चीनच्या ‘मरिन कॉर्प्स’नी युद्धासाठी सज्ज रहावे – राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग याचे आदेश

चीनच्या ‘मरिन कॉर्प्स’नी युद्धासाठी सज्ज रहावे – राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग याचे आदेश

बीजिंग/तैपेई – चीनच्या संरक्षणदलातील ‘एलाईट फोर्स’ म्हणून ओळखण्यात येणाऱ्या ‘मरिन कॉर्प्स’नी युद्धासाठी सज्ज रहावे, असे आदेश राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिले आहेत. चीनच्या ग्वांंगडोंग प्रांतातील लष्करी तळाला दिलेल्या भेटीत जिनपिंग यांनी हे आदेश दिले आहेत. काही दिवसांपूर्वी चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने याच प्रांतात, तैवानवरील हल्ल्याची रंगीत तालीम मानल्या जाणाऱ्या सरावाचे आयोजन केले होते. या पार्श्वभूमीवर जिनपिंग यांची भेट व युद्धासाठी सज्ज राहण्याबाबत दिलेले आदेश तैवानवरील आक्रमणाच्या पूर्वतयारीचा भाग असावा, असे मानले जाते. गेल्या पाच महिन्यांच्या कालावधीत जिनपिंग यांनी आपल्या संरक्षणदलाला युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्याची ही दुसरी वेळ आहे.

मंगळवारी राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी ग्वांंगडोंग प्रांतातील ‘मरिन कॉर्प्स’च्या तळाला भेट दिली. ‘मरिन्सवर वेगवेगळ्या प्रकारच्या मोहिमांची जबाबदारी असते व तुमच्याकडून मोठ्या अपेक्षा असतात. सध्याच्या काळात प्रशिक्षणाचा दर्जा उंचावून संघर्षासाठी आवश्यक क्षमता मिळविणे महत्त्वाचे आहे. तुमचे प्रशिक्षण युद्धावर जाण्यासाठी आवश्यक असलेल्या तयारीचे असायला हवे. मरिन्सनी आपले सर्व लक्ष व ऊर्जा युद्धावर जाण्याच्या सज्जतेवर केंद्रित करावे आणि अलर्ट रहावे’, असे आदेश राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी दिले. चीनचे सार्वभौमत्व, क्षेत्रीय एकात्मता आणि सागरी क्षेत्र तसेच परदेशातील हितसंबंध यांचे संरक्षण करणे हे मरिन कॉर्प्सचे कर्तव्य असल्याची जाणीवही जिनपिंग यांनी यावेळी करून दिली. युद्धसज्जतेसाठी दिलेले आदेश आणि सार्वभौमत्व व सागरी क्षेत्रासंदर्भात केलेले वक्तव्य हे तैवानवरील संभाव्य आक्रमणाचे संकेत असल्याचा दावा चिनी विश्लेषक करीत आहेत.

गेल्या काही महिन्यात कोरोना साथीच्या मुद्यावरून जगभरात चीनविरोधात तीव्र असंतोष आहे. त्याचवेळी चीनच्या अर्थव्यवस्थेलाही मोठ्या प्रमाणात धक्के बसत असून जिनपिंग यांच्या नेतृत्वाविरोधात देशातील नाराजीची भावनाही वाढते आहे. अशा स्थितीत युद्ध छेडून आपले स्थान बळकट करण्याची जिनपिंग यांची योजना आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून चीनकडून भारतीय सीमेसह साऊथ व ईस्ट चायना सीमध्ये आक्रमक लष्करी हालचाली सुरू आहेत. भारताला बेसावध ठेवून हल्ला करण्याचे प्रयत्न भारतीय लष्कराने उधळल्याने आता चीनने तैवानवर लक्ष केंद्रित केल्याचे जिनपिंग यांच्या वक्तव्यावरुन दिसून येते.

चिनी राष्ट्राध्यक्षांच्या आदेशामागे अमेरिकेने तैवानबरोबरील सहकार्याला दिलेला वेग, हा घटकदेखील कारणीभूत असल्याचे मानले जाते. गेल्या वर्षभरात अमेरिकेने तैवानला मोठ्या प्रमाणात संरक्षणसहाय्य पुरविले आहे. त्यात लढाऊ विमानांपासून ते प्रगत क्षेपणास्त्र यंत्रणांपर्यंतच्या आधुनिक शस्त्रास्त्रांचा समावेश आहे. अमेरिकेने तैवानमध्ये संरक्षणतळ उभारावा, अशा स्वरूपाचे प्रस्तावही समोर येत आहेत. त्याचवेळी अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौका तसेच विनाशिका सातत्याने साऊथ चायना सीमध्ये तैनात करण्यात येत आहेत.

त्यामुळे चीनची सत्ताधारी राजवट चांगलीच बिथरली असून, तैवानवर हल्ला चढवून हा मुद्दा निकालात काढण्याची योजना आखण्यात येत आहे. यापूर्वी हॉंगकॉंग मुद्यावर चीनच्या राजवटीने आक्रमक पावले उचलून त्यावर ताबा मिळविण्यात यश मिळविले होते. तैवानच्या बाबतीत त्याचीच पुनरावृत्ती करण्याची तयारी सुरू झाल्याचे संकेत राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या विधानातून मिळत आहेत.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info