रशियन जनतेने ‘फॉरएव्हर वॉर’साठी सज्ज रहावे

- राष्ट्राध्यक्ष प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांचा इशारा

मॉस्को – पुढील काळात गोष्टी अधिकाधिक कठीण होत जाणार असून रशियन जनतेने कायमस्वरुपी युद्धासाठी सज्ज रहावे, असा इशारा राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी दिला. पेस्कोव्ह यांचा इशारा समोर येत असतानाच राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी रशियाच्या नव्या परराष्ट्र धोरणाला मान्यता दिल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे. यात पाश्चिमात्य देशांकडून रशियाविरोधात ‘हायब्रिड वॉर’ सुरू असल्याच्या संकल्पनेवर भर देण्यात आला आहे. दरम्यान, बेलारुसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी नाटोकडून युक्रेनला सुरू असलेला अविरत शस्त्रपुरवठा अणुयुद्धाचे कारण ठरेल, असे बजावले आहे.

रशियन जनतेने

रशियाने गेल्या वर्षी युक्रेनमध्ये केलेला हल्ला ‘स्पेशल मिलिटरी ऑपरेशन’ असल्याची घोषणा करण्यात आली होती. पण आता रशियाने युक्रेनमधील संघर्ष हे नाटो व पाश्चिमात्यांविरोधातील लढाई असल्याची भूमिका घेतली आहे. अमेरिका व नाटो सदस्य देशांकडून युक्रेनला सातत्याने करण्यात येणारा शस्त्रपुरवठा आणि आर्थिक सहाय्य यामुळे युक्रेनमधील संघर्ष फक्त रशिया-युक्रेन युद्ध म्हणून मर्यादित राहिला नसल्याचे रशियन नेते व अधिकारी बजावत आहेत. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे प्रवक्ते पेस्कोव्ह यांनी केलेले वक्तव्य त्याचाच भाग ठरते.

रशियन जनतेने

पेस्कोव्ह यांनी पुढील काळ कठीण असल्याचे सांगून युद्ध दीर्घकाळ चालू राहण्याचे संकेत दिले आहेत. त्याचवेळी रशियन जनतेला यासाठी तयार राहण्याचा इशाराही दिला आहे. रशियन प्रवक्ते हा इशारा देत असतानाच देशाच्या परराष्ट्र धोरणातही त्या अनुषंगाने बदल करण्यात येत असल्याचे समोर येत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी नव्या ‘फॉरेन पॉलिसी कॉन्सेप्ट’ला मान्यता दिली आहे.

रशियन जनतेने

शुक्रवारी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या नेतृत्त्वाखाली रशियाच्या सिक्युरिटी कौन्सिलची बैठक पार पडली. या बैठकीत पुतिन यांनी नव्या परराष्ट्र धोरणावर स्वाक्षऱ्या केल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींमुळे रशियाला आपल्या परराष्ट्र धोरणात बदल करणे भाग पडत असल्याचे पुतिन यांनी यावेळी स्पष्ट केले. अमेरिका व सहकारी देशांकडून रशियाच्या हितसंबंधांना धोका पोहोचविण्याचे प्रयत्न होत असून पाश्चिमात्य जगताने नवे ‘हायब्रिड वॉर’ छेडले असल्याची माहिती बैठकीदरम्यान देण्यात आली.

दरम्यान, रशियाचा शेजारी देश असलेल्या बेलारुसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी अणुयुद्धाचा इशारा दिला आहे. पाश्चिमात्य देशांकडून युक्रेनला देण्यात येणारे रणगाडे, क्षेपणास्त्रे व इतर प्रगत शस्त्रे जगाला आण्विक विनाशाच्या दिशेने घेऊन जात आहेत, असे लुकाशेन्को यांनी बजावले. ‘अमेरिका व सहकारी देशांच्या हालचालींमुळे युक्रेनमध्ये सर्वंकष युद्ध सुरू झाले आहे. अण्वस्त्रांचा वापर होऊन तिसरे महायुद्ध सुरू होण्याचा धोका दिसू लागला आहे’, असे लुकासैन्को यांनी म्हटले आहे.

हिंदी  English

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info