हमासच्या नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी इस्रायलचे गाझावर हवाई हल्ले

हमासच्या नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी इस्रायलचे गाझावर हवाई हल्ले
  • गाझातून इस्रायलवर तीन हजार रॉकेट्सचे हल्ले
  • इस्रायलने संघर्षबंदीची शक्यता धुडकावली

जेरूसलेम – ‘हमासच्या रॉकेट्समुळे इस्रायलची जनता बंकरमध्ये रात्र काढत असताना, आम्ही हमासच्या नेत्यांनाही शांतपणे जगू देणार नाही’, असा इशारा इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी दोन दिवसांपूर्वी दिला होता. गाझापट्टीतील हमासचा प्रमुख याह्या सिन्वर याचे घर हवाईहल्ल्यात जमीनदोस्त करून इस्रायलने आपला इशारा प्रत्यक्षात उतरविला. सिन्वर या हल्ल्यातून थोडक्यात बचावल्याचे सांगितले जाते. हमासच्या इतर नेत्यांनाही टार्गेट करण्यासाठी इस्रायलने कारवाई सुरू केली आहे. रविवारी पहाटे इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये ३० जणांचा बळी गेल्याचा आरोप हमाससंलग्न आरोग्य यंत्रणा करीत आहे.

गेल्या दोन दशकांमध्ये इस्रायलवर इतक्या मोठ्या संख्येने रॉकेट हल्ले झाले नसल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे. २०१९ साली इस्लामिक जिहादने तीन दिवसांच्या संघर्षात इस्रायलवर ५७० रॉकेट हल्ले चढविले होते. तर २००६ साली लेबेनॉनमधील हिजबुल्लाहने १९ दिवसांच्या संघर्षात सुमारे ४५०० रॉकेट्सचा वर्षाव केला होत. पण यावेळी अवघ्या सहा दिवसांमध्ये हमास व इस्लामिक जिहादने गाझापट्टीतून इस्रायलवर तीन हजार रॉकेट हल्ले चढविले.

त्याचबरोबर हमासने थेट जेरूसलेम आणि अतिसंवदेनशील ठिकाणांच्या दिशेने रॉकेट्स प्रक्षेपित केले होते. त्यामुळे याआधीच्या तुलनेत इस्रायलवरील रॉकेट हल्ल्यांची तीव्रता धोकादायकरित्या वाढल्याचे इस्रायली लष्कराने लक्षात आणून दिले. यातील जवळपास ६०० रॉकेट्स गाझापट्टीतच कोसळले आणि त्याने पॅलेस्टिनींचीच जीवितहानी झाली आहे. पण हमास त्याची पर्वा करायला तयार नाही, यावरून हमासची मानसिकता लक्षात घ्यायला हवी, असे इस्रायलचे राजनैतिक अधिकारी सांगत आहेत.

गेल्या चोवीस तासात हमासने इस्रायलवर १३० रॉकेट हल्ले चढविले. गाझातून होणार्‍या या रॉकेट हल्ल्यांवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘इस्रायली जनतेवर शेकडो रॉकेट हल्ले चढविणारे हमासचे नेते गाझापट्टीतच काय तर जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात सुरक्षित राहणार नाहीत’, असा सज्जड इशारा पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी दिला. त्यानंतर इस्रायलने गाझातील हमासच्या राजकीय तसेच अल-कासम ब्रिगेडच्या वरिष्ठ नेत्यांपासून कमांडर पदावरच्या अधिकार्‍यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली.

शनिवारच्या कारवाईत इस्रायलने हमासच्या दोन नेत्यांची घरे उद्ध्वस्त केली. यामध्ये हमासचा प्रमुख याह्या सिन्वर व त्याचा भाऊ मुहम्मद सिन्वर यांच्या घरांचा समावेश आहे. याह्याच्या घराच्या तळाशी शस्त्रसाठा लपविला होता, असा आरोप इस्रायली लष्कर करीत आहे. तर मुहम्मद सिन्वर हा हमासच्या लॉजिस्टिक विभागाचा प्रमुख होता. याशिवाय इस्रायलने गाझातील भुयारीमार्गांच्या आणखी एका नेटवर्कवर क्षेपणास्त्र हल्ले चढविल्याचा दावा केला.

या कारवाईच्या आधी इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यात फोनवरुन चर्चा झाली. गाझातील दहशतवादी संघटनांवरील कारवाई यापुढेही सुरू असेल. पण यामध्ये निर्दोष पॅलेस्टिनी जनतेचा बळी जाणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे आश्‍वासन इस्रायलच्या पंतप्रधानांनी दिले.

दरम्यान, रविवारी पहाटे इस्रायलने गाझात चढविलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये ३० जणांचा बळी गेल्याचा आरोप हमास करीत आहे. गेल्या सहा दिवसांच्या संघर्षात १८१ पॅलेस्टिनी ठार झाले असून यामध्ये ५२ मुलांचा समावेश असल्याचे हमाससंलग्न आरोग्य यंत्रणा करीत आहे. तर यामध्ये ११० हून अधिक हमासचे दहशतवादी होते, असे इस्रायलचे म्हणणे आहे. त्याचबरोबर शनिवारी गाझातील ‘अल-जाला’ इमारतीत आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या कार्यालयांबरोबरच हमासचे ठिकाणही होते, असा आरोप इस्रायलने केला. तसेच यासंबंधीचे पुरावे इस्रायलने अमेरिकेचे विशेषदूत हॅडी अम्र यांना सोपविले आहेत.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info