ वायपर’ लढाऊ विमाने तैनात केल्याचे काही दिवसांपूर्वी उघड झाले होते. गांजापाठोपाठ ‘मिंगासेविर’मधील वीज प्रकल्पावर हल्ला झाल्याचेही अझरबैजानकडून सांगण्यात आले.
दरम्यान, ‘नागोर्नो-कॅराबख’मधील सुमारे ७० हजारांहून अधिक नागरिकांना युद्धामुळे विस्थापित व्हावे लागल्याची माहिती देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर युरोप तसेच लॅटिन अमेरिकेत आर्मेनियाच्या समर्थनार्थ निदर्शने सुरू झाल्याचे समोर आले आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |