भूमध्य सागरातील कारवायांवरून अमेरिकेसह फ्रान्स व जर्मनीने तुर्कीला फटकारले

भूमध्य सागरातील कारवायांवरून अमेरिकेसह फ्रान्स व जर्मनीने तुर्कीला फटकारले

वॉशिंग्टन/अथेन्स/अंकारा – ‘ओरूक रेईस’सह आपली तीन जहाजे पुन्हा भूमध्य सागरात पाठविणाऱ्या तुर्कीला अमेरिका व युरोपने चांगलेच धारेवर धरले आहे. ग्रीसचा दावा असलेल्या क्षेत्रात तुर्कीने पुन्हा मोहीम राबविण्याबाबत घेतलेला निर्णय निषेधार्ह असल्याचे अमेरिकेने फटकारले आहे. ग्रीस-तुर्की वादात मध्यस्थीचे प्रयत्न करणाऱ्या जर्मनीने, तुर्कीच्या कारवाया तणाव कमी करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न उधळून लावत असल्याची नाराजी व्यक्त केली आहे. तर फ्रान्सने, युरोपने निर्बंध लादण्याचा पर्याय अद्याप खुला ठेवल्याची जाणीव तुर्कीला करून दिली आहे. त्याचवेळी ग्रीसने, तुर्कीची जहाजे माघारी जाईपर्यंत चर्चा शक्य नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे. अमेरिकेसह युरोपिय देशांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे या मुद्यावर तुर्कीची कोंडी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सोमवारी तुर्कीने ‘ओरूक रेईस’सह आपली तीन जहाजे पुन्हा भूमध्य सागरी क्षेत्रात रवाना केली होती. तिन्ही जहाजे २२ ऑक्टोबरपर्यंत या क्षेत्रात सक्रिय असतील, असे तुर्कीकडून सांगण्यात आले आहे. तुर्की इंधनाचा शोध सुरूच ठेवेल व आपल्या अधिकारांचेही रक्षण करेल, अशा शब्दात तुर्कीच्या ऊर्जामंत्र्यांनी मोहिमेचे समर्थन केले होते. त्याचवेळी जर या क्षेत्रात इंधन सापडले तर तुर्की त्याचे उत्खननही सुरू करेल, असेही तुर्की मंत्र्यानी बजावले होते. त्यानंतर आता तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी, ग्रीसला धमकावण्यास सुरुवात केली आहे. ‘तुर्कीची जहाजे त्यांचे कर्तव्य पार पाडण्यासाठी भूमध्य सागरात दाखल झाली असून, विरोध करणाऱ्यांना जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल. ग्रीस व सायप्रसने चर्चेदरम्यान दिलेली वचने पाळलेली नाहीत’, अशी धमकी एर्दोगन यांनी दिली.

तुर्कीच्या या आक्रमकतेवर अमेरिका व युरोपने तीव्र नाराजी नोंदवली आहे. ‘भूमध्य सागरात पुन्हा मोहीम सुरू करण्याचा तुर्कीचा निर्णय निषेधार्ह आहे. तुर्कीच्या घोषणेने भूमध्य सागरातील तणाव अधिकच वाढला आहे. या कारवाईने अमेरिकेचे नाटोतील सहकारी असणाऱ्या ग्रीस व तुर्कीमधील महत्त्वपूर्ण चर्चेत तुर्कीने जाणूनबुजून गुंतागुंत निर्माण केल्याचे दिसते. बळजबरी, धमक्या, धाकदपटशा व लष्करी कारवाया यातून भूमध्य सागरी क्षेत्रातील तणाव कमी होणार नाही. तुर्कीने चिथावणीखोर कृत्ये थांबवावीत आणि ताबडतोब ग्रीसबरोबर बोलणी सुरू करावीत. एकतर्फी कारवायांमुळे विश्वासार्हता निर्माण होणार नाही व तोडगाही निघणार नाही’, या शब्दात अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या मॉर्गन ऑर्टागस यांनी तुर्कीला धारेवर धरले.

जर्मनीचे परराष्ट्रमंत्री हैको मास यांनी, तुर्कीच्या एकतर्फी कारवायांवरून टीकास्त्र सोडताना, अशा गोष्टी तणाव कमी करण्याच्या प्रयत्नांना उधळणाऱ्या ठरतात, अशी स्पष्ट नाराजी व्यक्त केली. येत्या काही दिवसात चर्चेद्वारेच ग्रीस-तुर्की तणावावर तोडगा निघेल, अशी जर्मनीला अपेक्षा असून, तसे झाले नाही तर युरोपिय महासंघाला त्याबाबत वेगळा विचार करावा लागेल, असे मास यांनी बजावले. फ्रान्सनेही या मुद्यावर आग्रही भूमिका घेतली असून, युरोपिय महासंघाकडे तुर्कीवर निर्बंध लादण्याचा पर्याय खुला आहे, याची तुर्कीने जाणीव ठेवावी असा इशारा फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री जीन-यवेस ले ड्रियान यांनी दिला. यावेळी त्यांनी, तुर्कीकडून सातत्याने चिथावणी देणाऱ्या कारवाया सुरू असल्याचा आरोपही केला. जर्मनी व फ्रान्सकडून आलेल्या या आक्रमक वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर ग्रीसने, तुर्कीची जहाजे माघारी गेल्याशिवाय बोलणी करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info