भूमध्य सागरातील कारवायांवरून जर्मनीचा तुर्कीला इशारा

भूमध्य सागरातील कारवायांवरून जर्मनीचा तुर्कीला इशारा

बर्लिन/अथेन्स/अंकारा – ‘तुर्कीने यापूर्वी वारंवार वाटाघाटींमध्ये रस असल्याचे सांगितले आहे. ते याबाबतीत गंभीर असतील तर त्यांनी एकाच वेळी तणाव शिथिल करण्याचा व त्याचवेळी चिथावणीखोर कारवाया सुरू ठेवण्याचा खेळ थांबवावा. ग्रीसकडून दावा करण्यात येणाऱ्या क्षेत्रात तुर्कीने इंधन उत्खनन मोहीम सुरू करू नये आणि वाटाघाटी चालू कराव्यात’, असा स्पष्ट इशारा जर्मनीचे परराष्ट्रमंत्री हैको मास यांनी दिला आहे. तुर्कीने सोमवारी आपली तीन जहाजे पुन्हा एकदा भूमध्य सागरी क्षेत्रात संशोधनासाठी रवाना केली आहेत. त्यामुळे या भागातील तणाव पुन्हा एकदा चिघळण्याचे संकेत मिळत असून, त्या पार्श्वभूमीवर जर्मनीने दिलेला इशारा महत्त्वाचा ठरतो.

हैको मास

ऑगस्ट महिन्यात, तुर्कीने ‘नॅव्हटेक्स अलर्ट’ जारी करून आपले ‘ओरुक रेईस’ हे ‘रिसर्च शिप’ दोन जहाजांसह भूमध्य सागरी क्षेत्रात संशोधनासाठी धाडले होते. तुर्कीच्या या कारवाईवर ग्रीसमधून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. भूमध्य सागरातील शांतता व स्थैर्याला धोका पोहोचवणाऱ्या बेकायदेशीर कारवाया तुर्कीने ताबडतोब थांबवाव्यात, असा इशारा ग्रीसने दिला होता. अमेरिकेसह युरोपीय महासंघ व नाटोनेही तुर्कीच्या हालचालींवर नाराजी व्यक्त केली होती. तुर्कीच्या कारवायांमुळे तणाव वाढल्याने फ्रान्सने भूमध्य सागरातील आपली संरक्षण तैनाती मजबूत करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा करून, ‘ला फाएत’ ही विनाशिका व रफायल विमाने तैनात केली होती. मात्र तुर्कीने आपली मोहीम चालूच ठेवल्याने या क्षेत्रातील तणाव वाढला होता. अमेरिका व युरोपिय महासंघाने या वादात ग्रीसचे समर्थन करीत तुर्कीवर दबाव टाकण्यास सुरुवात केली होती. या दबावामुळे गेल्या महिन्यात तुर्कीने आपले जहाज भूमध्य सागरी क्षेत्रातून माघारी घेऊन ग्रीसबरोबर चर्चेस सुरुवात केली होती.

हैको मास

गेल्या आठवड्यात युरोपमधील एका अभ्यासगटाच्या कार्यक्रमादरम्यान, ग्रीस व तुर्कीच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये चर्चाही झाली होती. या पार्श्वभूमीवर, तुर्कीने पुन्हा आपली जहाजे पाठवून चिथावणी दिल्याचे दिसत आहे. तुर्की नौदलाने ‘नॅव्हटेक्स अलर्ट’ जारी करून ‘ओरुक रेईस’ ही ‘रिसर्च शिप’, ‘अतामान’ व ‘सेंगीज हान’ या दोन जहाजांसह ‘कॅस्टेलोरिझो’ या ग्रीक बेटानजिक रवाना केली आहे. ही तिन्ही जहाजे २२ ऑक्टोबरपर्यंत या क्षेत्रात सक्रिय असतील, असेही सांगण्यात आले आहे. तुर्की इंधनाचा शोध सुरूच ठेवेल आणि आपल्या अधिकारांचेही रक्षण करेल, अशा शब्दात तुर्कीच्या ऊर्जामंत्र्यांनी मोहिमेचे समर्थन केले. जर या क्षेत्रात इंधन सापडले तर तुर्की त्याचे उत्खननही सुरू करेल, असेही तुर्की मंत्र्यानी बजावले.

हैको मास

तुर्कीच्या या कारवाईवर ग्रीसकडून आक्रमक प्रतिक्रिया उमटली आहे. ‘तुर्कीने आपला निर्णय ताबडतोब माघारी घ्यावा. नवी मोहीम हा जाणूनबुजून तणाव चिघळविण्याचा प्रयत्न आहे. तुर्कीची कारवाई भूमध्य सागरी क्षेत्रातील शांतता व सुरक्षेला गंभीर धोका ठरतो’, असा आरोप ग्रीसच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला. चर्चा सुरू असतानाच पुन्हा मोहीम सुरु करण्याच्या हालचाली तुर्की हा विश्वासार्ह देश नसल्याचे दाखवून देतात, असा टोलाही ग्रीसने लगावला आहे.

अमेरिका व युरोपिय महासंघाने ‘ग्रीस-तुर्की’ वादात ग्रीसच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे संकेत दिले आहेत. काही दिवसांपूर्वीच युरोपिय महासंघाच्या बैठकीत, भूमध्य सागरातील कारवायांवरून तुर्कीवर निर्बंध लादण्याचा इशाराही देण्यात आला होता. त्यानंतर आता महासंघाचे प्रमुख पद भूषविणाऱ्या जर्मनीकडून करण्यात आलेले वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरते. दरम्यान, जर्मनीचे परराष्ट्रमंत्री हैको मास बुधवारी तुर्कीला भेट देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info